ओदिशा - ३ : नृसिंहनाथ आणि हरिशंकर

१७-११-२०११.

चारच्या सुमाराला नृसिंहनाथ मंदिराच्या आवारापाशी पोहोचलो. राहायला इथे ओरिसा पर्यटन खात्याचे यात्री निवास आहे. अगदी गलिच्छ निघाले. मंदिराचे अतिथी निवास मात्र कमी वाईट निघाले. सकाळी गरम पाणी नाही पण विजेवरचा हीटर मिळेल म्हणाला. खोलीचे भाडे नाममात्र. रु. ३५०/-. मंदिराला देणगी पण द्या म्हणाला. जेवणाला हॉटेले नाहीतच. फक्त टपर्‍या. त्याही ग्रामीण. पण अगदीच गलिच्छ. स्वच्छतेचे तसे वावडेच. त्यापेक्षा मंदिरातच ‘भोग’ चे जेवण मिळते ते जेवा म्हणून अतिथी गृहाचा सेवक म्हणाला. जेवणाची वेळ दुपारी १२.०० आणि रात्री ८.००. मंदिरातल्या आवारात फलकावरही ही वेळ लिहिलेली होती.

पवित्र अशा गंधमादन पर्वतराजीत वसलेले हे मदीर आहे आहे. इथे गंधमर्दन असे म्हणतात.  इ.स. १३१३ साली पाटण्याचा गर्ग राजा बैजल सिंह देव याने या ऐतिहासिक मंदिराचा पाया घातला.

आता नृसिंहमंदीरमहात्म्य. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी जमुना कंधुनी नावाच्या एका साध्वीने ‘नृसिंह चरित्र’ नावाचे स्तोत्र रचले. या स्तोत्रात मार्जार केसरीची थोरवी वर्णिली आहे. मूषकासूर नावाचा एक दैत्य फार मातला होता आणि तो जनतेचा फार छळ करीत असे. विष्णूने मग मार्जार केसरी म्हणजे नृसिंहावतार घेतला आणि तो मूषकाला खायला धावला. परंतु बिळात शिरलेला मूषकासूर काही बाहेर येईना. बिळाची आणि बिळाबाहेर वाट पाहाणार्‍या मार्जारकेसरीच्या प्रतिमा आजही दिसतात. या पुराणकथेसाठी हे मंदीर ख्यातकीर्त झालेले आहे.

या भूमीत गाडल्या गेलेल्या परंतु त्या काळापासून दुष्ट शक्तीपासून जनतेचे रक्षण करणार्‍या नृसिंहाचे प्रतीक म्हणून हे मंदीर आहे. मंदिराबद्दल इतरही अनेक आख्यायिका ज्ञात आहेत.

सुमारे ४५ फूट उंच असलेले हे मंदीर दोन भागात विभागलेले आहे. सिंहद्वारातून आपण मंदिराच्या आवारात शिरतो.

सिंहद्वार

खाली स्वच्छ लाद्या. आत गेले की समोर मार्गिका. मार्गिकेच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला जगमोहन म्हणजे सभामंडप. डाव्या हाताला एनॅमलने रंगवलेली शिल्पे, एक झाड त्याभोवती पार, पारालाही लाद्या बसवलेल्या.

सहज मागे वळून पाहिले

सिंहद्वाराकडे आतून पाहतांना

मार्गिकेमधून सरळ गेल्यावर पुढे पुन्हा एक प्रवेशद्वार

पुढचे प्रवेशद्वार

तर डाव्या बाजूला उतरायला घाटाच्या पायर्‍या. खाली उतरणार्‍या घाटाच्या पायर्‍या आपल्याला नेतात दोन गोमुखातून येणार्‍या सुंदर झर्‍याच्या काठी. असे हे निसर्गसुंदर स्थान. मला मंदिराचा विसरच पडला. 

गोमुखातून येणारा झरा

झर्‍याच्या किनारी काही छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
झऱ्याकाठची शिल्पे आणि छोटी मंदिरे

आणि काही पुरातन मंदिराचे जीर्ण भग्नावशेष.
पुरातन मंदिरांचे भग्नावशेष

डोंगर उतारावर असल्यामुळे मंदिरात आपोआप मजले निर्माण झालेले. एवढी सुंदर मंदिरे का बरे सोडून द्यावी लागली असावीत? सोडून दिल्यामुळे पडली असावीत की पडझड झाल्यामुळे सोडली असावीत? की लुटल्यावर बाटवल्यामुळे अगोदर सोडली आणि मग पडझड झाली? की आक्रमकांनी फोडली? मार्गदर्शक उपलब्ध नव्हते, त्यामुळे काही कळू शकले नाही. इतिहासाच्या मौनामुळे क्षणभर खिन्न झालो.

पायर्‍या चढून मार्गिकेमधून पुढे येऊन पुढील प्रवेशद्वारातून सरळ समोर पाहिले तर मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे सरळ गेल्यावर डोंगराच्या कडेकडेने चढत चढत वळण घेत बर्‍याच पायर्‍या वरवर जातात. डावीकडे लहानसा धबधबा. या धबधब्यातलेच पाणी झर्‍याच्या रूपाने खाली गोमुखातून जात होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असे दृश्य. प्राचीनत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ल्यालेला, काहीसा राकट पण अस्सल रांगडा निसर्ग. 

तर मार्गिकेच्या उजव्या बाजूला गोलाकार पायर्‍या वर गेलेल्या. वर गर्भगृहावरचे वैशिष्ट्यपूर्ण रेखा देऊळ. या रेखा देऊळ ने आणि कोणार्क मंदिरानेच तर मला ओरिसाची भुरळ घातली होती.

गोलाकार वर जाणाऱ्या आणि रेखा देऊळ

रेखा देऊळ

रेखा देऊळ पाहून सार्थक झाले. मंडळीनी आत जाऊन दर्शन घेतले.

रेखा देऊळच्या बाजूला डोंगरातल्या दगडात खोदलेली काही शिल्पे. पण काही खास नव्हती. शिल्पांच्या बाजूने पण काही पायर्‍या वर गेल्या होत्या.

प्रग्राचे घड्याळ चूक आहे हे अगोदर आलेले आहेच.

या स्थळाचा जालावर मिळालेला महिमा आणि आमचे निरीक्षण खालीलप्रमाणे:

१. मंदिराच्या परिसरात कावळा दृष्टीला पडत नाही. आम्हालाही दिसला नाही.
२. नृसिंहाच्या जन्मदिनी नृसिंह चतुर्दशीला जमुना कंधुनीने अर्पिलेल्या कंदाचा नैवेद्य दाखवतात. आम्ही वेगळ्या दिवशी गेलो होतो.
३. दुर्मिळ अशा आयुर्वेदिक दिव्यौषधी इथे बारमास मिळतात. खरेच इथे ज्येष्ठिमध, अश्वगंध, ब्राह्मी, जटामांसी, शिकेकाई, पिंपळी, वगैरे आणि माझ्या ओळखीच्या नसलेल्या अनेक औषधी वनस्पती रस्त्यावर विकायला होत्या.
४. दररोज तसेच यात्रांच्या दिवशी इथे दुर्मिळ वनौषधींचा बाजार भरतो. असायला हरकत नाही.
५. इथून हरिशंकर पहाडावर ट्रेकिंग करीत जाता येते. नक्कीच जाता येते.
६. सुंदर गुलाब असलेली बाग इथे आहे. फक्त गुलाबाची नाही तरी फुलबाग मात्र होती. पण गुलाबाची बाग थोडे आजूबाजूला दुसरीकडे असू शकेल.
७. मंदिराच्या उत्पन्नाचा ५ टक्के हिस्सा हा खून झालेल्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वापरला जातो. ही प्रथा तेव्हांचे सहाय्यक आयुक्त श्री प्रमोद कुमार राऊतराय यांनी सुरू केली. गंमतच आहे. पण आमच्यापैकी कोणाचा खून न झाल्याने पडताळणी करू शकलो नाही.
८. गोवध, मांजर मारणे वा सर्पहत्या अशा पापांबद्दल प्रायश्चित्त देऊन पापक्षालन केले जाते. नक्कीच असणार. अशी संधी कोणता पुजारी सोडेल?
९. पिंडदान इ. कार्यासाठी या पवित्र ठिकाणाला छत्तीसगडची गंगा असे म्हणतात. शक्य आहे. आम्ही चौकशी केली नाही.
१०. दुर्मिळ अशी लालतोंडी माकडे इथे आढळतात. आहेतच. आमच्याबरोबर रात्रीच्या प्रसादाच्या जेवणाला यांनीच आमच्या पंगतीची सोबत केली.

११. इथे अष्टभुज गणेश आहे. वेळ कमी असल्यामुळे पाहिले नाही.
१२. अप्रतिम निसर्गसौंदर्य. निर्विवाद सत्य.
१३. अकरा जिवंत झरे आहेत. हे देखील आहेत. दोन तर मी प्रकाशचित्रात पकडले.
१४. औषधी वनस्पतींच्या लागवडीचे केंद्र इथे आहे. असायला हरकत नाही.
१५. थंडगार छाया असलेले विस्तीर्ण आवार आहे. निर्विवाद.
प्रेक्षणीय स्थळांची अंतरे खालीलप्रमाणे:
१. पैकमल ते नृसिंहनाथ ४ किमी.
२. सिंहद्वार ते मंदिर ० किमी.
३. मंदीर ते चलधार धबधबा ४०० मी.
४. मंदीर ते भीमधार ४२५ मी.
५. मंदीर ते सीताकुंड ५०० मी.
६. मंदीर ते मन्हुपांडव १.५ किमी.
७. मंदीर ते कपिलधार ४ किमी.
८. मंदीर ते सप्तधार ७ किमी.
९. मंदीर ते सत्यांब ९ किमी.
१०. मंदीर ते भीममध्व ११ किमी.
११. मंदीर ते सुखस्थळ (हॅपी पॉईंट) घाटमाथा १२ किमी.
१२. मंदीर ते शिकारस्थळ हंटिंग प्लेस. १३ किमी.
१३ मंदीर ते हरीशंकर १८ किमी.

रामायणातील कथेनुसार युद्धात मूर्छित झालेल्या लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती औषधी वनस्पती हनुमानाला ओळखता न आल्यामुळे हनुमानाने अख्खा गंधमादन पर्वतच आपल्या खांद्यावर उचलून आणला अशी कथा बहुतेक सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आलेले आहे. हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि जरी दुर्गम असले तरी इथे येतांनाचा प्रवास हा नयनरम्य आहे. आम्ही मात्र सीताकुंडदेखील पाहिले नाही. कुंड म्हटले की भाविक स्नान करून घाण करून ठेवतात. त्यामुळे तसे गिरीभ्रमण घडलेच नाही.

सध्याचे देवालय हे पापहारिणी या ओढ्याच्या उगमापाशी आहे. अतिशय प्राचीन अशा स्थळी हे मंदीर १४व्या शतकात बांधले. जगमोहनचे चार खांब साक्ष देतात की पूर्वीचे मंदीर ९व्या शतकात बांधले होते. हे चार खांब कुठले हे मला कळले नाही. तसा माहीतगार तिथे मिळाला नाही. प्रवेशद्वाराच्या सुरेख चौकटी ११व्या शतकातील आहेत. 

दुपारी वाटेतल्या हॉटेलातले काहीतरी पोटात ढकलले होते. डाळभात आणि बटाटा आणि कोबीच्या बेचव भाज्या. पण मसाले कमीच असल्यामुळे चालले. पापड सपक लागत होते. का ते कळले नाही. बाळी म्हणाली की ते जेवण राईच्या रीफाईन्ड तेलातले आहे. (जखिणींना सर्व काही कळते बरे का.) म्हणून त्याला स्वाद कसा तो नाहीच. तेव्हा कळले की पापड पण एवढा सपक का. 

असो.
समोर डोंगरात वर जाणार्‍या पायर्‍या चढून पुन्हा परत जातांना उतरायला एक तास लागतो. पवित्र अशा या यात्रास्थळी पादत्राणे घालायची परवानगी नसल्यामुळे नाजुक पावले असलेल्यांनी पावलांना इजा होऊं नये म्हणून पायात जाड मोजे घालावेत. अशा सूचना जालावर मिळाल्या होत्या. आम्ही मोज्यांच्या आत घालायला रबरी इनसोल घेतले होते. माझ्या तर बुटातच नेहमी असतात. पण आपल्या सभासदांनी चालणे तसे टाळलेच. त्यामुळे त्यांचा वापर करायची वेळ आली नाही. पायर्‍या चढून वर गेलो. दोनअडीचशे तरी पायर्‍या होत्या. मी जेमतेम एका दमात चढून गेलो. वीसेक मिनिटे सहज लागली असतील. मी पायरीवर बसून निसर्ग डोळ्यात साठवत होतो. बाकी मंडळी दर्शन आटपून मध्ये एक थांबा घेऊन जवळजवळ अर्ध्या तासाने हुश्श करीत पोहोचली. तिथे वर डोंगरमाथ्याजवळ दोनचार छोटीशी मंदिरे होती. वर डोंगरमाथ्यावर जाईपर्यंत कडूसे पडू लागले होते. त्यामुळे परत फिरलो. हवेतला गारवा देखील वाढत होता. पूर्वेला आलो होतो. त्यातून गर्द वनराई. सूर्य लौकरच मावळला होता.

उपलब्ध माहितीनुसार डोंगराच्या पलीकडच्या टोकाच्या उतारावर हरीशंकर मंदीर वसले आहे. दोन मंदिरांच्या मध्ये १६ किमी लांबीचे पठार आहे. पठार बौद्ध भग्नावशेषांमुळे भकास झालेले आहे. संशोधकांच्या मते हे भग्नावशेष हे परिमलगिरी या प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे आहेत. चिनी प्रवासी युआन च्वांग किंवा ह्युएन त्सॅंग याने या विद्यापीठाचा पोलोमोलोकिली असा या विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे. या पठारावरचा प्रवास तसा दीर्घच आहे परंतु इतिहासाच्या अभ्यासकांसाठी अविस्मरणीय असा आहे. सोबतच्या तिघांनाही १६ किमी. दूरवर पायी जाण्यात अजिबात स्वारस्य नव्हते. त्यामुळे मोटारीनेच हरिशंकर पाहून संबळपूरला जायचे असे ठरले.

रात्री भोग जेवायला मंदिरात गेलो. खोलीबाहेर पाहातो तो हवेत खूपच गारठा, जोडीला जोरदार वारा. पारा नक्कीच दहाखाली घसरला असावा. खोलीत जाऊन सगळेजण गरम कपडे घालून आलो. इतर लोकही गरम कपडे घालून, डोक्याला मफलर नाहीतर मुंडासे गुंडाळून आले होते. नोव्हेंबरमध्ये एवढी थंडी तर डिसेंबर जानेवारीत काय असेल? फरशीवर एका स्वयंसेवकाने झाडू मारला. धूळ जवळजवळ नव्हतीच. अतिथीगृहातले इतर चार आठ यात्रेकरू (तेवढीच सोय आहे, फार मोठे नाही. पाचसहाच खोल्या) देखील त्याच जेवणाला आले होते. फरशीवरच भिंतीला टेकून पंगत बसली. आम्हीही बसलो. पत्रावळी आल्या. वार्‍याने उडून जाऊं नये म्हणून पत्रावळ घट्ट पकडून ठेवावी लागत होती. गरमागरम वाफाळता भात ऍल्यूमिनिअमच्या एका छोट्या कढईएवढ्या भल्या थोरल्या डावाने वाढत होते. पुण्यामुंबईच्या पाचसहा मुदी भात एका डावात सहज मावला असता. फिका तपकिरी असा मळकट पांढरट रंगाचा स्थानिक गावठी भात. चवीला बरा होता. मी हिंदीत ‘हाफ’ म्हणून जेमतेम अर्धा डाव भात घेतला. आता मला हिंदीतून हसू नका. स्थानिक लोक दीडेक डाव घेत होते. मागोमाग गरमागरम डाळ आणि मिश्र भाज्यांचा दाट वाफाळता रस्सा आला. बटाटा, सुरणासारखा कोणतातरी एक कंद, कांदा, टोमॅटो, फरजबी वगैरे भाज्या होत्या. पण बिनफोडणीचा रस्सा. मसाले कळेल न कळेल इतपत. जेवण ठीक झाले. पंक्तीला माकडे टपून बसलेली होतीच. ताटातले अन्न माकडांनी आपल्या अगोदरच खाऊ नये म्हणून दोनचार स्वयंसेवक दंडुके आपटत उभे. थंडीमुळे कडकडून भूक लागली तरी पानातले सगळे काही मी संपवू शकलो नाही. माकडे खूष. पूर्वजांना खूष केल्याबद्दल मला नक्कीच पुण्य लाभले असावे. न आवडलेली एक गोष्ट करावी लागली. वरच्या प्रकाशचित्रात दिसणार्‍या बाजूच्या स्वच्छसुंदर ओढ्यात सर्वांसमवेत हस्तप्रक्षाळण केले.

१८-११-२०११.
हरिशंकरला जायला रिक्षा, सहा आसनी रिक्षा नाहीतर खाजगी गाडी पद्मपूरवरूनच मिळणार असे कळले. दुसरे दिवशी पद्मपूरहून खाजगी गाडी करून निघालो. एका टॅक्सीवाल्याने नकार दिला. कारण रस्ता नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या विभागातून जातो म्हणाला. खरेखोटे कळायला मार्ग नाही. बाळ्याला मराठीतून म्हटले अरे याला काहीतरी अडचण असल्यामुळे हा आता गाडी देऊ शकत नसेल. किंवा उगीचच घाबरवत असणार. मग पैसे जास्त मागायला मोकळा. नशीब दोघेच गाडी ठरवायला गेलो होतो. दुसर्‍या टॅक्सीवाल्याकडे गेलो. चांगल्या अवस्थेतली इंडिका गाडी होती. आमच्याकडे सामान फारसे नसल्यामुळे प्रश्न नव्हता. सामान सहज मावले.

आठव्या शतकात शैव आणि वैष्णव यांच्यात वितुष्ट आले होते. प्रबळ परधर्मीय आक्रमकांनाविरुद्ध या दोन पंथांना एकत्र आणण्यासाठी हरि = विष्णूचा एक अवतार आणि शंकर मिळून हरिशंकर या देवतेची निर्मिती झाली आणि दोन्ही पंथ एकत्र आले. हरिशंकर मंदीर नृसिंहनाथ मंदिराएवढेच सुंदर, काकणभर सरसच निघाले.

हरीशंकर मंदिराचे सिंहद्वार
हरिशंकर मंदिराचे सिंहद्वार

नृसिंहनाथमध्ये जमिनीवर फरशी आणि कोबा होता. इथे खाली फरशी तर वरच्या बाजूला मुख्य मंदिराजवळ काळा स्वच्छ ग्रॅनाईट. ठिकाण नृसिंहनाथसारखेच डोंगरावरचे आणि निसर्गरम्य, मन प्रसन्न, टवटवीत करणारे.
हरीशंकर मंदीर

हरिशंकर मंदिरातला हनुमान
हरिशंकर मंदिरातील हनुमान

इथेही सुंदर छोट्या धबधबयातून येणारा झरा
हरीशंकरचा झरा

त्यावर सुरेख पूल देखील
झऱ्यावरचा पूल

आणि देखणी शिल्पे
देखणी शिल्पे

मंडळींचे दर्शन आटोपले. मंदिराबाहेर मिठाई, चिकी, खेळणी, सरबते, खाद्यपदार्थ वगैरेंच्या टपर्‍यांच्या ओळीत छोटी संत्री, आवळे, बोरे, भाजी, वनौऔषधी वगैरे गावरान मेवा विकायला होता. पेरू छान होते. प्रसाद म्हणून तेच घेतले आणि निघालो.

संबळपूरच्या रस्त्याला लागूनच एक अभयारण्य लागले. तिथली हरणे.
हरीशंकरजवळची हरणे

संबळपूरच्या रस्त्यावर संबळपूरनजीक बुर्ला नावाचे एक छोटेसे शहर लागते. हिराकूड धरणाचे दुसरे टोक बुर्लाला आहे. म्हणजे नदीच्या एका किनार्‍याला हिराकूड तर दुसर्‍या तीरावर बुर्ला. बुर्लाला पोहोचतांनाच दिवेलागण झाली होती. बुर्ला अगदी छोटेसे शहर आहे. हॉटेल मिळाले तर तिथेच राहावे या उद्देशाने हॉटेले पाहिली. दोन बरी होती पण गरम पाणी मिळणार नाही म्हणाले. तिथे स्नानासाठी गरम पाणी वापरायची पद्धतच नाही. मी सोडून इतर तिघांनाही उन्हाळ्यातही स्नानासाठी गरम पाणी लागते. जीव द्यायचा झाला तरी थंड पाण्यात जाणार नाहीत. संबळपूर तिथून दहापंधरा किमी.वर आहे. मग साडेसात आठच्या सुमाराला संबळपूरला पोहोचलो. पहिलेच हॉटेल महामार्गाला लागूनच, माफक दरात आणि समाधानकारक हॉटेल मिळाले. तिथे मुख्य शहरात बसस्टॅंडला जायला रिक्षा स्टॅंड होता. जेवणाचे हॉटेल देखील बाजूलाच होते. ते साडेदहापर्यंत उघडे असते. पद्मपूरपासून १७४ मी. किमी. अंतर झाले होते. हिशेब करून मालकाशी भ्रमणध्वनीवरून बोलून ड्रायव्हरकडे उरलेले पैसे देऊन गाडी सोडली. नशीब आज मी कधी नव्हे ते रोखपाल होतो. पैसे देऊन उतरल्यावर बाळ्या बोलला अरे हजार रुपये कमी दिलेस त्याला. देऊन टाक त्याला. ऍडव्हान्स दिलेला त्याच्या लक्षातच नव्हता. मग मी आणि बाळीने त्याची भरपूर टर उडवली. थोडा वेळ आराम करून मस्त अंघोळ केली. आता रात्रीचे भोजन. बाजूच्या हॉटेलातल्या पदार्थांपैकी, डाळभात, भाजी, पराठे, आलू पराठे आणि मसाला डोसा हे पदार्थ ठीक होते.

राहायच्या हॉटेलच्या स्वागतकक्षातली माणसे हसतमुख आणि मदतीला तत्पर होती. कटक/भुवनेश्वरला जाणार्‍या बसेस मुख्य शहरातून मिळतात. ते या महामार्गापासून साडेतीनचार किमी. आहे. तिथे लक्ष्मी टॉकीज या भागातून कटक/भुवनेश्वरला आणि इतर ठिकाणी जायला बसेस सुटतात. तिथे टेंपोने जावे लागते. एकेका शहराची परिभाषा वैशिष्ट्यपूर्ण असते. टेंपो म्हणजे किंचित मोठी ऑटोरिक्षा. पुण्यात सहा आसनी असते तेवढी नाही. पण किंचित मोठीच. तिथे जायला भाडे रु. ४०.०० आणि रात्री आठनंतर दीडपट म्हणजे रु. ६०.००. पण संबळपूर कटक अंतर जवळजवळ २५० किमी. पेक्षा जास्त असल्यामुळे शक्यतो बसनेच जा. मात्र बसेस रात्रीच असतात. संबळपूरहून कटक/भुवनेश्वरला जायला रेलवे पण आहे. पण सामान घेऊन आम्ही पटकन चढून जागा कशी काय पटकावणार हा प्रश्नच आहे. गर्दी असेल नसेल सांगता येत नाही. अशी तपशीलवार माहिती त्यांनी दिली. खोलीवर येऊन निवांत झोपून गेलो.

क्रमश: