ओदिशा - ४ : झुकलेले शिवमंदिर आणि हिराकूड धरण

१९-११-२०११.
संबळपूरला काय पाहायचे ते ठरले होतेच. हिराकूड धरण आणि हुमा येथले झुकलेले शिवमंदीर. ते पाहून लौकरात लौकर कटक किंवा भुवनेश्वरला पोहोचायचे होते. त्या गाडीची किंवा बसची व्यवस्था देखील करायची होती. सकाळी न्याहारी मुख्य शहरातच करायची. मग फिरायला गाडी ठरवून बसेसची चौकशी करायची असे ठरले. ‘टेंपो’तून उतरलो तिथे ट्रॅव्हल कंपन्यांची कार्यालये हारीने लागलेली होती. शिवाय पदपथावर टेबले टाकून कार्यालये थाटलेली होती. जणु आठवड्याचा बाजारच. भाजीच्या टोपल्या आणि राशींऐवजी टेबले आणि टेबलावर तिकिटांची पुस्तके. रिक्षातून उतरल्याबरोबर बाजूलाच एक असेच टेबल टाकलेल होते. टेबलापाशीच्या त्या गृहस्थांनी लगेच आमच्यापाशी हिंदीतून चौकशी केली. कुठे जायचे आहे वगैरे वगैरे. महापात्रो नावाचा तो गृहस्थ विश्वासार्ह, आश्वासक वाटला. झकपक किंवा ऐटबाज वाटले नाही तरी किंचित गचाळच वाटणारे मध्यमवयीन, कनिष्ठ मध्यमवर्गीय पण भारदस्त व्यक्तिमत्त्व. कटक भुवनेश्वरच्या बसेसची फक्त सहा स्लीपर तिकीटे उपलब्ध होती. नव्याकोर्‍या वातानुकूलित व्हॉल्वोच्या तोडीच्या बसेस असतात असे म्हणाला. पण तिथे एकही बस दिसत नव्हती. फक्त ५००/- रु. आगाऊ द्या. बाकीचे बस बघून द्या. नाही आवडली तर पैसे परत. बस सुटेपर्यंत आम्ही थांबतोच. बस निघेपर्यंत उतारू मिळतात म्हणाला. कठीण परिस्थितीत बसमधले स्लीपर फारच धोकादायक असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यापेक्षा सीट्स बर्‍या. मी हवे तर दोन तास थांबतो. तुम्ही कुठेही चौकशी करा. सीट नाही मिळाली तर माझ्याकडून स्लीपरची तिकिटे घ्या. रु. २५०/- फक्त. २८२ किमी. अंतराला २५०/- रु. काही वाईट नव्हते. दहा रुपये आणखी कमी करून २४०/- करतो म्हणाला. हे ठीक होते. संबळपूर फिरायला खाजगी टॅक्सी पण त्यानेच मिळवून दिली. समलेश्वरी देवीचे मंदीर देखील पाहाच म्हणाला, फार सुंदर आहे. या देवीवरूनच शहराला संबळपूर हे नाव पडले. ओरिसा तसे गरीब राज्य असल्यामुळे दर बर्‍यापैकी कमी आहेत. आणखी एक गोष्ट त्याने पुढे सांगितली की अख्ख्या ओरिसात कुठेही आम्हाला काहीही अडचण आली तर मला जरूर फोन करा. मी बरीच वर्षे या व्यवसायात आहे. मंत्रालय, पोलीस, उद्योग, सगळ्या खात्यात आपली वट आहे. कोणत्याही खात्यात काम असले तर मला कळवा. मी यथाशक्ती मदत नक्की करीन. आम्हाला ओरिसाचे पर्यटन भरभराटीला आणायचे आहे, त्यासाठी फक्त नाव कमवायचे आहे. आणि मुंबईपुण्यातून, महाराष्ट्रातून, कुठूनही तुमचे मित्र वगैरे येणार असले तर माझ्याकडेच पाठवा. मी कशी सेवा देतो ते तुम्ही पाहाच.

त्याने टॅक्सी पाहून द्यायसाठी त्याचा माणूस आमच्याबरोबर दिला. एक थोडीशी जुनीच इंडिका होती. किंचित जास्तच आवाज करणारी डिझेल इंडिका. पण त्वरित चालू होणारी इंडिका. चारपाच वेळा बंद करून चालू करायला सांगितली. स्टार्टिंग ट्रबल नव्हता. आणि अंतर फारसे नव्हतेच. हुमा ३२ + ३२ = ६४ आणि धरणासाठी १७ + १७ = ३४. जेमतेम शंभर किमी. चालक चांगला असणे आवश्यक. गचाळ कपड्यातल्या काहीशा जास्तच नम्र चालकाने प्रथम न्याहारीसाठी एका मिठाईच्या दुकानात नेले. आपल्याकडे ब्रिजवासीचे असते तसे. ओरिसातल्या आमच्या नऊ दिवसाच्या वास्तव्यातली सर्वात उत्कृष्ट न्याहारी इथे मिळाली. मुंबईतल्या बृजवासीसारखे दुकान. ताजे गरमागरम आणि स्वादिष्ट समोसे, बटाटेवडे, कचोरी तसेच खमण, काला जामुन आणि ओरिसाची वैशिष्ट्यपूर्ण मिठाई, समोसे वगैरेसोबत मिळणार्‍या तिखट, गोड, लालहिरव्या चटण्या सगळे पदार्थ उत्कृष्ट. चालकाला दुवा देत आणि पदार्थांची चव जिभेवर घोळवीत दुसर्‍या एका टपरीवर चहापान करून निघालो.

हुमा येथील झुकलेले मंदीर पहाण्याची मला खूप उत्सुकता लागून राहिली होती. पिसाचा मनोरा एवढा जगप्रसिद्ध आहे तर हे मंदीर का होऊ नये असे कुतूहल मनात दाटले होते. संबळपूरपासून ३२ किमी. तर भुवनेश्वरपासून सुमारे ३१४ किमी.वर हुमा इथे हे झुकलेले शिवमंदीर आहे. महानदीच्या काठावर हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. संबळपूरचा पाचवा राजा बलियारसिंग याने ते बांधले. इथे एक दूधवाला (स्थानिक भाषेत गौडा) होता. रोज महानदी पार करून तो पलीकडच्या तीरावरील खडकावर नेऊन ठेवीत असे. रोज तो रतीब घालत असे आणि खडक ते दूध त्वरित पिऊन टाकत असे. या चमत्काराची कीर्ती चौफेर पसरली आणि त्याची परिणती तिथें मंदीर बांधण्यात झाली. हे यात्रास्थान असले तरी इथे विविध जातीचे मासे पाहाण्यास पर्यटक येतात. दरवर्षी शिवरात्रीला इथे डोंगराच्या पायथ्याशी बिमलेश्वराची मोठी यात्रा भरते.

येथील खास जातीचे मासे आहेत कुडो मासे. कुडो मासे हे शिवाच्या मालकीचे समजले जातात म्हणून कोणी खात नाहीत. हे मासे खूपच माणसाळलेले आहेत. मंदीराजवळ स्नान करणार्‍या यात्रिकांच्या हातून खाऊ देखील घेतात. पवित्र दिवशी कांही माशांची नावे घेऊन त्यांना बोलावून प्रसाद दिला जातो.

आता मुख्य आकर्षणाबद्दल. झुकलेले मंदीर. ओरिसा पर्यटन खात्याने केलेल्या तपासानुसार मंदीर झुकण्याबाबतच्या त्यांच्या प्रश्नांना कोणीही समाधानकारक उत्तर देऊं शलेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य मंदीर एका बाजूला झुकले आहे तर इतर उपमंदिरे विरूद्ध बाजूला. मंदिराच्या आवारातील प्रत्येक वास्तू झुकलेली आहे. गेल्या ४०-५० वर्षात झुकण्याचा कोन बदललेला निदान नुसत्या डोळ्यांना तरी दिसत नाही असे म्हणतात. गावकर्‍यांकडून तसेच पुजार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरे तर इटलीतील पिसाला आहे तशी अचूक कोन मोजण्याची यंत्रणाच इथे नाही. त्यामुळे कोन नक्की बदलला की नाही हे कळत नाही. परंतु याला काही तरी भूगर्भीय कारण असणारच. भूस्तर वेडावाकडा असू शकेल. ही सगळी होती मिळवलेली माहिती. कदाचित चमत्काराच्या प्रसिद्धीसाठी मंदीर मुद्दामच ओळंब्याशी कोन करून बांधले असेल.

पण मंदीर पाहिले आणि विरस झाला. भव्यता अजिबात नाही. जेमतेम चारपाच मजली इमारतीएवढी उंची. परिसर तसा उजाड, अनाकर्षक आणि थोडाफार बकालच. मंदिराचे रचनासौंदर्य कुठे जाणवले नाही. हिंदू धार्मिक यात्रास्थानी पूर्वी हमखास आढळणारा गचाळपणा अजूनही इथे आहे. आकर्षक रंगरंगोटी सोडा, साधी स्वच्छता देखील समाधानकारक नव्हती. पर्यटक इथे का आणि कशाला पुन्हा येतील? आमच्याखेरीज एकही पर्यटक आढळला नाही. होते ते फक्त बोटावर मोजण्याइतके स्थानिक दर्शनेच्छु. तेवढाच गर्दीचा ताप टळला. पण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तशी निराशाच पदरी आली.


हुमाचे शिवमंदीर

हुमा येथील झुकलेले मंदीर.
 
जेमतेम एक महिन्यापूर्वी इथे पूर येऊन गेला होता हे खरेच वाटेना. नोव्हेंबर महिन्यात देखील नदीचे पाणी वाहाते नव्हते. कुडो मासे दिसले नाहीत. खडकाळ पात्रापलीकडे

खडकाळ पात्र

खडकाळ पात्र

झाडांचा एक आकर्षक पुंजका तेवढा दिसत होता. कुडो मासे दिसले नाहीत. पाहावेसे देखील वाटले नाही.
झाडांचा पुंजका

मत्स्यकन्येचे किंवा मत्स्यदेवतेचे एक शिल्प मात्र सुंदर होते. या शिल्पाबद्दल किंवा गेल्या लेखांकातील हरिशंकरच्या मगरीचा जबडा उघडणार्‍या स्त्रीशिल्पाबद्दल कुणी माहिती देऊ शकले नाही. पण त्यामागे एखादी आकर्षक दंतकथा नक्कीच असणार.

मत्स्यकन्येचे शिल्प

महापात्रोशेठनी शिफारस केलेले समलेश्वरी मंदीर मात्र स्वच्छ आणि सुरेख निघाले. शिफारस अगदी योग्य होती. नंतर रात्री ते बसवर भेटले तेव्हा त्यांचे आभार मानले.

समलेश्वरी मंदीर

समलेश्वरी मंदीर

या शिल्पात हत्तीच्या पाठीवर सिंह दिसतो आहे. हत्ती म्हणजे बौद्ध धर्मावर सिंहाने म्हणजे हिंदु धर्माने विजय मिळवला आहे असा या प्रतीकाचा अर्थ आहे. आद्य शंकराचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातून बौद्ध धर्माचे जवळजवळ उच्चाटन केल्यानंतरचे हे प्रतीक आहे. हे प्रतीक ओरिसात पुढे जागोजाग दिसले.

हिंदूंचा बौद्धांवर विजय

हुमाहून संबळपूरला परत येऊन भोजन केले. थाळी होती आणि पुरीभाजी, पुलाव देखील होता. आमच्या बाजूच्याच टेबलावर साडेचार पावणेपाच फुटी इवल्याशा पण उत्साही अशा तीन कॉलेजकन्यका आल्या. त्या हॉटेलच्या बकाल वातावरणात त्यांच्या हास्यविनोदाने रंग भरला. पण बंगालीसदृश त्या भाषेतले काही कळले नाही. त्यांनी थाळ्या मागवल्या. थाळी कशी असते ते पाहिले. दीडदोन फूट व्यासाच्या दोन अडीच इंच खोल थाळीत किंवा परातीत दीडदोन इंच उंचीचा स्थानिक बुटक्या भाताचा दोन वाट्या ठेवता येतील एवढी जागा सोडून चेपून भरलेला सपाट थर. त्यावर दिसेल न दिसेल इतपत वरण. मोकळ्या जागेत ताटातच जेमतेम वाटीभर दाट मिश्र रस्साभाजी. वरणभातावर एक तळलेला पापड. अन्न साधे, हलके असले तरी एवढा भात त्या किरकोळ देहयष्टीच्या मुली कशा संपवणार असा गहन प्रश्न मला पडला. पण जेमतेम आठदहा मिनिटात त्यांनी त्या थाळ्यांचा फन्ना उडवला. काय ते आम्हा मुंबईकरांचे नाजूक खाणे. प्रियांकाने पोटबीट बिघडू नये म्हणून पुरीभाजी आणि पुलावच पसंत केला. सौ. बाळीचे पदार्थांच्या चवीच्या बाबतीत अंदाज चुकत नाहीत याची पुन्हा एकदा प्रचीती आली. किंवा जखिणींना उपजत अंतर्ज्ञान तरी असावे.

आम्ही भर बाजारात होतो. वाटेत साड्यांची दुकाने लागली. ओरिसी रेशमी साड्या सर्वात महाग असतात अशी माहिती एके काळी शिंपी दुकानदार असलेल्या बाळ्याने दिली. सहज चौकशी केली. चांगल्या पण फारशा उंची नसलेल्या पण अप्रतिम रंगभूषेने आणि वेलबुट्टीने युक्त अशा साड्या दोन हजाराच्या वरच होत्या. कापडाच्या बाबतीत सेवानिवृत्त शिंपी बाळ्या कधीच चुकत नाही. बाकी सगळ्या वस्तू अतिशय स्वस्त असलेल्या या राज्यात साड्या मात्र फार महाग आहेत. व्यापारी लोक काय करतील त्याचा काही नेम नाही.

आता धरण पहायला तय्यार. इथे मात्र रंगीबेरंगी कपडे घातलेल्या पर्यटकांची माफक गर्दी. वातावरण उत्साहाने भारलेले. नोव्हेंबर महिन्यातले दुपारचे ऊन तापले तरी तसे सौम्यच होते. जलाशयामुळे हवेत सुखद गारवा. दिवस कारणी लागला.

हिराकूड धरजवळचा नेहरू मनोरा.

नेहरू मनोरा

इथून पुढे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रकाशचित्रे काढायला मनाई आहे. तशी पाटी उडिया, हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेली आहे. पण पर्यटक सर्रास आपापले भ्रमणध्वनी सरसावून एकमेकांचे फोटो घेत होते. घातपाताच्या धोक्याचे आणि सुरक्षितता नियमांचे गांभीर्य ना पर्यटकांना, ना पहारेकर्‍यांना. अशा सुपुत्रांना जन्म देणार्‍या भारतमातेचा विजय असो!

मीही मग पाहारेकर्‍यांचा डोळा चुकवून मनोर्‍यावरून हळूच एकदोन प्रकाशचित्रे टिपलीच. धरणाअलीकडे आणि पलीकडे असलेल्या पाण्याच्या पातळीत केवढा हा फरक.


हिराकूड धरण

त्या उत्फुल्ल वातावरणातून पाय निघत नव्हता. पण निघालो (पायांसह बरे का) आणि खोलीवर जाऊन आराम केला. मग सामान बांधून तयार ठेवले. रात्री साडेदहाची बस होती. स्नान करून सौ. बाळी ऊर्फ प्रियांकाच्या पसंतीचे भोजन केले. गेल्या वेळी भाऊ आग्रह करून खायला घालत होते. या वेळी ती भूमिका प्रेमळ आणि अगत्यशील जखिणीने आपल्या उलट्या शिरावर घेतली होती. भोजन करून टेंपोने लक्ष्मी टॉकीजला बस पकडायला गेलो. उत्साहाने भारलेले महापात्रोशेठ हजर होते. काही व्यक्ती आपला ठसा उमटवून कायम आपल्या स्मरणात राहातात. तसेच हे निघाले. जरी तो त्यंच्या व्यवसायाचा भाग असला तरी. पुन्हा केव्हा गेलो तर त्यांच्या मार्फतच फिरेन. खरेच सगळ्या बसेस भरलेल्या होत्या. मागच्या कुठल्यातरी दोनचार सीट्स शिल्लक होत्या. एअर कुशनची वातानुकूलित बस खरेच दणकट, स्वच्छ आणि कोरी करकरीत निघाली. व्हॉल्व्हो नाही हे सांगितले तरच कळत होते. तिकिटाचे उरलेले पैसे देऊन निघालो.

क्रमशः