गल्लीत शेवटी राहणारी मुलगी

       मी अकरावीत गेलो आणि ती नववीत गेली. तिच्या आईची आणि माझ्या आईची तोंडओळख. माझ्या आईला पाककृतींचं पुस्तक परत करायला आली होती. तसं तिला अगदी लहानपणी पाहिलं होतं. त्यानंतर आताच पाहात होतो. तिला पाहून मला आमच्या अकरावीच्या वर्गातल्या मुली आठवल्या. जेव्हा मी वर्गात असतो आणि त्या मुलींना पाहतो तेव्हा मला ती आठवते. ती आमच्याच कॉलनीत राहते पण गल्लीत शेवटी.
        माझ्या एफ.वाय.च्या वर्षी एकदा मी बसस्टॉपवर उभा होतो. अकरावीचं कॉलेज संपवून घाईघाईत ती तिथे आली होती. "आपल्या कॉलनीला जाणारी बस गेली का रे?" असे तिने म्हणताच मी म्हणालो होतो, "अजून गेली नाही." तिने जो निःश्वास टाकला होता त्याचा आवाज अजून माझ्या कानात आहे. हसली. ती अकरावीला गेली यात मला काहीतरी मिळवल्यासारखं वाटलं. बरेचदा वाटायचं, माझी आई केव्हा ना केव्हा तरी तिच्या आईला एकदा हे सांगेल की, तिला काही अडलं तर विचारू दे आमच्याकडे येऊन. सांगितलं होतं की नाही, माहीत नाही. तीही कधी आली नाही आपणहून पण मी मात्र स्वतःचा अभ्यास तयार ठेवत असे. तिने निराळ्या कॉलेजला ऍडमिशन घेतली. मी जो क्लास लावला होता त्याच्या चौकशीला ती येऊन गेली होती पण तिने दुसराच क्लास लावला. अकरावीतच तिने जीन्स घालायला सुरुवात केली.   
          ती एफ.वाय.ला गेल्यावर बारावीत दिसायची त्यापेक्षा जास्त सुंदर दिसू लागली. आमच्याकडे जुना कॅमेरा होता तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी याच सुमारास केला. सायकल जाऊन तिच्या हाती टूव्हीलर आली. मला फार बरं वाटलं. तिचे कॉलेजला जायचे कष्ट वाचले होते. तिचे वडील मला चित्रपटातल्या नायिकेच्या वडिलांसारखे वाटत. मीही टी.वाय.ला गेलो होतो. या वर्षी कसा कोण जाणे, मी खूप दिवसांनी क्रिकेट खेळू लागलो. खेळताना एकदा उल्हासने उंच शॉट मारला. बॉल तिच्या घराच्या बागेत पडून गुलाबाच्या रोपावर पडला. उंच शॉट मारायचे नाहीत, असा नियम असूनही उल्ल्याने मारला होता. ती बागेतच कुठेतरी होती. तिने बॉल आणून दिला आणि रोपाच काय झालंय, पाहायला गेली. त्यानंतर मी सगळ्या टीमला सांगितलं, हे असले शॉट मारायचे असतील तर मी खेळणार नाही आणि माझा बॉलही मिळणार नाही खेळायला. खेळ संपल्यावर तिला विचारायला गेलो, रोपं खराब झाली का म्हणून. म्हणाली, "एकच पाकळी वाकली.. बाकी काही सगळं फूल पाहण्यासारखं आहे." प्रतिक्रिया न देता मी बाहेर पडलो.  टी.वाय. च्या आसपास माझ्या मित्रांचं कुठेतरी काहीतरी सुरु झालं होतं. त्यांच्याकडून काही काही कानावर येई. "च्यायला, तू कसा राहिलास असा ?" असं मला ग्रुपमधल्या एकाने म्हटलं होतं. मी काहीही बोललो नाही. याच वर्षी आईने एकदा तिच्या आईला एक निरोप सांगायला मला तिच्या घरी पाठवलं होतं. निरोप आज आठवत नाही पण तेव्हाही तो खूप प्रयत्नांनी लक्षात ठेवला होता. कारण मला दुसऱ्याच काही गोष्टी पाहायच्या आणि लक्षात ठेवायच्या होत्या. दार तिनेच उघडलं. तिची आई नव्हती. तिने न सांगताच मी बसलो. तिने "पाणी देऊ  तुला?" असं विचारलं. सहसा मुली "पाणी घेणार?" किंवा " पाणी हवंय ?" किंवा असं विचारतात. तिच्या घरापर्यंत मी एका मिनिटात पोचलो होतो. तरीही, तिने पाणी विचारलं होतं. मी ते पाणी खूप वेळ पीत राहिलो होतो. निरोपाचा वेळ फार कमी होता. "कोणत्या भाषा शिकवतात कॉम्प्यूटर क्लासमध्ये ?" असं तिने विचारलं होतं. मी तिला स्वतःहून माझ्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं पण तिला सगळी माहिती होती. मी तिला क्लासबद्दल सांगितलं. निघताना माझ्या लक्षात आलं की, समोरच्या टीपॉयवर एक बुध्दिबळाचा डाव रंगलेला आहे. शेजारी काही मारलेली प्यादी पडली आहेत. कोणीतरी तिच्याबरोबर खेळत असावं, असं वाटलं पण दुसऱ्या व्यक्तीची चाहूल मी निघेपर्यंत लागली नाही. तिला बुध्दिबळात इंटरेस्ट आहे? मी चमकलो होतो. तिच्या बाबतीत मी काळा आणि पांढरा रंग कधी कल्पनेत आणला नव्हता. त्या सोंगट्या, त्या चाली आणि ते डावपेच आणि ती यांचा सांधा जुळवण्याचा प्रयत्न बराच केला. 
     एकदा घरी पाहुणे आले होते तेव्हा त्यांना सगळी कॉलनी फिरवायला घेऊन गेलो. गल्लीच्या टोकाशी आलो तेव्हा ती तिच्या मैत्रिणींशी बोलत होती. आम्ही दिसल्यावर त्यांचं बोलणं थांबलं. आम्ही तिथून हलल्यावर ती आणि दोघी मैत्रिणी माझ्याकडे पाहत होत्या, हे मी पाहिलं. माझ्याबद्दल बोलत आहेत का, अशी शंका आली. अशा शंकांची उत्तरे मला कधीच मिळाली नाहीत.
    पोस्ट ग्रॅज्युएशनला मी अडमिशन घेतली. एफ.वाय. पासून पोस्ट ग्रज्युएशनपर्यंत हेमंत माझ्याबरोबरच आहे. एकदा त्याने मला विचारलं होतं, 
     " काय रे, कोण कशासाठी आवडतं याला नियम असतात का ?" 
     " नसावेत." 
      "जे आत्ता आवडतं ते नंतरही आवडेल याला गरंटी काय?"
     "काहीच गॅरंटी नाही."
      हेमंत बराच वेळ पाहात राहिला होता. हेमंतने त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाच्यावेळी भावाने मुलगी कशी पाहिजे याच्यावर केलेली चिकित्सा सांगितली.  पोस्टग्रॅज्युएशनही संपलं. त्यानंतर तीन वर्षे गेली. मी एका नोकरीलाही लागलो.  
      काही दिवसांनंतर एकदा संध्याकाळी घरी आलो तर तिची आई बसलेली होती. मी हसून आत गेलो. तोंड धुवून बाहेर आलो तर काकू घरी गेलेल्या होत्या. माझ्या आईने सांगितले की, तिचं लग्न ठरलेलं आहे. तिचा होणारा नवरा, सासरची माहिती दिली. मी त्या रात्री जाऊन रस्त्यावर उभा राहिलो. ती सासरी गेल्यावर ज्या रस्त्यावरून ती इतके वर्षे आली आणि गेली त्या रस्त्याचं काय होणार, असं वाटलं. लग्नाच्या दिवशी ती कशी दिसते, हे मला पाहायचं होतं. लांबून पाहून घेतलं. तिचं अभिनंदन केलं. नवऱ्याशी ओळख करून देताना ती म्हणाली, हा माझा... 
     जेवून घरी परतेपर्यंत ‘माझा’ हा एकच शब्द मनात रेंगाळत होता. पाण्यावर पान तरंगावं तसा. ‘माझा’ च्या पुढचे शब्द कोणते होते, या माहितीची मला गरज नव्हती.  लग्नातल्या जेवणानंतर मला सगळ्यांची नजर चुकवून दोन विडे घेण्याची सवय आहे. ‘माझा’ शब्दाचं विड्यात रुपांतर होऊन तो विडा मी नेहमीपेक्षा जास्त वेळ चघळावा, असं वाटलं. रुखवतात बुध्दिबळाचा सेट वगैरे आहे की काय, एकदा बघून घ्यावं असं वाटलं.   
     तिच्या लग्नानंतर खूप दिवसांनी रात्री जेवून मी वाचत बसलो होतो. त्या ठिकाणाहून तिचं घर दिसतं. लांबून दिसतं पण दिसतं. सहज पाहिलं तर ती होती. माहेरी आली होती. आता ती शिडशिडीत राहिलेली नव्हती.    
     खूप महिने झालेत. मी क्रिकेटही खेळलेलो नाही. माझ्याकडचा बॉल एका कोपऱ्यात पडून आहे. माझ्या लग्नाच्या गोष्टी घरात सुरु झाल्या आहेत. चार मुलीसोबत कांदेपोहे कार्यक्रम झालेला आहे. अंतिम निर्णयाआधी आज त्यापैंकी एका मुलीला भेटायला चाललो आहे. कुठेतरी जाईन. बागेत किंवा हॉटेलमध्ये. हल्लीच्या पध्दतीप्रमाणे ती कदाचित् मला विचारेलच, तुझं आधीचं काही....
     उत्तर द्यायची वेळ माझ्यावर नक्की येणार आहे.  
- केदार पाटणकर