धावणारी पाऊले आणि आत्मविश्वास

"ससा रे ससा , त्याने कासवाशी पैज लावीली, वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ... ", अरे डोंगरावर नाही, 'फिनिश' लाईन ला जाऊ, अशीच काही स्थिती , कुठलीही धावण्याची स्पर्धा धावणाऱ्यांची झालेली असते. कोणी ससा आणि कोणी कासव,७ ऑक्टोबर २०१२ ची सकाळ,शिकागोची कडाक्याची थंडी, ४५ हजार स्पर्धक, स्पर्धकांचे नातेवाईक मंडळी, १० लाख प्रेक्षक, ह्या देदीप्यमान सोहळ्यातला मी एक कासव. मी इंजिनियरिंग ला असताना हॉस्टेल ला राहायचो. ४ वर्षात आम्ही किती तरी परीक्षा दिल्या, त्या वेळी मी आणि माझा मित्र , आमची सांकेतिक भाषा वापरायचो. पेपर संपल्यानंतर आम्ही मेसवर जेवायला भेटलो की आम्ही एकमेकांना विचारायचो, "काय तुषार, आज तुझा कोण खेळला, सेहवाग की सचिन , सेहेवाग म्हणजे पेपर खूप छान गेला आहे आणि वेळेच्या आतच संपला, आणि तेंडुलकर खेळला म्हणजे, अखेरपर्यंत लढलो आणि मॅच जिंकली, म्हणजे पेपर चांगला गेला. आज सेहेवाग आणि तेंडुलकर ला सोडून , राहुल द्रविड ला मॅच जिंकायची जबाबदारी देणार होतो. शक्ती च्या ऐवजी युक्ती चा वापर करणार होतो आणि मॅराथॉन चा डोंगर पोखरून काढणार होतो.

तशी ही माझी दुसरी मॅराथॉन, २०११ मध्ये ही मी बँक ऑफ अमेरिका - शिकागो मॅराथॉन धावलो होतो, त्या साठी खूप-खूप तयारी ही केली होती. त्या वर्षी मी ऑफिसमधून घरी धावत-धावत च यायचो. क्रॉस ट्रेनिंग सुद्धा करायचो, दररोज सकाळी अर्धा तास पोहायचो, १ तास तरी सायकल चालवायचो. पूर्ण माझ्या ट्रेनिंग मध्ये मी २० मैल अंतर चा टप्पा २ वेळा गाठला होता. २०१० मध्ये मी हाल्फ मॅराथॉन पण धावलो होतो आणि ती ही १ तास ४८ मिनिटांमध्ये. ह्या वर्षी मात्र संपूर्ण ट्रेनिंग मध्ये २० मैल पण अंतर धावलो असेल की नाही , शंका आहे. ह्या वर्षी क्वचितच वेळा मी सायकल ने ऑफिसमधून घरी गेलो होतो, धावत गेल्याच मला आठवत ही नाही, स्केटिंग करत १-२ दा घरी गेल्याच आठवतं. मी दररोज ऑफिसला जाताना आणि येताना , लोकांना धावताना बघायचो , स्पर्धापरीक्षेची तयारी असल्याने मी धावत नव्हतो, व्यायाम तर सोडूनच दिला होता. अशी तयारी असताना मी बँक ऑफ अमेरिका - शिकागो शॅमरॉक शफल ही स्पर्धा धावायला गेलो आणि ८ किलोमीटर हे अंतर ५० मिनिटांच्या आत धावलो.ह्याने मला खूप आत्मविश्वास दिला की काहीच तयारी नसतानाही मी, फक्त स्पर्धा पूर्ण करण्याचा ईर्ष्येने सहजच धावू शकतो. मधल्या काळात मी १ महिना भारतात गेल्याने आणि ते ही मॅराथॉन च्या २ महिने आधी, मला कुठेच तयारी करता नाही आली. आणि त्यातच अधिक मास आला आणि जावई प्रथमच सासरी आल्याने, साग्र-सुंदर जेवण, गोड चमचमीत पदार्थ ह्यांची हयगय नव्हती, 'नाही म्हणेल कसा? लाडका जावई जो ठरला'. पण ह्यात एक आशेचा किरण नक्कीच होता, ऑफिसमध्ये मी दररोज २ दा, २१ मजले पायऱ्यांनी उतरायचो आणि चढायचो. ह्या व्यायाम प्रकाराने मला खूप फायदा व्हायचा, आणि माझ्या ऑफिसमधला आर्मी मॅन बालाजी मला, धीर देत राहायचा की आपण जी ही चढण्याची आणि उतरण्याची पायपीट करतो तिचा तुला मॅराथॉन धावायला खूप फायदा होईल आणि शेवटी तुझा आत्मविश्वासच तुला कामी येईल. ५ ऑक्टोबर २०१२ ला कार्यालयातले सगळे माझे सहकारी ज्यांनी माझी मागील वर्षाची तयारी पाहिली होती , ते सर्व म्हणायला लागले, जेवढं शक्य होईल तेवढंच धाव, पूर्ण करण्याची गरज नाहीये, थोडं - थोडकं अंतर नाहीये, २६ मैल आहे, हे लक्षात ठेव, जर मोठी दुखापत वगैरे झाली तर आयुष्य भर रडशील. किती तरी वाईट घटना होतात मॅराथॉन मध्ये म्हणून जास्त प्रयत्न नको करूस. 
माझा आत्मविश्वास जरा ही कमी नव्हता, झालेला, मी स्वतःला सांगायचो की मी कमीत कमी मॅराथॉन पूर्ण तरी करेल, वेळ कितीही लागला तरी चालेल, मी 'कासव' होईन, पण शर्यत नक्की जिंकेन. त्या दिवशी संध्याकाळी, मी आणि माझी पत्नी 'स्वाती', मॅराथॉन च्या एक्स्पो ला गेलो. तिथे मागील वर्षी ज्यांनी - ज्यांनी मॅराथॉन पूर्ण केली होती, त्यांची नावे लिहिली होती, माझे ही नाव होते, किती तरी आत्मविश्वास वाढला पण त्याच क्षणी आठवली माझी , कडक तयारी त्या वर्षाची. मागील वर्षी ह्याच वेळेस मी किती किती अधीर झालो होतो, हृद्याचे ठोके किती तरी वाढले होते. खूप खूप घाबरलो होतो , पण ह्या वेळेस खूपच स्थिर होतो, हसत होतो, विनोद करत होतो, यत्किंचितही गंभीर नव्हतो, स्थितप्रज्ञ होतो. एक्स्पो मी आणि स्वातीने चक्क पोस्टर रंगवलं , मला 'चियर' करण्यासाठी, अगदी रमून गेलो होतो दोघे, स्वाती ला बऱ्याच दिवसांनी पेंटिंग करायला मिळाल्याने ती ही खूप आनंदात होती, तिने लिहिलं होतं, " यू कॅन डू इट , संदीप , यू कॅन... ऍड यू विल...". त्या दिवशी रात्री घरी आलो आणि चक्क शांत झोपलो, स्वाती साठी हा आश्चर्याचा खूप खूप मोठा धक्का होता, कारण मागील वर्षी मला झोपच नव्हती लागली, सारखे तेच तेच धावण्याचे विचार मनात यायचे. शनिवारी मग बरीच खरेदी केली. 'गू एनर्जी जेल', खूप सारे प्रोटीन बार, ऍंटी चेफिंग क्रीम , सगळं सगळं घेऊन आलो. मग हसू आलं, आपण मागील वर्षी धावण्याची तयारी खूप केली होती आणि हि साधनं वापरायची नाहीत असं ठरवलं होतं, ह्या वर्षी तयारी शून्य आहे आणि इतर साधनच जास्त घेत आहोत. आजच स्वाती ला मी कोर्स वर कुठे कुठे दिसू शकेन आणि तू कुठे थांबशील हे दाखवून दिलं, सुरुवातीला, ३ रया मैल वर, १२ व्या मैल वर आणि मग सरळ २६.२ मैल वर भेटू असं ठरलं. शनिवारी रात्री घरी आलो आणि मग तयारी सुरू केली, बिब जोडला टी-शर्ट ला, डी-टॅग जोडला शूज मध्ये, फुयेल बेल्ट तयार केला, छोटी बॅग घेतली, त्यात टम्स च्या गोळ्या टाकल्या, क्रीम, बार आणि जेल. खूप शांत झोपलो , सकाळी ठरल्याप्रमाणे 'शिंगाड्याच्या पिठाचा' शिरा बनवून दिला स्वातीने. हजारो कार्ब्ज गेले शरीरात , उपयोगी पडतील ह्या आशेने खाल्ला, शिरा. घरातून निघालो तर बर्वीन ट्रेन स्टेशन बंद, मग बसनेच निघालो. सगळे शिकागोतले स्पर्धक ट्रेननेच जातात असा अनुभव होता, पण ट्रेन स्टेशन बंद असल्याने , बस घेतली. बसमध्ये एकटा होतो मॅराथॉन रनर होतो, पण पुढच्या एक स्टॉपला अजून एक रनर चढला आणि धीर आला की वेळेवर पोहचू. वेळेवर पोहचलो, ४० फॅरनहाईट च्या ही खाली तापमान आणि आजूबाजूला असंख्य असा जनसमूह. प्रवेशद्वाराच्या इथे फोटो काढले स्वाती सोबत, स्वातीने परत धीर दिला, पूर्ण करूनच या. व्यवस्थित धावा आणि काळजी घ्या. मी थोडा वार्म अप म्हणून धावलो आणि माझ्या नेमलेल्या कोराल मध्ये जाऊन उभा राहिलो. बरेच स्पर्धक थोडासा वार्म अप करून , आपापली जॅकेट्स हवेत भिरकावीत होती, रस्त्याच्या कडेला अश्या किती तरी पॅंटस, जॅकेट्सचा ढीग साचला होता. ज्यांना सकाळची प्राथमिक कामं आटोपायची होती, ते अगदी रस्त्याच्या कडेलाच , विधी करत होते, स्त्रिया सुद्धा. केनियन्स, इथियोपियन्स धावून गेल्यावर, आम्ही म्हणजे 'रेस्ट ऑफ द हुमॅनीटी' धावू लागलो. स्टार्ट लाइन ला आल्यावर मनातल्या मनात 'गणपती बाप्पा मोरया' म्हटलो आणि सुरुवात केली धावण्याच्या यज्ञास. थोडं अंतर धावल्यावरच लगेच स्वाती चा आवाज आला, "संदि~~~~~~~प", अजूनच प्रेरणा मिळाली. मनातल्या मनात 'योजना' आखत धावू लागलो, दर ३ मैल ला विश्रांती घ्यायची. ठरल्याप्रमाणे स्वाती ३रया मैल वर उभी होती , ती मला दिसली, पण तिला समजलं नाही की मी क्रॉस झालो. मी विश्रांती घेतली नाही, ६ व्या मैल वर १२ मिनिट १ मैल ला ह्या वेगाने मी आलो होतो. मी थोडी विश्रांती घेतली.मी  पश्चिमोत्तासन केलं, टम्स च्या गोळ्या खाल्ल्या, गू-जेल पाण्यासोबत घेतलं. आणि परत हळू हळू सुरुवात केली. आपल्याला २६ मैल धावूनच जायचं आहे असं मनाशी ठरवून घेतलं. ९ व्या मैल ला आलो होतो तेव्हा वेग होता १३ मिनिट प्रती मैल. पण शरीर थोडं थकलं होतं. रस्त्याच्या कडेला जाऊन आसन केलं आणि आधी प्रमाणे, टम्स च्या गोळ्या खाल्ल्या. ह्या संपूर्ण अंतरात, २-४ मीटर अंतर अस नव्हतं की जिथे प्रेक्षक नसतील, प्रत्येक जण 'चियर' करीत होता, प्रोत्साहन देत होता. रस्त्याच्या कडेला उभे असलेले लहान मुलं धावणाऱ्यांना 'हाय फाय' देत होते, कुणी पोस्टर घेऊन उभे होते, घंटा वाजवीत होते. एकाने तर असे पोस्टर लिहिले होते, 'डू नॉट वेस्ट टाइम इन रीडिंग पोस्टर्स, जस्ट रन'. ९ ते १२ मैल अंतर 'श्री स्वामी समर्थांचा' नाम जपत धावलो, जपाने , नसानसात शक्ती येत असल्याच, मला जाणवायचं. मला कसं ही करून १२ मैल ला जायचं होतं, नाही पूर्ण केली तरी १२ मैल ला ठरवू की पुढे धावायचं की नाही. कसाबसा, पोहचलो आणि स्वाती च्या जिवात जीव आला, ती खूप थकली होती, वाट बघून बघून, मी १३ मिनिट प्रती मैल ह्या वेगाने हे अंतर धावलो होतो. तिच्याजवळ मी ५-७ मिनिटे थांबलो, पाणी प्यायलो, प्रोटीन चा पूर्ण बार फस्त केला, खूप बरे वाटले. आणि पूर्ण अवस्था बघता असं ठरलं की धावूया जितकं शक्य होईल तितके. १४ व्या मैल च्या इथे पाणी पीत असताना एक प्रोस्थेटिक पाय लावलेला रनर भेटला, तो म्हटला, 'लुकिंग एक्झॉस्टेड? डू नॉट गिव्ह अप, किप इट अप, लेटस रन टुगेदर'. एक अनामिक वीज सळसळली शरीरात आणि त्याच्या सोबत धावू लागलो, तो ही थकला होता, तो म्हटला , 'यू कंटिन्यू'. मी तिथून मग २ मैल धावायचो आणि थोडे अंतर चालायचो, पाणी - टम्स - गू जेल, असा प्रकार करीत निघालो. १८ मैल च्या इथे आलो तेव्हा मागच्या वर्षाची जागा आठवली, इथेच मी ९.५ मिनिट प्रती मैल ह्या वेगाने आलो होतो आणि मला डाव्या पायात गोळा आला होता. जिथून मला चालणं ही अशक्य झालं होतं. आणि खूप अशी भूक लागली होती. मी अक्षरशः रस्त्याच्या कडेला पडलेल्या शेंगांची बॅग उचलली होती आणि टरफलांसहित शेंगा खाल्ल्या होत्या. ह्या वर्षी स्थिती खूप- खूप बरी होती, मी धावू शकत होतो आणि भूक ही नव्हती लागलेली. १८ ते २१ मैल मध्ये २ वेळा बाथरूम विश्रांती घेतली, खूप बरे वाटले आणि जोमाने धावू लागलो, ह्या वेळी घेतलेल्या, टम्स च्या गोळ्या आणि शेफिंग क्रीम खूप कामी आले. मागच्या वर्षी  त्वचा जळून निघाली होती, खूप त्रास झाला होता. २१ व्या मैल वर एक बाबा रस्त्याच्या कडेला खुर्ची टाकून बसलेले होते आणि खुर्ची वर एक पोस्टर टांगले होते, "ऍट धिस पॉईंट, २१ माईल्स, यू माईट थिंक दॅट , यू विश टु सिट इन धिस सिट इन माय प्लेस, ऍड आय विश दॅट, आय विश टु रन लाइक यू". खूप छान वाटले, बाबा खूप म्हातारे झालेले होते आणि त्यांचं वाक्य खूप प्रोत्साहन देणारं होतं. २३ ते २४ मैल अंतर पूर्ण चालतच गेलो. २४ ते २६ मैल अंतर खूप त्वेषाने धावलो, थांबलोच नाही. शेवटचे ०.२ मैल अंतर धावताच येईना, पण मी आलो होतो त्या अंतिम रेषेच्या जवळ, चढ संपल्यावर तर मी ते भारावलेले वातावरण बघून , अजूनच जोरात धावू लागलो. मी ह्या धावण्याच्या कोर्स मध्ये एक भारतीय मुलगी माझ्या पेक्षा जास्त वेगाने धावत गेली होती, तिच मुलगी अगदी १०० मीटर अंतर राहिले होते तेव्हा परत दिसली, मग तिला मागे टाकायचंच ह्या त्वेषाने धावलो आणि पोहचलोच. पोहचलो एकदाचा.
आनंद गगनात मावेना, खूप हसू येत होतं स्वतः वर, खूप आत्मविश्वास आला होता, मनाच्या शक्तीच्या जोरावर आपल्याला काय कुणालाही जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे प्रकर्षाने जाणवत होतं. कुणाला विश्वासच बसणार नाही की मी अगदी काहीच तयारी नसताना २६.२ मैल / ४२ कि. मि. अंतर धावू शकतो, कुणी ही मला वेड्यात काढलं असतं. मागील वर्षी शारीरिक शक्तीने जिंकलो होतो तर ह्या वर्षी, अभेद्य अश्या मनाच्या शक्तीने. एकदाचं ते मोहित करणारं मेडल हातात घेतलं, फोटो काढला आणि शांत झालो. स्वाती ला फोन केला लगेचच भेटलो, तिला विश्वासच बसेना की मॅराथॉन पूर्ण केली आहे, तिला वाटत होतं की मी काही पोहचणार नाही, तिने माझ्या खिशात बसचा पास टाकून ठेवला होता आणि सांगितलं होतं की शक्य नाही झालं पूर्ण करणं, तर बस ने सरळ घरी यायचं. तिलाही खूप आनंद झाला. प्रत्येक रनर ला एक ग्लास बियर मिळते, मी 'मदिरा' पीत नाही, मागील वर्षीही घेतली नव्हती, ह्या वर्षी ग्लास घेतला पण प्यायलो नाही, आनंदानेच इतकी धुंदी आली होती. मग जाऊन मसाज/ स्ट्रेचिंग केलं , पास्ता खाल्ला आणि घरी आलो. देवाजवळ मेडल ठेवले आणि अंघोळ केली, लगेच नाही झोपलो. आराम केला, रात्री रिकव्हरी बाम लावून झोपलो, हत्तीच्या पायाने चालत होतो, पाय खूप सुजले होते, दुखत होते, पण मन शांत होतं, हसत होतो स्वतः च्या आत्म शक्ती वर. सोमवारी पूर्ण आराम केला, गरम पाण्यात पाय बुडवूनच होतो. मंगळवार सकाळ पर्यंत चालण्याच्या स्थितीत आलो होतो, तरी पाय थोडे दुखतच होते. ऑफिस मध्ये आलो तेव्हा, सगळ्यांना मेडल दाखवलं तर सगळे अवाकच, माझा मित्र 'सुजीत' ला तर विश्वासच बसेना, त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य मला अजूनच हसवत होते, 'आय कॅन डू इट' ची प्रचिती मला सतत येत होती. इति बँक ऑफ अमेरिका शिकागो २०१२ मॅराथॉन यज्ञ संपन्नः 
धन्यवाद.
टिप- जरी मी स्थितप्रज्ञतेने धावत असलो, तरी लिहिताना गडबड करू शकतो, चूकभूल माफ असावी.