ओदिशा - ५ : भुवनेश्वर परिसरातील मंदिरे

२०-११-२०११
सकाळी जाग आली तेव्हा कळले की आपण बसमध्ये आहोत. बाहेर फटफटले होते. घड्याळात पाहिले. जेमतेम पाच वाजत होते. आणखी पूर्वेला आलो होतो. पुढचे येणारे शहर कटक होते. बसवाल्यांकडे हॉटेल, वाहन वगैरेंची चौकशी केली. कटकपेक्षा भुवनेश्वर बरे पडेल असे एक प्रवासी म्हणाला. हॉटेले जास्त चांगली आणि रेलवे स्टेशनशेजारीच असलेल्या बसस्टॅंडवरून पुरी, कोणार्कला जायला सतत सिटी बसेस उपलब्ध. एक निघायच्या आत दुसरी हजर असते. एक तासात पुरी आणि अडीच तासात कोणार्क. सकाळी जाऊन काय पाहायचे ते पाहून हवे तर संध्याकाळी भुवनेश्वरला येऊ शकता. खाजगी गाड्यापण तिथे भरपूर. जास्त पर्याय उपलब्ध.

कटक गाळल्यामुळे एक गोष्ट चुकणार होती. कटकमध्ये चांदीच्या तारेच्या अप्रतिम कलाकृती बनवतात. त्या कलेला फिलिग्री असे म्हणतात असे माझ्या वाचनात आले होते. ते पाहायचे आता राहून जाणार होते. परत आल्यावर गूगलवर filigree च्या थक्क करणार्‍या अप्रतिम देखण्या इमेजेस - प्रतिमा पाहिल्या आणि समाधान मानले.

सर्ररळ भुवनेश्वर गाठले. सेंट्रल बस स्टॅंडजवळ उतरलो. तिथे सगळीकडे जायला रिक्षा, बसेस उपलब्ध असतात. रिक्षा करून रेलवे स्थानकाजवळ गेलो आणि हॉटेल्सचा शोध सुरू केला. हवे तसे हॉटेल मिळेपर्यंत रिक्षा सोडायची नाही असे ठरले होते. आमची बस इथूनच पुढे गेली होती. पण ते बस पुढे गेल्यावर आम्हाला कळले होते. म्हणून रिक्षाची यातायात. असो. राज्याच्या राजधानीत ऐन रेलवे स्थानकाजवळ साताठशेपासून अडीच हजारापर्यंत बर्‍यापैकी डबल ऑक्युपन्सीज उपलब्ध. तशी स्वस्ताईच आहे इथे. हॉटेलमध्ये जाताजाताच एक खाजगी टॅक्सीवाला मागे लागला. भुवनेश्वरची मुख्य मंदिरे किती रुपयात दाखवणार म्हणून विचारले. साडेनऊशे रुपये, वातानुकूलन हवे असल्यास अकराशे. नंतर कळवतो म्हणून त्याचे कार्ड घेऊन ठेवले. माझ्या कपाळावर ‘पर्यटक’ असा शिक्का आहे की नाही कळत नाही. वर्षभर मालवणात कामानिमित्त धावपळ करीत फिरतो आहे. गिर्‍हाईक नको असलेले नंबरी दुकानदार पुण्याप्रमाणेच मालवणात देखील आहेत. बाजारातून चालतांना किल्ल्याच्या दिशेला गेलो तर फिरते विक्रेते अजूनही कधीकधी मला पर्यटक समजून मागे लागतात. असो.

हॉटेल हमरस्त्याला लागूनच असलेल्या इमारतींच्या मागच्या इमारतींच्या रांगेत होते. हमरस्ता आणि रेलवे स्थानकाच्या मधोमध. पायी पाच मिनिटावर रेलवे स्थानक. दोन्ही खोल्या दहा वाजता तयार होणार होत्या. तोपर्यंत पाच जणांची एक मोठी खोली स्नानाला वगैरे दिली. ती झकपक आणि उत्कृष्ट होती. स्नान करून खाली उतरलो. हॉटेलच्या स्वागतकक्षातल्या माणसाने टॅक्सी हवी का म्हणून विचारले. दर फलकावर लावलेले होते. भुवनेश्वर दर्शन साधी बाराशे आणि वातानुकूलित पंधराशे. आम्ही अगोदरच टॅक्सी ठरवली होती. मंदिरे स्थळे तीच. स्वागतकक्षातल्या माणसाने आम्हाला अनधिकृत टॅक्सी न घेण्याबद्दल धोक्याचा इशारा दिला. त्याच्या ओळखीनेच टॅक्सी घ्यायचा त्याचा आग्रह, नव्हे दुराग्रह होता. आम्ही ठरवलेल्या टॅक्सीवाल्याकडे ओरिसा पर्यटन खात्याचे अधिकृत ओळखपत्र होते असे सांगितल्यावर गप्प बसला. तसे ते मी खरोखर पाहिलेले होतेच. खरे तर टॅक्सीवाले ते आपल्याला अगोदरच दाखवतात. या हॉटेलवाल्याला बहुधा पर्यटकांवर दादागिरी करायची सवय असावी. मी ठाम, थोडासा आक्रमकच होतो, आम्ही मुंबईवाले आहोत आम्हाला व्यवहार चांगलाच कळतो असे थोडेसे उद्धटपणेच बजावल्यावर त्याने माघार घेतली. आम्ही न्याहारी पण त्यांच्याच रेस्तोरॉंमध्ये करावी असे देखील त्याचे म्हणणे होते. पण तिथे फक्त आम्लेट पाव वगैरे पदार्थ उपलब्ध होते. बाळ्या म्हणाला जिथे गर्दी असते तिथेच खावे. पदार्थ नक्की ताजेच मिळतात. आपण टॅक्सी बोलावली आहेच. तोच आपल्याला चांगल्या हॉटेलात नेईल. आम्हाला उडपी हवा होता. साडेनऊला टॅक्सी बोलावली आहे. आता दहा मिनिटात साडेनऊ होतील.

वेळेवर आलेल्या टॅक्सीवाल्याने अगदी जवळचाच पायी दहा मिनिटावरचा उडपी दाखवला. पदार्थ गरमागरम, बरे होते. गल्ल्यावरचा मालक गुजराथी होता. एक नवा गोड पदार्थ खाला. फूटभर व्यासाचा दोन इंच उंचीचा सपाट केकसारखा दिसणारा हलवा. त्याचे मध्यापासून कडेपर्यंत सुरीने त्रिकोणी तुकडे पाडून वजनावर देतात. दोनशे रु. किलो. एक तुकडा शंभर ग्रॅ. चा असतो. एक खाऊन पाहिला. आत मावा भरला होता. म्हणजे स्टफ्फ्ड मावा केक विथ मावा फिलिंग असे त्याचे वर्ण करता येईल. एक तासापूर्वीच बनवला होता. उत्कृष्ट निघाला. मग प्रत्येकाने एकेक तुकडा घेतला. दुसर्‍या दिवशी पण तोच राहिलेला हलवा तिथे होता. मग घेतला नाही. तिसरे दिवशी मात्र ताजा होता तेव्हा घेतला. असो. सव्वादहापर्यंत निघालो.

भुवनेश्वरला पाचशेच्या वर मंदिरे आहेत. बहुतेक सगळी प्राचीन असून त्या बहुतेक मंदिरात पूजापाठ अजूनही चालतात.

राजाराणी मंदीर
भुवनेश्वर. हे मंदीर ११व्या शतकातील आहे. या एका मंदिरातच भरपूर वैविध्य आढळते. पिवळसर वालुकाश्मामधील हे मंदीर १७.९८ मीटर उंच आहे. मंदीरस्थापत्याचा झालेला विकास इथे नाट्यपूर्ण रीतीने दिसून येतो. अमालकाभोवती आकाशाकडे जात असलेली चार टोके असलेल्या या मंदिराचे नाते खजुराहोच्या कंदारीय महादेव मंदिराशी जुळलेले दिसते. रेखा देऊळवरच्या नाजुक कंबरेच्या मानवी आकाराच्या बसलेल्या स्थितीतील आकृत्यातून कलावंताचे स्त्रीत्वाच्या सौंदर्याबद्दल असलेले वास्तव कौतुक दिसून येते तर आपल्या कलासक्त नजरेला एक संपन्न मेजवानीच मिळते. चार्लस फॅब्री म्हणतो इथे अनेक आश्चर्ये दडलेली आहेत.

राजा राणी मंदिराचे देखणे आवार.
राजा राणी मंदीर


राजा राणी मंदीर

राजा राणी मंदीर

प्रवेशद्वाराच्या दोन दगडी खांबांना कोरीव नागांनी विळखा घातला आहे. तस्सेच आणखी दोन खांब याच सभामंडपाच्या समोरून पाहातांना डाव्या बाजूला दिसताहेत. रेखा देऊळ च्या वरील जे चपट्या भोपळ्यासारखे आडवे चक्र आहे त्याला अमालक म्हणतात. त्याच्या भोवती जी वर आलेली टोके आहेत ते या मंदिराचे वैशिष्ट्य. चारपैकी दोन टोके पहिल्या प्रकाशचित्रात दिसताहेत, दोन पलीकडच्या बाजूला आहेत.

केदारेश्वर मंदीर, परशुरामेश्वर मंदीर आणि मुक्तेश्वर मंदीर ही बाजूबाजूलाच आहेत.

केदारेश्वर
केदारेश्वर शिव आणि गौरी यांचे हे मंदीर मुक्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. या मंदिराला हर्षविमोचन मंदीर असेही म्हणतात. केदार आणि गौरी यांच्या शोककारक प्रेमकथेवर आधारित असे हे मंदीर राजा ललतेंदू केसरी याने हे मंदीर त्यांच्या स्मरणार्थ बांधले अशी दंतकथा आहे.

केदार गौरी मंदीर

केदार आणि गौरी या प्रेमी युगुलाच्या प्रेमाला गांवकर्‍यांचा विरोध होता. म्हणून ते युगुल गांव सोडून निघाले. जंगलातून जातांना वाटेत गौरीला भूक लागली म्हणून केदार खायला काहीतरी आणायला म्हणून गेला. पण त्याला वाघाने मारून टाकले अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे. लुईस रोडने पूर्वेकडून किंवा हारामंदीर छाकातून पश्चिमेक्डून इथे जाता येते. मदिराची स्थापत्याची वैशिष्ट्ये तसेच शिल्पशैली यावरून ते इसवी सनाच्या ११व्या शतकातील सोमवंशी राजांच्या शासनकाळातले आहे हे समजते. याचा आराखडा पंचरथी आहे. यात ‘रेखा देऊळ’ आणि ‘पीढ जगमोहन’ आहे. मंदीर दक्षिणमुखी आहे आणि गाभार्‍याची उंची १३.७ मीटर आहे.

परशुरामेश्वर मंदीर
परशुरामेश्वर मंदीर

मंदीरस्थापत्य बाल्यावस्थेत. मुख्य मंदीर आणि जगमोहन कसेतरी जोडले आहेत. नंतरच्या मुक्तेश्वर मंदिरात हा जोड इतका कलात्मक आहे की जोड कळतही नाही.

मुक्तेश्वर मंदीर
भुवनेश्वर. ओदिशातील वालुकाश्मापासून बनवलेला मंदीरस्थापत्यातला एक सुंदर हिरा म्हणजे मुक्तेश्वर मंदीर असे एम एम गांगुली म्हणतात. मंदीर पाहिल्यावर यात अजिबात अतिशयोक्ती नाही हे लक्षात येते. खरे तर देखण्या मंदीरवास्तूंचा हा एक समूहच. हे मंदिर आहे इसवी सनाच्या १० व्या शतकातील. परंतु उत्तम रीतीने सांभाळून राखलेले आहे.  १०.५१ मीटर उंच असलेल्या या मदिरावरील प्रत्येक इंच अप्रतिम कलाकारीने
नटलेला आहे. ओदिशी मंदीरस्थापत्यशैलीला आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे वळण देणारे हे मंदीर कलेच्या अभ्यासकांना आणि रसिकांना खाद्य पुरवते. या मदिराबद्दल लिहावे तेवढे थोडेच. बाजूलाच छोटेसे तळे देखील. यात मुले माणसे डुबक्या मारीत होती.

मुक्तेश्वर मंदीर

मुक्तेश्वर मंदिराचा देखणा परिसर

सभामंडपावरील मेघडंबरीच्या छतावर आतून अप्रतिम कोरीवकाम केलेले आठ पाकळ्यांचे दगडी कमळ आहे. प्रत्येक पाकळीवर एका देवतेची प्रतिमा आहे. खरे तर मंदिरातली प्रत्येक वास्तू अप्रतिम अशा कोरीवकामाच्या नाजूक, रेखीव कलाकुसरीने नटलेली आहे.

हे शिवमंदीर असूनही मंदिरात नंदी नाही. गर्भगृहात मात्र शिवलिंग आहे. जगमोहनच्या पश्चिमेला प्रवेशद्वार आहे. मंदिराचे तोरण म्हणजे प्रवेशकमान हा पाषाणशिल्पाचा इथे असलेला एक अजोड नमुना आहे.
मुक्तेश्वरची प्रवेशकमान

असे तोरण अन्यत्र कोठेही नाही असे जालावर दिलेले आहे. परंतु मला वैतल मंदिरातही असे तोरण दिसले. त्याचे प्रकाशचित्र पुढे येईल. रेखा देऊळ आणि जगमोहन यांचा विकसित जोड देखील प्रकाशचित्रांकित करायचे राहून गेले. यावरील आसनस्थ स्त्रीआकृत्या आणि माकडांच्या तसेच मोरांच्या आकृत्या आपली दृष्टी खिळवून ठेवतात. स्वतंत्र भारतात हल्ली बांधलेल्या अनेक मंदिरात किंवा अन्यत्र असे तोरण बांधलेले दिसते. उदा. शेगाव येथील आनंदसागर. दहा शतकाहून जास्त काळ मुक्तेश्वराने पर्यटकांना सतत आकर्षित करून बराच काळ खिळवून ठेवण्याचे कार्य केले आहे.

या मंदिराची स्थापत्यशैली ओदिशात पुढे अनुसरली गेली आणि विकसित देखील झाली. कळस जास्त रेखीव, उठावदार बनले आणि उभ्या आधारस्तंभांवरील शिल्पांचा साजशृंगार वाढला. जगमोहनच्या छतावर देखील आणखी सजावट वाढली, त्यांना त्रिकोणी आकार मिळाला तसेच मुख्य मंदीर आणि जगमोहन यांचा जोड विकसित होऊन जास्त सौंदर्यपूर्ण झाला.

इथून गेलो धौलीला. धौलीकडे जातांना उजवीकडे एक डोंगर आणि थोडासा सपाट प्रदेश दिसतो. या भूभागात कलिंगची लढाई अशोकाने केली. अपरिमित हानी झाली आणि तो नरसंहार पाहून अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. काही इतिहासकारांचे असे मत आहे की बौद्ध धर्मीय प्रजेची संख्या तेव्हा सर्वात जास्त प्रमाणात होती म्हणून परधर्मी राजा त्या प्रजेला चालणार नाही तेव्हा लोकांचा धार्मिक उठाव टाळायला त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. हेच कारण जास्त तार्किक वाटते. 

धौलीचा स्तूप
धौलीचा स्तूप

तिथून परत येऊन लिंगराज मंदीर. लिंगराज मंदीर तिठ्यावर आहे. भ्रमणध्वनी, कॅमेरे वगैरे आत नेण्यास मनाई आहे. मंदिराभोवती फिरून प्रतिमाग्राहकात काही सापडते का हे पाहात काही वेळ हिंडलो
लिंगराज मडिराचा कळस

लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार
 लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार

आणि मंदिरासमोरून डाव्या हाताने जरा पुढे गेल्यावर डावीकडेच सायबर कॅफे आहे तिथे जाऊन बसलो.

लिंगराज मंदिराच्या तिठ्यावरून उजवीकडे जरा पुढे गेले की डाव्या हाताला बिंदुसागर सरोवर आहे.
बिंदुसागर सरोवर
 बिंदुसागर सरोवर

बिंदुसागर सरोवर

  बिंदुसागर सरोवरातील मंदीर
बिंदुसागर सरोवरातील मंदीर

सरोवराचा किनारा म्हणजे एक उकिरडाच आहे. बिंदुसागर सरोवराशेजारच्या उकिरड्यासमोरच आहे अनंत वासुदेव मंदीर
अनंत वासुदेव मंदीर

जरा पुढे गेले की वैतल मंदीर.

वैतल मंदीर
वैतल मंदीर

वैतल मंदीर

वैतल मंदीर: भुवनेश्वर. मंदीरस्थापत्य शैलीच्या दृष्टीने हे मंदीर वेगळे आहे. मंदीराचा पाया चौरसाऐवजी आयताकृती आहे. त्यामुळे रुंदीपेक्षा लांबी जास्त आहे. घुमटावर एकाऐवजी तीन शिखरे आहेत. उजव्या हाताला जे पडके शिखर दिसते ते एका भग्न मंदिराचे आहे. कालापहाड नावाच्या एका धर्मवेड्या सुलतानाने ती फोडली. कोणार्कचे मंदीरही त्यानेच पाडले अशी आख्यायिका आहे. ती नंतरच्या लेखांकात येईलच.

परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिरावरून आपल्याला कलिंग मंदीरस्थापत्याच्या विकासाचे टप्पे जाणवतात. इसवी सन ८०० साली बांधलेल्या वैतल मंदिरातून अगदी भिन्न शैली आढळते. कलिंग शैलीतील खाखरा पद्धत यातून दिसते. तांत्रिक पंथाच्या मंदिरातून ही पद्धत दिसते. मंदिराचा कळस पाहिल्यावरच चट्कन फरक ध्यानात येतो. कळस आयताकृती आहे. जगमोहनशी काटकोन करणारा. तत्कालीन घरांच्या शाकारून बनवलेल्या किंवा लाकडी छपरासारखा याच्या छपराचा आकार आहे. चैत्य कमानीचा नालाकार एक मोहक प्रतीक आहे. आता पंचाईत आली. मुक्तेश्वराच्या तोरणासारखेच तर हे दिसते आहे. फक्त शेंदूर किंवा शेंदरी रंग फासलेला. मग या प्रतीकात व त्या तोरणात काय फरक आहे बरे? हा प्रश्न ते पाहाण्याअगोदर पडला होता. तिथे जाऊनच पाहिले तरी कळले नाही. मंदीरात पूजापाठ वगैरे काही चालत नाही. बकाल परिसरातले मंदीर पूर्णपणे निर्जन होते. त्यामुळे कोणाला काही विचारायचा प्रश्नच आला नाही.

हे प्रतीक फक्त बांधकामात नव्हे तर सजावटीच्या शिल्पातही सर्वत्र आढळते. इथे छपराचा आतील भाग साधासरळ आहे तर इतर मंदिरात त्यावर शिल्पकलेची भरपूर कलाकुसर आढळते. मंदिराच्या आकारात फारसा फरक नाही परंतु इथल्या जगमोहनच्या चार कोपर्‍यालगत मंदिराच्या छोट्या प्रतिकृती व्यवस्थित ठेवलेल्या आढळतात. एका धावत्या दृष्टिक्षेपात विकसित झालेली शिल्पसजावटीची शैली आढळून येते. बारीक निरीक्षण केल्यावर मात्र शिल्पसजावटीतली काळी बाजू आणि मंदिराचे व्यक्तिमत्व ध्यानात येते. हिंदू आणि बौद्ध धर्मातील काही तांत्रिक तत्त्वे एकत्र करून इथे शक्तीची उपासना केली जात असे. या उपासनेत तपशीलवार मंत्रविधी, गुप्तविधी आणि पवित्र बळीची प्रथा विकसित केली होती. वैतल मंदिराच्या गर्भगृहाचा अंतर्भाग जवळजवळ पूर्ण अंधारलेला आहे. मोजक्या तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीतच इथले विधि उरकले जात होते असे मानतात. आदिशक्ती दुर्गेचेच एक तांत्रिक रूप चामुंडा ही इथली प्रमुख देवता आहे. अतिशय अंधुक प्रकाशात गळ्यात रुंडमाळा (मानवी मुंडक्यांची माळ) घातलेली, प्रेतावर बसलेली, एका बाजूला घुबड आणि दुसर्‍या बाजूला कोल्हा असलेली चामुंडेची प्रतिमा रंगवलेली दिसते. तिची अतिशय कृश अशी शरीरयष्टी, खोल गेलेले डोळे आणि खपाटीला गेलेले पोट डोळ्याना खुपते. नेहमी चाकोरीबद्ध वागणारे आदरणीय असे पुरातत्वखाते त्यांच्या भुवनेश्वरच्या मार्गदर्शिकेत म्हणते की सहन होणार नाही एवढे भयंकर असे तिचे रूप आहे पण त्याला आपण काही करू शकत नाही. माझ्या मते युद्धात असे भयंकर दृश्य, बली देतांना बलीने केलेला आक्रोश वगैरे भयंकर दृश्ये लहानपणापासून सतत पाहिल्यामुळे लढवय्या जातींचे मन कठोर, निबर व्हावे आणि मग युद्धात होणार्‍या अमर्याद हिंसेमुळे मानसिक धक्का किंवा दहशत बसू नये असा हेतू या शक्तीपूजेत असावा. आज जे सोशल इंजिनीयरिंग किंवा समाजाचे मनोरेखन करतात तसाच हा प्रकार असावा.

आंतील भिंती १५ वळचणींनी सजलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक प्रतिमा विचित्र आहे. गर्भगृहाच्या दरवाजातच आतील बाजूस चतुर्मुखी लिंग आहे. त्यावरही चित्रविचित्र प्रतिमा आहेत. त्यापुढे एक वधस्तंभ आहे. विशेषज्ञांच्या शब्दात येथील वातावरण ‘मनःशांती घालवणारे’, भंग करणारे आहे. पुरातत्व खात्याच्या थेट शब्दात सांगायचे झाले तर ‘विचित्र’ आहे. पूर्वेकडील बाहेरच्या बाजूला (सुदैवाने जिथे उजेड असतो त्या मागच्या बाजूला) सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे. संवेदनाक्षम आणि सुंदर चेहरा असलेली. त्याच्या दोन्ही बाजूला उषा आणि प्रत्युषा आहेत. पहाटेच्या जुळ्या भगिनी. अरूण त्याचा रथ चालवतो आहे. हे प्रतीक मनावर ठसते. कोणार्कच्या मंदिरात हेच प्रतीक विकसित केले आहे. ओदिशी कलेतील पहिली कामुक शिल्पे इथे आढळतात. मुख्य इमारतीवरील आत घुसलेल्या पटावर. असे सांगतात की या विशिष्ट मंदिरात चालणार्‍या खर्‍या तांत्रिक विधींचा हा तक्ता आहे. इथे सादर झाल्यानंतर त्यांना अधिकृत दर्जाची ताकद मिळाली. नंतरच्या शतकांत या शिल्पांना मंदिरावरील सजावटीचे शिल्पप्रकार म्हणून स्वीकारले गेले.

खोलीवर परत जातांना रस्त्याच्या उजव्या बाजूला रामकृष्ण मिशनचे मंदीर दिसले. आवार भरपूर झाडांची गर्दी वगैरे असून शांत आणि सुंदर होते. गेलो.
रामकृष्ण मिशन

आत मस्त नैसर्गिक गारवा होता.
रामकृष्ण मिशन

रामकृष्ण मिशन

शांत चित्ताने हॉटेलवर गेलो. आम्हाला दोन वेगळ्या खोल्या मिळाल्या होत्या. पण त्या सकाळच्या खोलीएवढ्या चांगल्या नव्हत्या. त्यामुळे उद्या हॉटेल बदलायचे ठरवले. फक्त पुरीला राहायचे की भुवनेश्वरला हा प्रश्न होता. उद्यासाठी गाडी पण ठरवायची होती. संध्याकाळी आराम करून राहायची हॉटेले पाहात आणि बसच्या चौकशा करीत फिरलो. बस रेलवेपलीकडच्या बसस्टँडवरून सुटतात. फलाटाचे - प्लॅटफॉर्म तिकीट काढून पलीकडे गेलो. सिटी बसेस खरोखरच सतत सुटत होत्या. पण फारसे नसले तरी सामान हलवायचे म्हणजे व्यापच. परत येतांना आश्चर्याचा गोड धक्का. फलाटावरच ओरिसा पर्यटनखात्याचे कार्यालय दिसले. पुरी, कोणार्क वगैरे सफरींचे दरफलकच लावले होते. वातानुकूलित व्हॉल्व्हो बसचे मार्गदर्शकासह सफरींचे भाडे पुरीला माणशी २२५/-, कोणार्क पुरी दोन्हीला मिळून २५०/- आणि चिल्काला ३५०/- त्वरित दुसरे दिवशींची कोणार्क पुरीची तिकिटे घेतली. तिसरे दिवशी चिल्काला जायचे ठरले. तिकीट उद्या मिळेल म्हणाला. खिडकीतला कृष्णा नावाचा आंध्रचा आतिथ्यशील गृहस्थ दाक्षिणात्य ढंगाने बर्‍यापैकी इंग्रजी आणि हिंदी बोलत होता. सकाळी साडेआठला रेलवेचे फलाट तिकीट न घेता या म्हणाला.

रेलवे स्थानकाकडून निघालेला रस्ता एका मोठ्या चौकात गोलापाशी हमरस्त्याला मिळतो. तिथे एका हॉटेलात अप्रतिम जेवण मिळाले. राहायचे हॉटेल पण होते. तसे बरे असावे. दर ठीक होते. पण ते दुसरे दिवशीपर्यंत भरले होते. दुसरीकडे कुठे मिळेल म्हणून आमच्या वेटरला विचारले. त्याने आमच्या हॉटेलच्या मागील बाजूच्या एका हॉटेलचा पत्ता दिला. बरे आणि माफक दरातले होते. फक्त गरम पाणी २४ तास नव्हते. सकाळी साडेसहा सातला येणार. पुढच्या दिवशीसाठी ऍडव्हान्स देऊन दोन खोल्या राखून ठेवल्या. या हॉटेलच्या समाईक गॅलरीतून रेलवे स्टेशन दिसत होते.

क्रमश: