मी केलेला राडा

दुपारी ३- ३:३० ची वेळ असेल. घरच्या फोनवर कोणीतरी फोन करून सांगितलं, "आहो तुमच्या मुलाला पोलिसांनी पकडून आणलंय तुम्ही या लौकर इथे. " झालं घरी एकच गोंधळ उडाला. आई-बाबा घरातली सगळी कामं तशीच सोडून धावत पोलीस चौकीत हजर झाले. नक्की काय झालं असेल, आपल्या मुलाला पोलिस कशाला पकडून नेतील? तो तर शाळेत गेला होता मग पोलिसांचा काय संबंध? नक्की काय झालं असेल? असे अनेक प्रश्न आणि चिंतांनी ग्रस्त झालेले चेहरे घेऊन ते चौकीच्या बाहेर साहेब येण्याची वाट बघत उभे होते. थोड्याच वेळात साहेब आले आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. काय हो तुम्ही तर चांगल्या घरची लोकं दिसता मग मुलगा असा कसा निघाला तुमचा? पोलिसाने विचारले. काय झालं साहेब आम्हाला सांगाल का? आम्हाला काहीच माहीत नाही हो, इथून फोन आला आणि आम्ही सगळी काम टाकून इथे धावत आलो. आई बोलली.

आहो तुमच्या मुलाने एकाच डोकं फोडलंय भर चौकात. म्हणून याला धरून आणलं आम्ही इथे. चांगल्या घरच पोरगं वाटलं म्हणून माहिती काढून तुम्हाला बोलावून घेतलं. हि पहिली वेळ आहे  म्हणून ताकीद देऊन सोडतोय आत्ता पण पुन्हा असं होणार नाही याची काळजी घ्या. आता तुम्हीच विचारा त्याला काय झालं ते. या आता. असं म्हणून त्या पोलिसाने मला आई बाबांकडे सुपूर्द केलं. आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखंच झालं मला. काय करावं काहीच सुचेना घरी गेल्यावर होणारा सगळा ड्रामा डोळ्यांसमोर उभा राहिला. घरी गेल्यावर होणाऱ्या सगळ्या राड्याची कल्पना मला एव्हाना आली होती. त्यामुळे मी तिथेच आई बाबांना सगळं सांगून टाकायचा निर्णय घेऊन मी बोलता झालो. शाळेतल्या काही मुलांच्या संगतीत राहून आपण कधी, कसे आणि किती भरकटलो हे मला कळलंच नाही. अनेकदा शाळा बुडवून सायबर कॅफे मध्ये गेम खेळत बसणे, गावभर भटकणे, नाहीतर सिनेमे बघणे अश्या वाईट सवयी मला लागल्या. थोडे दिवस साठवलेल्या पैशातून भागलं. पण ते पैसे थोडीच कायम पुरणार होते लौकरच संपले ते. आणि मला पैशांची कमतरता भेडसावू लागली. सायबर कॅफे वाला बऱ्यापैकी ओळखीचा होता. त्याने थोडे दिवस उधारीवर खेळू दिलं. पण बघता बघता त्याची उधारीही २००० रुपयांवर जाऊन पोचली आणि कॅफेवाल्याच्या सहनशक्तीचा बांध फुटला. त्यानेही तगादा लावायला सुरुवात केली. आता कॅफेवाल्याला द्यायला २००० रुपये आणायचे कुठून?

तुम्हाला सगळं खरं खरं सांगून सगळं एकदाच मिटवून टाकू असं अनेकदा माझ्या मनात आलंही पण प्रत्यक्षात असं काही करण्याचं धाडस माझ्याच्याने झालंच नाही. कॅफेवाला तर अगदी हात धुऊन पैशांसाठी मागे लागला होता. आणि माझ्याकडे काहीच पर्याय नसल्याने मी आला दिवस त्याला  गयावया करून आज-उद्या, आज-उद्या करून ढकलत होतो. खूप दिवस असच चालू होत. मला माझी चूक पूर्णपणे कळली होती. मी तर सायबर मध्ये जाणही बंद केलं होतं आणि आता सगळं सोडून मी पुन्हा शहाण्या मुलासारखा वागत होतो. असेच खूप दिवस उलटून गेले आणि अचानक एकदा सकाळी सायकलवरून शाळेत जाताना ७-८ जणांच्या एका ग्रुपने मला रस्त्यात अडवून कॅफेवाल्याचे पैसे मागायला सुरुवात केली. पैसे मी कॅफेवाल्याला नेऊन देईन तुमचा काय संबंध? मला त्रास देऊ नकात असं उत्तर देऊन मी पसार झालो. त्यातल्या काही जणांना हे उत्तर चांगलंच झोंबलं मग काय दररोज मला शाळेत येताजाता दमदाटी करायला त्यांनी सुरुवात केली. १-२ दा तर मला मारहाणही केली. मी अगदीच वैतागून गेलो होतो. निमूटपणे सगळं सहन करत होतो. अगदीच एकटा पडलो होतो. कोणाला सांगताही येत नव्हत की नक्की काय प्रॉब्लेम आहे. शेवटी मी शाळेत जाण्या येण्याचा रस्ताच बदलला. काही दिवस बरे गेले. पण परत एकदा ह्या ग्रुपने मला गाठून अडवलंच. आणि भर चौकातच त्रास द्यायला सुरुवात केली. माझं दप्तर काढून घेतलं आणि मला मारायला सुरुवात केली. यावेळी मात्र माझी सहनशक्ती संपली होती. मी रागाच्या भरात सायकलच्या कॅरियरला लावलेली क्रिकेटची bat काढून एकाच्या डोक्यातच हाणली. एका क्षणात चित्र पार पालटलं. मार खाल्लेला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर विव्हळत पडला. माझ्या हातात रक्ताने भरलेली bat आणि माझा आवेश बघून त्याची टोळी क्षणात गायब झाली. रस्त्यात गर्दी झाली. मला काय करावं ते सुचतच नव्हत. मी तिथेच थांबलो. शेजारच्या दुकानातून ३-४ जण पळत आले. १-२ जणांनी त्या मुलाला रिक्शात घालून दवाखान्यात नेला. आणि १ जण मला इथे घेऊन आला. हे सगळं ऐकून आई बाबांना काय करावं हेच समजेना. त्यांनी मला काही बोलायच्या आतच मी पुन्हा बोलायला सुरुवात केली. आई, बाबा सॉरी! माझं चुकलं मी परत कधी असं नाही करणार. मला क्षमा करा. असं म्हणून मी त्यांचे पाय धरले. आई बाबांनीही मला मोठ्या मनाने माफ केले. काही विशेष न झाल्याप्रमाणे आम्ही सगळे घरी आलो. पुढे काही झालंच नाही.

त्या दिवसानंतर आजवर तो कॅफेवाला किंवा मला मारणारा मुलगा परत कधी भेटला नाही. माझ्या आयुष्यात ही घटना कधी न घडल्याप्रमाणे सगळे विसरूनही गेले. पण आजही मी जेव्हाही त्या चौकातून जातो तेव्हा तेव्हा माझ्या आयुष्यातला हा राडा मला नेहमी आठवतो. आणि माझ्या चुकांची जाणीव मला करून देतो.