ओदिशा - १ : पूर्वरंग

ओदिशा : १ : पूर्वरंग

एकदा अचानक नव्या मुंबईतला आमचा मित्र बाळ्या टेलर ऊर्फ टकल्या आणि त्याची सौ. प्रियांका ऊर्फ जखीण पुण्याला आमच्या घरी आले. अर्थात आयत्या वेळी अगोदर दूरध्वनी करून आम्ही घरी आहोत की नाही याची खात्री करून. जखीण फार म्हणजे फारच रागावली होती. तिचा आणि आमच्या सौ. चा वाढदिवस दोनतीन दिवसांच्या अंतराने येतो. "२०१० मध्ये दोन्ही वाढदिवस कुठे तरी दूर, रम्य अशा पर्यटनस्थळी साजरे करावेत, तेव्हा ताबडतोब पर्यटनाचा आराखडा काढा, कुठेही दूर तुमच्या आवडत्या स्थळी; अशी तिने दीडेक वर्षापूर्वी सूचना केली होती." जखिणीचीच सूचना ती! पाळायलाच पाहिजे. आराखडा न बनवून मी सांगतो कोणाला? पण एक महिना अगोदरच माझा पाय दुखावला. ही किमया देखील जखिणीचीच असेल का? पण बहुधा तिच्या शत्रू जखिणीचीच असावी. हाड मोडले होते आणि मी चारपाच महिने घरात बसून राहिलो.

आता मात्र ट्रीप काढली नाही तर कोणाला तरी सुपारीच देणार अशी तिने धमकीच दिली. कोणाला सुपारी द्यायची जखिणीला तरी गरजच काय अशी शंकाही मी बोलून दाखवली. असे शुभकार्य सिद्धीस नेण्यास जखीण समर्थ होतीच. टकल्यालाही ते एकदम पटले. चांगला दहा दिवसाचा दक्षिण दौरा आखला. दूरध्वनीवर तपशील कळवला. काय सुधारणा हव्यात ते विचारले. दोनचार वेळा चर्चेनंतर आराखडा पक्का झाला. एकदा दोघे आमच्याकडे येऊन पण गेले. अगोदर कन्याकुमारी की शेवटी कन्याकुमारी अशी दिशा फक्त ठरवणे बाकी होते. अगोदर कन्याकुमारी असे ठरले. नाहीतर दुसरीकडे कुठेतरी जाणे होईल व कन्याकुमारी राहून जाईल अशी बाळ्याला भिती होती. खरे तर कोकण रेल्वेने त्रिवेंद्रम आणि तिथून कन्याकुमारी केले तर गाडीत एकच रात्र काढावी लागते. आणि थेट कन्याकुमाकुमारीला जाणारी रेलवे चांगली सालेम, तिरूपती करीत गाव फिरवून नेते त्यामुळे एक रात्र जास्त काढावी लागते. तरी तसेच थेट कन्याकुमारी असे ठरले. मुंबईहून निघणारी पुण्यावरून जाणारी रेलवे गाडी पकडून कन्याकुमारीला जाऊन तिथून कार, बस जसे वाहन मिळेल तसे फिरायचे ठरले. विमानप्रवास दोन कारणासाठी टाळला. पहिले म्हणजे पैसे वाचवणे. दुसरे म्हण्जे त्या निमित्ताने एकत्र गप्पा होतील. अजून चारेक महिने बाकी होते. नंतर अधूनमधून दूध्ववर बोलणे व्हायचे. एकदा दिवाळीनंतर निवांतपणे जालावर बसलो, रेलवे तिकिटांची उपलब्धता पाहून निघायचा दिवस पक्का करायला दूध्व केला आणि बाळ्याशी दूध्व वर बोलत उपलब्धता बघत तिकिटे काढून टाकली. टकल्याला कळवले.

आता दर दोनचार दिवसांनी दूध्ववर बोलणे होई. पर्यटनस्थळाबद्दल, सामानाबद्दल, वाहनाबद्दल, प्रवासाबद्दल चर्चा होई. आता निघायला दीडेक महिना बाकी होता. असाच एकदा दूध्व आला. टकल्या होता.

"अरे भाऊ आला तर चालेल का? दोघंही येतील." टकल्या.

"मला चालेल. भाऊ तर मस्त कंपनी आहे. पण प्रियांकाला चालेल का? त्यांचे जमते का? काही झाले तरी मोठा दीर आहे तो तिचा!" मी.

"थांब तिच्याशीच बोल." बाळ्या.

"मला चालेल हो. भाऊ आले की खाण्यापिण्याची चंगळ असते. बाळ्याची चिकूगिरी चालणार नाही." प्रियांका.

"ठीक आहे. पण सहलीच्या आपल्या आराखड्यात अनावश्यक ऊठसूठ फरक नको." मी.

नंतर काही वेळाने भाऊचाच दूध्व आला. आमची गाडी, सीट क्र., पी एन आर क्र. वगैरे विचारून घेतला आणि त्या उभयतांची आमच्याच गाडीची तिकिटे काढली.

नंतर दोनचार दिवसांनी सचीनचा, भाऊंच्या चिरंजिवांचा दूध्व. "काका इथूनच गाडीची सोय होऊं शकते. तवेरा मध्ये ड्रायव्हर अधिक सात बसू शकतात. तुम्ही सहाच आहात. चालेल का?" त्याला साहाजिकच पासष्टीच्या खवय्या तीर्थरूपांच्या आणि साठीच्या मातेच्या सोयीगैरसोयीची चिंता वाटत होती.

"मी आराखडा पाठवलेला आहे. दर वाजवी असेल तर हरकत नाही. आपले संपूर्ण अंदाजपत्रक देखील पाठवलेले आहे. फक्त अगोदर पैसे द्यायचे नाहीत. आराखड्यात जास्त फरक चालणार नाही. वाटेत एखादे ठिकाण आवडले तर आपण जास्त राहणार आहोत. एखादे आवडले नाही तर सोडून देणार आहोत. ड्रायव्हिंग धोकादायक वाटले किंवा गाडी बरोबर आरामदायक नसेल किंवा गाडी बरोबर चालत नसेल किंवा ड्रायव्हरचा स्वभाव आवडला नाही तर गाडी किंवा ड्रायव्हर किंवा दोन्ही आपल्या सोयीनुसार बदलायला पाहिजे. ते सर्व चालणार असेल तरच मान्य. नाही जमले तरी घाबरू नकोस मी चारपाच वेळा दक्षिणेला गेलेलो आहे. प्रवास, मुक्कामाचे हॉटेल, सगळी व्यवस्थित सोय होईल. गर्दी टाळूनच तर जात आहोत आम्ही." मी.

"हॉटेलचं बुकिंग तुम्ही केलं आहे का?" सचीन.

"नाही पण आयत्या वेळी बिनधास्त मिळेल. थेट गेलं की घासाघीस करता येते.  इथून केलं तर दोनदोन एजंट मध्ये येतात, बरेच पैसे पडतात. बाळूकाका घासाघीस करण्यात एक्सपर्ट आहे बरं का. त्याला कामाला लावीन की." मी.

"मी अगदी चांगली हॉटेलं स्वस्तात देतो तुम्हाला." सचीन.

"मग अस कर कोडाई, टेकडी आणि मुन्नार इथलीच हॉटेल्स तू बुक कर. बाकीची आम्ही बघू आयत्या वेळी. कोडाईला फार गर्दी असते आणि मुन्नारला शनिवार रविवारी पोहोचणार." मी.

"तिरूअनंतपुरमला पोहोचल्यावर तुम्ही थकलेले असणार. तिथे पण करतो." सचीन.

"ठीक आहे." पण दर अगोदर माझ्याकडून मान्य करून घे. एका नॉन एसी डबल ऑक्युपन्सीचा दर पाचशेहजारपेक्षा जास्त असता नये. आणि चेक आऊट टाईम चोवीस तासाचा असला पाहिजे. सकाळी आठ किंवा दुपारी बारा वगैरे चालणार नाही." मी.

माझ्या सूचनेप्रमाणे सचीनने चार ठिकाणची हॉटेले ठरवून उरलीसुरली चिंता दूर केली.

अखेर बारा दिवसांच्या दूर अंतरासाठी व्हॉल्वो बस आणि जवळच्या अंतरासाठी रिक्षा टॅक्सी याच्या अंतरानुसारच्या माझ्या अंदाजपत्रकापेक्षा सहा जणांसाठी वातानुकूलित गाडीला केवळ तीन हजार जास्त पडत होते. वर एक ठिकाण जास्त. कन्याकुमारीऐवजी त्रिवेंद्रम ऊर्फ तिरूअनंतपुरमला उतरायचे. तो दिवस हवे तर तिथे जवळपास फिरायचे. एक रात्र तिरूअनंतपुरम आणि दुसरे दिवशी सकाळी कन्याकुमारीला प्रयाण. टॅक्सी ठरवून टाकली. फक्त भाऊंनी एक गाढवपणा केला. सगळे पैसे अगोदरच देऊन टाकले. मी विचारले होते की गाडी सोडावी लागली तर? पण त्यांनी ते पैसे संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर दिले. निघण्यापूर्वीचे शेवटचे आठदहा दिवस ध्वनाध्वनी चालू होतीच.

मध्ये आणखी एक बदल झाला. मूळ बेताप्रमाणे येतांनाची तिकिटे काढली होती बंगलोरहून. केरळमधून दक्षिणेकडे उतरून मग तमिळनाडूमधून मदुराईवरून बंगलोरला रस्त्याने जायचा जो मूळ बेत होता तो बदलून मदुराईवरून कोडाई, मुन्नार करून टेकडीवरून सरळ अलेप्पी, तिथून जमले तर गुरूवायूर. तिथून कोचीनला जाऊन मुंबईला कोकणातून जाणारी रेलवेगाडी पकडायची असे ठरले. नवी कोचीन मुंबई तिकिटे काढून बंगलोर मुंबई तिकिटे रद्द केली. तीन दिवसांचा खर्च वाढल्यामुळे विमानप्रवासाला काटकसरीच्या नावाने पूर्ण फाटा दिला.

अखेर २६ जानेवारीला दुपारी चार वाजता बाळ्याचा दूध्व आला.

"अरे गाडी चुकली. मला व्हीटीला पोहोचायला उशीर झाला. गाडी चुकली." बाळ्या.

"ताबडतोब टॅक्सी करून लोणावळ्याला पोहोच. गाडी लोणावळ्याला नक्की मिळेल. मी मात्र ठरल्याप्रमाणे सफर पुरी करणारच." मी थंडपणे उत्तर दिले. ही शक्यता गृहीतच धरून मार्ग तयार ठेवला होता.

"हॅ हॅ हॅ हॅ!" आता जखिणीने विकट हास्य केले. "आम्ही गाडीत बसलो आणि गाडी सुरू पण झाली. पण गाडीचं टाईमटेबल बदलल. आता गाडी पुण्याला थांबणार नाही."

"तू जखीण असलीस तर मीही आग्या वेताळ आहे. मी गाडी थांबवणारच! हा हा हा हा" मी.

"आम्ही पुण्यात तुम्हाला गाडीत घेणारच नाही!"

"मी तुला बाहेर फेकून गाडीत चढणार. हा हा हा हा" मी.

अशा तर्‍हेने झकास सुरूवात झाली आणि आम्ही जानेवारी फेब्रुवारी २०११ मध्ये मंदिरे आणि पर्यटनस्थळे पाहात दक्षिण दौरा मस्त अनुभवला. त्या दौर्‍याच्या मस्त आठवणी ताज्या असतांनाच एके दिवशी मंदीरस्थापत्याबद्द्ल आणि कोणार्कबद्द्ल थोडेफार वाचनात आले. त्याबद्दल आमचे बोलणे अधूनमधून दूरध्वनीवरून, कधी महाजालावर होत असे. पुढचा दौरा कुठे करायचा याचे मनसुबे रचले जात होतेच. मध्ये एप्रिल मे मध्ये मी एकटा मित्रांबरोबर श्रीलंकेला जाऊन आलो. माझ्या चटोर मित्रांबरोबर गुण उधळून आलो असे जखिणीचे मत. त्यामुळे जखिणीचा जळफळाट फारच वाढला. मग ओरिसाबद्दल जालावरून, इथून तिथून माहिती जमवली. बारा दिवसांचा दौरा आखला. दूरध्वनीवरून बोलत दौर्‍याला थोडी कात्री लावून शेवटी नोव्हेंबर २०११चा ९ दिवसांचा मध्यम लांबीचा दौरा आखला. यावेळी श्री. व सौ. भाऊ येणार नव्हते. मुंबईवरून छत्तीसगढची राजधानी रायपूरला जायचे. तिथून रस्त्याने १७२ किमी. आहे ओरिसामधले नृसिंहनाथ मंदीर. मिळालेल्या माहितीनुसार भुवनेश्वरवरून मात्र ते ४८८ किमी. आहे. म्हणून रायपूरवरून. तिथून स्थलदर्शन करीत भुवनेश्वरला यायचे आणि परत घरी. अखेर ऑगस्टमध्ये तिकीटे काढली आणि जखिणीच्या छळातून सुटलो.

क्रमश: