अर्धी चड्डी

टी.व्ही.या विषयावर दोन परस्परविरोधी मते आहेत आणि तसे असणे स्वाभाविकच आहे.काही जणांच्या मते टी.व्ही.पहाणे हा वेळेचा पूर्णपणे अपव्यय आणि त्यात मुळीच वेळ वाया घालवू नये. याच्या विरुद्ध मत असणारे मात्र बऱ्याच मालिका पहात वेळ घालवतातच शिवाय त्यावर अगदी दातओठ खाऊन चर्चा करण्यात आणखीही वेळ घालवतात. मी या दोन्हींचा आदर करतो व वेळ वायाच जात आहे असे वाटत असल्यास काही मालिका पहातो त्यात  पहावीशी वाटणारी अशी एक मालिका " उंच माझा झोका " आहे.त्यातील वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वेषभूषा. लहान मुलींना फ्रॉक, परकर पोलके हे पर्याय थोड्या दिवसात बाद होऊन एकदम नऊवारीत प्रवेश करावे लागते तर अगदी लहान मुलगेदेखील धोतर नेसून अगदी सहजपणे तो बोंगा संभाळतात याचे कौतुक वाटते. अर्थात त्याना धोतराला पर्याय केवळ लंगोटीचाच असल्यामुळे ते अपरिहार्य होते.आणि त्या काळात वयाच्या सातव्या आठव्या वर्षापर्यंत मुले लंगोटीवरच वावरत होती असे आचार्य अत्र्यांच्या आत्मचरित्राची साक्ष देऊन सांगता येईल           
        सुदैवाने आमच्या लहानपणापर्यंत मात्र काळानुरूप वेषभूषेत बराच बदल झाला होता.   त्या आमच्या बालपणी घालावयाचा पोषाक सदरा चड्डी या नावाने ओळखला जाई. हाफ पॅंट ह्या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत सापडत नाही अर्थात पॅंट यालाही मराठी पर्याय नाही.ही दोन्ही वस्त्रप्रावरणे भारतीय नाहीत त्याचा हा परिणाम असावा कदाचित इतर भारतीय भाषातही त्याना समानार्थी शब्द नसावा. त्यामुळे आम्ही सदऱ्याखाली जे काही परिधान करत असू त्याला चड्डी असेच म्हणत. चड्डीचा रंग सहसा मळखाऊ म्हणजे खाकी किंवा गडद निळा.सातवी पास होऊन आठवीत म्हणजे हायस्कूलमध्ये गेला की विजारीची बढती मिळायची अर्थात ती पांढरीच असायची.म्हणजे शिवताना तिचा रंग तसा असे.पण जास्त विजारी शिवणे परवडत नसल्याने अर्धी चड्डी  काही दिवस तरी कापड कमी व धुण्याचा खर्च कमी (मेहनत जरा जास्त)  शिवाय टिकाऊ या सर्व गुणधर्मामुळे  चालू असायचीच.आमच्या वर्गातल्या पोरी मात्र एकदा साडीत (त्यावेळी पातळात) प्रवेश केल्यावर त्यांच्यावर मात्र परत फ्रॉक किंवा परकर वापरण्याची पाळी येत नसे उलट तसा परतीचा प्रवास न करण्याचे बंधनच असे म्हणाना !
          एकदा विजार वापरायला लागल्यावर मग परत हाफ पॅंट  घालण्याचे आमच्या जरा जिवावरच येई. पण विजारच घालण्याच्या या हट्टापायी एकदा माझ्यावर चांगलाच अनचस्था प्रसंग ओढवला.त्यावेळी शाळेत शाईची दौत व टाक घेऊन जावे लागे. तसा मी घेऊन जात असताना  एका मित्राच्या वात्रटपणामुळे शाईची दौत माझ्या पांढऱ्या विजारीवर जी पालथी झाली ती अगदी खिशाच्या खालच्या जागेवर  व विजारीच्या त्या भागावर अगदी भला मोठा शाईचा डाग पडला.त्याच दिवशी शाळेत रवींद्रनाथ टागोरांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम होता व त्याप्रीत्यर्थ माधव ज्यूलियन यांची आमच्या पाठ्यपुस्तकात असलेली " मी पाहूनि विभूति दोन " ही कविता म्हणण्यास मला शिक्षकांनी आज्ञा केली.घरी जाऊन विजार बदलून येण्यास वेळ तर नव्हताच पण असलाच तरी घरात दुसरी विजार तरी असायला हवी. अर्थात त्याच परिस्थितीत मला कविता सादर करणे भाग पडले. विजारीवरील डागामुळे मी इतका संकोचलो होतो ( त्यावेळी दाग अच्छे होते है ही समजूत आली नव्हती) की सभामंचाजवळ जाऊन कविता म्हणताना माझे जास्त ध्यान कवितेपेक्षा खिशात हात घालून विजारीचा डाग पडलेला तेवढा भाग पकडून श्रोतृवर्गाचे त्या डागाकडे लक्ष जाऊ नये याकडेच होते. (खरेतर श्रोतृवर्गाचे दोन्हीकडेही लक्ष नव्हते.) खिश्यातून हात घालून तो भाग पकडणे तसे अवघड जात असल्याने थोड्याच वेळात तो हातातून निसटायचा व पुन्हा पकडण्यासाठी हाताचा चाळा करावा लागायचा त्यामुळे पहाणाऱ्याना वेगळाच भास व्हायचा  तरी मी कशीबशी कविता म्हणून टाकली.पण काही चाबरट मित्रांनी  नंतर " काय रे कविता म्हणत असताना खिशात हात घालून तुझ्या विभूतींना फारच कुरवाळत होतास " अशी माझी फिरकी घेऊन मला चांगलेच हैराण केले.
       शाळेतून कॉलेजला आणि तेही पुण्यासारख्या शहरात गेल्यावर मात्र अर्ध्या चड्डीला कायमचा रामराम ठोकला म्हटले तरी चालेल,तरी  असावी एक म्हणून एक अर्धी चड्डी बरोबर घेतली होती पण ती घालण्याचे धाडस वसतीगृहात रहात असताना होत नसे मग कॉलेजात घालण्याचे तर नावच नको.आमचे वसतीगृह मित्रही इतके सभ्य की अंडरपॅंट घालून व्हरांड्यात फिरत असले आणि माझी पुण्यातली बहीण माझ्याकडे आली की  लगेच झटकन खोलीत शिरून पायजमा घालूनच बाहेर यायचे. इतकेच काय एकदा तर माझा एक मित्र  मला म्हणाला"अरे श्याम्या तू शेजारच्या खोलीतल्या देशपांड्याकडे आलास तर लगेच मी अंडरपॅंटीवर विजार चढवून बाहेर आलो " मी आश्चर्यचकितच झालो ते ऐकून. त्याला कारण विचारता तो म्हणाला "अरे मला वाटले कोणीतरी पोरगीच आली आहे त्याच्याकडे "त्यावेळी माझा आवाज फुटला नसल्यामुळे मी बोलायला लागल्यावर एकादी पोरगीच बोलत आहे असा भास व्हायचा.बरे ते वय असे की पोरगी शेजारच्या खोलीतल्या विद्यार्थ्याकडे आली म्हटल्यावर पहाण्याची उत्सुकता दांडगी पण विजार घालून बाहेर आल्यावर पोरीच्या ऐवजी माझे दर्शन झाल्यावर चांगलाच हिरमोड व्हायचा.
        आमच्या वर्गात काही पुण्यातील गुजराती मुले होती त्यातील एक शहा बराच स्मार्ट होता तो मात्र कधी कधी सॅटिन डकची हाफ पॅंट घालून यायचा आणि ती त्याला शोभतही असे.त्याचे पाहून वसतीगृहातील माझ्या एका मित्रालाही तशी स्फूर्ती झाली.म्हणून तोही त्याची ट्रंकेतली अर्धी चड्डी काढून एक दिवस घालून आला , पण त्याला फारशी कोणी दाद दिली नाही म्हणजे कौतुकही केले नाही किंवा नावे पण ठेवली नाहीत.त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी पण माझ्या हाफ पॅंट्ला उजाळा द्यावा असा विचार केला पण आमच्या गुजराती भाईंनी माझा पुरताच मामा केला,"अबे क्या तुम हसमुख (त्या स्मार्ट शहाचे नाव) बनने जा रहे हो जरा आइनेमे देख" असे म्हणून त्यानी माझी पार खिल्ली उडवली त्यावेळपासून अर्धी चड्डी मी जी काही बॅगेच्या तळाशी टाकली ती एकदम आमचे संघशाखा दोस्त शाखेत येण्याचा हट्टच धरून बसले त्याचवेळी   बाहेर काढली. नंतर त्यांचाही हाफपँट्च घातली पाहिजे हा आग्रह कमी झाल्यावर शाखेतही आम्ही पॅंट घालूनच जाऊ लागलो.
        त्यानंतर मात्र अर्धी चड्डी कमीच वापरली गेली.केरळ ट्रिपमध्ये किंवा अमेरिकेतही बीचवर जाताना नाइलाज म्हणून मी अर्धी चड्डी घातली तरी ती उतरवून नेहमीची पॅंट केव्हां चढवतो असे मला होते.  अमेरिकेत गेल्यावर तेथील बरेच पुरुषही हाफपॅंट किंवा बर्म्युडा वापरताना दिसले.एकदा तर उन्हाळ्यात संध्याकाळी मी फिरायला जाताना एक पुरुष फक्त हाफ पॅंट घालूनच (शर्ट किंवा बनियनही नाही) पळत चालला होता अर्थात त्यावेळी रस्त्यावर तो व मी याशिवाय एकादाच माणूस असेल. स्टीव्ह जॉब्ज तर अगदी त्याच्या नव्या संगणकाच्या उद्घाटनालाही अर्ध्या चड्डीत येत असे म्हणे. तेथे तर काय स्त्रियाही हाफच काय पाव पॅंटीतही वावरतात आणि तरीही त्यांच्याकडे कोणीच फारसे लक्ष देत नाहीत.आता आपल्याकडेही आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिकही बर्मुडा म्हणजे अर्ध्या चड्डीची सुधारित आवृत्ती घालून आपल्या फुल पॅंट घातलेल्या नातवाला फिरायला बरोबर घेऊन बाहेर पडलेले दिसतात.तर आमच्या चिरंजीवांसारखे मध्यमवयीनही बिनधास्त अर्ध्या चड्डीत वावरताना दिसतात. अंगभर कपडे वापरण्याकडे आपल्याकडील बऱ्याचश्या स्त्रियांचा अजूनतरी कल आहे.अर्थात त्याविषयी मी अधिक काही म्हटल्यास एकादा मोर्चा निघण्याची शक्यता आहे.कदाचित सगळे पुरुष पूर्णपणे अर्ध्या चड्डीचा अंगिकार करतील तेव्हां त्याही त्याना तोडीस तोड उत्तर देईल अशी वेषभूषा करतील यात शंकाच नाही.