ओदिशा - २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा

ओरिसा : २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा

१५-११-२०११.
आता वेध लागले होते ओरिसाचे. तिथल्या नागरी मंदीरस्थापत्यशैलीतल्या ‘रेखा देऊळ’चे. जालावरून, इथून तिथून सचित्र आणि चित्रविचित्र माहिती काढून सर्व सदस्यांना चित्रांसह वाचायला दिली होती. त्यमुळे सर्वांची उत्कंठा वाढली होती. गणपती, नवरात्रांचे धूमधडाक्याचे दिवस नेहमीप्रमाणे वाजतगाजत आले आणि गेले. दिवाळी पण नेहमीप्रमाणे वाजतगाजत आली आणि गेली. दिवाळीचे कवित्व केव्हाच संपले होते.  सहलीबद्दल ज्याला ज्याला कळे तो पहिला मलाच उलट सुनवायचा. अरे मूर्खा, रायपूर ओरिसात नाही, छत्तीसगडमध्ये आहे. आणि ओरिसात आहे काय बघण्यासारखे?  नेहमी आपले पूर नाहीतर दुष्काळ? खरे तर टकल्यानेही मला असेच म्हटले होते. त्यामुळे माझी बरीच करमणूक झाली. आपल्याला मूर्ख आणि स्वतःला शहाणा समजणार्‍या माणसाशी बोलतांना फार म्हणजे फारच मजा येते.

अखेर तो १५ नोव्हेंबर २०११चा नवलाचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे आमची जोडी पुण्याहून कल्याणला सातच्या सुमारास उतरली. रात्री ८.३५ ला आमची गाडी कुर्ल्याच्या लोटिट अर्थात लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणार होती. श्री व सौ बाळ्या नवी मुंबईहून लोटिटला पोहोचून गाडीत बसले की नाही हे पाहायला दूध्व लावला. ते रस्त्यावर होते. गाडी कल्याणला कोणत्या फलाटावर येते ते पाहायला गेलो. दर्शकावर म्हणजे इंडिकेटरवर आमच्या गाडीचा क्रमांक वगैरे काहीही दिसेना.  मग आकाशमार्गे चौकशी खिडकीत गेलो. आकाशमार्गे फक्त देवच आतात असे नाही. माझ्यासारखे दानवही जातात. पृथ्वीतलावर त्या मार्गांना स्कायवॉक म्हणतात. खिडकीतल्या गृहस्थाने बाजूच्या पाटीकडे निर्देश केला. अनेक गाड्यांचे बदललेले वेळापत्रक दिले होते. आमची ज्ञानेश्वरी एक्सप्रेस गाडी लोटिट वरून आज संध्याकाळ ८.३५ ऐवजी उद्या सकाळी ४.३० ला सुटणार होती.  तसे मुंबईच्या वर्तमानपत्रात छापूनही आले होते. पुण्याच्या मात्र साहाजिकच नाही. नव्या मुंबईच्या बाळ्याच्या वाचनात आले नाही. मेलो. प्रथमपदे अग्निरथविलाप.

तेवढ्यात बाळ्याचा दूध्व आला. त्याला सांगितले, आता प्रथम लोटिट वर चौकशी करून तिथून गाडी केव्हा सुटणार ते बघ. थांबायचे की घरी जायचे ते ठरव म्हटले. पाच मिनिटात सौ. बाळीचा दूध्व. तुम्हाला हवे तर घरी जा आणि अंडी घाला. गेलात तेल लावत. आम्ही ओरिसा बघणार म्हणजे बघणार. गाडी लोटिटवरून सकाळी ४.३० ला निघणार. तिच्या निर्धाराला मी मनापासून दाद दिली. उगीच तेलाचा खर्च नको. - पी.जे. - मी म्हटले कल्याणला हॉटेल मिळते का पाहातो. मिळाले तर कल्याणलाच राहातो. मिळेलच तसे. आकाशमार्गाने एक बरे झाले आहे. दूरवर व्यवस्थित चालत जाता येते आणि चाके असलेले बोजे चाकावरून चालवत नेता येतात. सुदैवाने आकाशमार्ग कल्याणला पण पोहोचला आहे. स्थानकासमोरच बरेसे हॉटेल मिळाले आणि सकाळी ४.०० ला आंघोळ करून निघायची सोय झाली. रात्री खायला घेतलेली पोळीभाजी होतीच. बाळ्याला तसे कळवले. तो जवळच्याच बहिणीकडे राहायला जाणार होता. हवे तर आम्ही दोघे देखील येऊ शकतात म्हणाला. तिचा मुलगा पहाटे ४.०० ला स्टेशनात आणून सोडेल म्हणाला. म्हटले आता हॉटेल मिळाले आहे, कशाला पुन्हा सामान घेऊन जायची यातायात. ताण निवळला आणि पुन्हा हास्यविनोद सुरू झाले. ‘आता कशाला उद्याची बात’ हे गाणे त्याला भसाड्या आवाजात भ्रध्ववर ऐकवले.

१६-११-२०११.
ठरल्याप्रमाणे सकाळी त्यांनी गाडी पकडली. पाचसव्वापाचच्या सुमाराला गाडी कल्याणला आली. बहुतेक लोक बिचारे आदल्या रात्रीपासून फलाटावरच होते. 

नाशिकला देखील न थांबणारी गाडी धडाडत वेगाने जात होती. ठरलेल्या वेळापत्रकानुसार दुपारी दोनला रायपूरला पोहोचणारी गाडी बराचसा वेळ भरून काढीत रात्री नऊला पोहोचली. सहलीच्या आराखड्यातला एकही दिवस वाया गेला नाही. उलट रेलवेगाडीत रात्र काढावी लागली नाही हेच मोठे. फक्त रायपूरसारख्या अनोळखी ठिकाणी दिवसा न पोहोचता रात्री पोहोचलो होतो. रायपूर स्थानकाबाहेर येतो न येतो तोच भोवती रिक्षावाले, सायकल रिक्षावाल्यांनी कोंडाळे केले. पायीच परिसरात फिरलो आणि दोनतीन हॉटेले पाहिली. राज्याची राजधानी असल्यामुळे हॉटेले तशी महागच असतील असे वाटले होते. माझ्या मागेमागे एक सायकल रिक्षावाला येत होता. अच्छा होटल दिखाता है म्हणून मागेच लागला. माणूस चालवत असलेल्या वाहनात बसणे मला माणुसकीला धरून वाटेना.
"साब सिर्फ दस रुपिया दो. मै होटलतक लेके जाके फिर इधर लाके छोडता हू." रिक्षावाला.

"होटल पसंत नही आया तो?" मी.

"पाचदस होटल दिखाता हूं. एक ना एक पसंत आयेगाही. पसंत नै आता है तो लेनेका नै जी. सिर्फ दस रुपिया दीजिए साहब." रिक्षावाला.

मी मनात म्हटले, पेट्रोलवरची रिक्षा उभी ठेवली तर पेट्रोल तर घालायला लागत नाही. पण रिक्षा चालो वा न चालो, याला बिचार्‍याला खायला तर हवे. समाजवादी विचाराने मात केली. अशाच समाजवादी विचारामुळे मी सप्टेंबरमध्ये विजापूरला गोलघुमट वगैरे फिरतांना पेट्रोलच्या रिक्षाऐवजी घोड्याचा टांगा केला होता.

सायकल रिक्षात बसलो.  काल आकाशमार्गाने जाणारा दानव आज सायकल रिक्षात! कलीयुग बरे कलीयुग. चार हॉटेले पाहिली. तिसरेच बरे आणि वाजवी वाटले. स्थानकापासून पायी दहाएक मिनिटांचे अंतर असेल. सामान घेऊन येतो म्हटले आणि निघालो.

रिक्षावाला म्हणाला आणखी एक सायकल रिक्षा घेऊ म्हणजे सगळे सामान येईल. शाकाहारी जेवण मिळेल असे स्वच्छ हॉटेल कुठे आणि किती वाजेपर्यंत उघडे असते अशी चौकशी केली. मारवाड्याचे स्वच्छ हॉटेल जवळ पायी जाण्याच्या अंतरावर आहे म्हणाला. बॉंबेवाले सब उधर ही खाना खाते है म्हणाला. त्याला विचारले तुला कसे कळले मी कुठला? तर म्हणाला आप आये वो गाडी बम्बईसेही तो आयी. इथले हिंदी मुंबईच्या रोखठोक बंबैया हिंदीपेक्षा जरा वेगळ्या वळणाचे पण आर्जव असल्यामुळे जास्त चांगले वाटले. मारवाड्याचे हॉटेल दहा वाजेपर्यंत उघडे असते. आता ९.२० झाले होते. सामान हॉटेलवर आणून आम्हाला खाण्याच्या हॉटेलवर नेऊन जेवण झाल्यावर पुन्हा सोडावे लागेल सांगितले.

हॉटेलमध्ये सामान ठेवले आणि ताजेतवाने होऊन भोजनास निघालो. भोजनाचे हॉटेल बरे होते. चालत जेमतेम पाच मिनिटावर होते. पण रिक्षावला कटकट करायला लागला. घरी जायला उशीर होतो, भूक लागली, कृपा करून जेवल्यावर तुम्ही चालत जा, वगैरे वगैरे. बाळ्या त्याच्याशी वाद घालायला लागला. मी म्हटले जाऊ दे ना. जेवल्यावर थोडे चालणे पण होईल. आपण दिवसभर बसून तर आहोत. दोन्ही रिक्षांचे किती पैसे झाले म्हणून विचारले. खूप सांगायचे म्हणून त्याने शंभर रुपये सांगितले. बाळ्या आणि आमची सौ वैतागले. त्यांच्या मते एका रिक्षाचे जायचे यायचे वीस आणखी दुसर्‍या रिक्षाचे दहा मिळून तीस. जेवणाच्या हॉटेलपर्यंत आणखी दहादहा मिळून पन्नास होत होते. मी शंभर देऊन टाकून मोकळे केले. सामानाचे भाडे त्यातच आले. आमचे मोठे सामान त्यांनीच उचलून नेले होते. तसे स्वस्तच होते. दहावीस रुपयांनी आपल्याला फरक पडत नाही. पण त्याला ते मोठे आहेत, शिवाय त्यांनी फुकटची हमाली देखील केलीच होती म्हणून त्यांना समजावले. मागच्या वेळी केरळमध्ये फक्त हमालीचे दीडशे मोजले होते याचीही त्याला आठवण करून दिली.

भोजनाचे हॉटेल छान निघाले. साधे पण रुचकर, शाकाहारी जेवण मिळाले आणि सगळे खूष झालो. हॉटेलतल्या सेवकांचा गणवेष वैशिष्ट्यपूर्ण होता. नवरदेव शोभेल असा वेष. अगदी मुंडावळ्यासकट.

रायपूरच्या हॉटेलातला नवरदेवसदृश सेवक

भोजनाच्या हॉटेलमधला सेवक. प्रतिमाग्राहकातले - प्रग्रा मधले (शब्दयोजना - श्री. विनायक रानडे) म्हणजे कॅमेर्‍यातले घड्याळ चुकीची वेळ दाखवत होते. मला लावताही येईना. म्हणून तारीखवेळ टाकली नाही.

जेवून झोपलो.

१७-११-२०११.
शुचिर्भूत होऊन तयर झालो. न्याहारीची चौकशी केली. श्री व सौ बाळूच्या आदल्या रात्रीच्या झोपेचे खोबरे झाले होते. म्हणून त्यांना उठवले नाही. साडेतीनला उठून चारसव्वाचारला लोटिटला येऊन गाडी पकडली होती. गाडीतही ते झोपले नव्हते. मी मात्र गाडीत मस्त झोप काढली होती. आमच्या हॉटेलच्या समोरच जरा पुढे बाजार होता. ताज्या हिरव्यागार, रसरशीत, टवटवीत भाज्या होत्या. बटाटे तांबडमाती लागल्यासारखे लालसर दिसत होते. फळे वगैरे खास नव्हती. कोरडी थंड नसली तरी आल्हाददायक हवा. ऊन तसे चकचकीत आणि नोव्हेंबरच्या मानाने कडकच. पंधरावीस मिनिटे फिरून बरे वाटले. हिरव्यागार भाज्या, लालबुंद टोमॅटो वगैरे बघून सौ. पण खूष झाली. परत खोलीवर गेलो. बाळ्या तयार होत होता. न्याहारी वरच्या जेवणघरात मिळू शकेल असे कळले. गेलो. तिथे एका हसतमुख सेवकाने तोंड भरून स्वागत केले. कुठून आलात वगैरे चौकशी केली. मुंबईहून म्हटल्यावर त्याच्या चेहर्‍यावर कौतुक उगवले. मस्तपैकी एक कडक चहा मारला. नाश्त्याला कायकाय आहे विचारले. गरमागरम आलू पराठा मिळेल म्हणाला. तेल कोणते वापरता म्हणून विचारले. देसी घी. रोटीतरकारी, पुरीभाजी वगैरे पण मिळू शकेल. पुरी पामोलीनमध्ये आणि भाजी रिफाईन्ड तेलात. कोणत्या ते सांगू शकला नाही. राईचे पण असू शकेल. तेव्हा आलू पराठा हाच खात्रीलायक पर्याय दिसत होता. पण सगळे आत्ता बनवायला सुरुवात करणार आणि अर्ध्या तासात मिळणार. म्हणजे ताजे गरमागरम पदार्थ आणि देसी घी. म्हणजे राईचे तेल नक्की नाही याची गॅरंटी. मग दुसरीकडे कशाला खा? खोलीवर जाऊन सगळ्यांची ऑर्डर घेऊन आलो. एकेक पराठा येईपर्यंत योगासने करून (योगासनांमुळे चरबी हटली तरी टक्कल मात्र कमी होत नाही बरे का) सर्वात शेवटी येणारा बाळ्या येईपर्यंत आमचे तिघांचे मस्त खाऊन झाले. 

मस्त गरमागरम आणि रुचकर आलू पराठ्याने दिवसाची छान सुरुवात झाली. दाट दुधाचा थोडासा जास्तच मधुर चहा देखील आम्हा सगळ्यांना आवडला. रायपूर रेलवे स्थानकासमोरच्या मंदिरात मंडळी गेल्यावर मी प्रग्रावर बरेच अत्याचार केले.

रायपूर स्थानकासमोरची वैशिष्ट्यपूर्ण पोलीसचौकी

रायपूर स्थानकासमोरील पोलीस चौकी

रायपूर स्थानकासमोरील सुरेख मंदीर
रायपूर स्थानकासमोरील सुरेख मंदीर

इथे नृसिंहनाथ म्हटले तर कोणाला कळत नाही. नरसिंगनाथ म्हटले की कळते. तर प्रग्रा म्यान करून नरसिंगनाथसाठी काय वाहन मिळते पाहायला गेलो. बस तीन वाजता होती. चार तासांनी सातला पोहोचते. अनोळखी ठिकाणी पोहोचल्यावर अंधारात काय हॉटेल शोधणार? बस जास्त सुरक्षित असते म्हणून प्रथम बसची चौकशी केली. दुपारी तीन अगोदर बस नव्हती. म्हणजे पोहोचायला सात. पूर्वेला असल्यामुळे जास्तच रात्र होणार. खाजगी टॅक्सी कुठे मिळेल त्याची चौकशी केली. पंधरावीस मिनिटात मंडळी परतली. दोघीजण हॉटेलात खोलीवर गेल्या आणि आम्ही दोघे टॅक्सी शोधार्थ.

रायपूरला मोठ्ठा टॅक्सी तळ - चुकलो टॅक्सी अड्डा आहे. शेकडो खाजगी टॅक्स्यांचा महासागरच तो. आमच्याभोवती टॅक्सीवाल्यांचा घोळका जमला. तिथे दर पुण्यामुंबईपेक्षा कमी आहेत. डीझेल रु. ४५/- च्या आसपास होते. टॅक्सीवाले पण नडलेले, नम्र आणि गरीब वाटले. आपल्याकडच्यासारखे माजलेले नाहीत. निदान त्या वेळी पर्यटनमोसम भरात नसतांना तरी. विना वातानुकूलन इंडिकासाठी मुंबईपुण्याला आठदहा रु. प्रति किमी. असतांना इथे कोण सांगे साडेसहा रु. प्रति किमी. तर कोणी म्हणे सहा. गाडीच्या नव्याजुन्या स्थितीवर, मजबुतीवर अवलंबून. वातानुकूलन हवे असेल तर दोन रुपये जास्त. एकाची गाडी नवी आणि आतूनबाहेरून, खालूनही चांगली वाटली. पण कॅरियर नव्हते. कॅरियरवाल्या टॅक्स्या तेवढ्या चांगल्या नाही वाटल्या. जुनाटच होत्या. ती नवीच ठरवली. ड्रायव्हर कम मालकाचे नाव होते गजभिये. नागपूरचा निघाला. थोडेफार मोडतोड मराठी पण येत होते. 

फारसे गरम होत नसल्यामुळे वातानुकूलन चालू केले नाही. रायपूर शहर पुण्यामुंबईच्या मानाने कमी गजबजलेले. इथले गाडी चालवणेही चांगले. पादचार्‍यांना, छोट्या वाहनांना, पादचार्‍यांना सांभाळून, अजिबात त्रास न देता व्यवस्थित सिग्नल देऊनच गाड्या पुढे जातात. मुंबईकरांनी, पुणेकरांनी रायपूरकरांपासून नक्कीच काहीतरी शिकायला पाहिजे. शहराबाहेर पाहावे तिथे शेतेच शेते. यंदा पावसाळा लांबल्यामुळे असेल, पण हिरवीगार. मध्येच शेदीडशे गाईगुरांचे मोठ्ठे कळप शेतात चरतांना दिसत. बाळ्या तुझे नातेवाईक बघ म्हणून सांगितले. त्यांच्यात मीच जास्त शोभून दिसेन असे बाळ्याचे म्हणणे पडले. संधी मिळाली तर तुला प्रथम शिंगाने उडवीन म्हणालो. एकदोन कळप रस्ता ओलांडत आडवे गेले. वस्ती फारच विरळ असावी. 

एकेठिकाणी जेवलो. भाजी कमी मसाले कमी तेल असलेली, पाण्यातच शिजवलेली होती. फारशी चव नव्हती. वाईटही नव्हती. सपक डाळभाताबरोबर खाल्ली. दुपारचे जास्त खायचे नव्हतेच. पापड फारच सपक लागला. का ते कळेना. नंतर केव्हातरी बाळीने रहस्यस्फोट केला की तो राईच्या रिफाईन्ड तेलातला होता म्हणून तसा लागतो. गरमागरम गुलाबजाम मात्र बरे होते. माझ्या बारीक अंगकाठीचे मनातल्या मनातच कौतुक करून मी भूक भागवायला हळूच चांगले चार हादडले. त्यामुळे नंतर गाडीत चालकाशेजारी बसूनही पाचदहा मिनिटांची डुलकी काढावी लागली.

क्रमशः