चिंता करी जो विश्वाची ... (६)

समर्थांची श्रीराम भक्ती अतुलनीय अशीच होती . रामावर अतीव श्रद्धा आणि विश्वास. संकटकाळी तो कोदंडधारी सदैव तुमच्या रक्षणास येईल असे ते श्रोत्यांना सांगत असत. परंतु त्यासाठी तुमचे वर्तन देखील नेटके आणि नेमस्त असले पाहिजे. ते श्रोत्यांना सांगत, की मनुष्य देहाचा मोह बाळगून जन्मभर त्याचीच चिंता वाहिली, तरी काळ आपले कर्तव्य करायचे चुकणार नाहीच. मग अशा नश्वर देहाची, आयुष्याची चिंता करण्यापेक्षा श्रीरामाची भक्ती करण्यात तो काळ व्यतीत  करावा, म्हणजे मृत्यू तुम्हांस भयभीत करणार नाही. 
देहेरक्षणा कारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेवोनी गेला ॥
करी रे मना भक्ती या राघवाची । पुढे अंतरी सोडी चिंता भवाची (संसार/जन्ममृत्यू) ॥ 
भवाच्या भये काय भितोस लंडी (भित्रा) । धरी रे मना धीर धाकासी सांडी ॥ 
रघूनायकासारिखा स्वामी शिरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ 
श्रीरामासारखा रक्षणकर्ता असल्यावर भीती बाळगायचे कारणच नाही असे आश्वासन समर्थ श्रोत्यांना देत होते. जन्ममृत्यूची चिंता नाहीशी झाल्यावर, आदर्श जीवनपद्धती अनुसरणे सहज होऊन जाईल, असे ते सांगतात. 
श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या ग्रंथाद्वारे जनजागृती करीत होते. सामान्य जनांचे आयुष्य सुसह्य व्हावे, त्यांनी उत्तम प्रपंच करावा, आणि प्रापंचिक कर्तव्ये पार पाडीत असताना परमार्थ देखिल साधावा असा त्यांचा मानस होता. त्यांची बुद्धी, अनुभव आणि अभ्यास यांचा एकत्रित परिपाक म्हणजेच त्यांची ग्रंथसंपदा. स्वरचित श्लोकातून, ग्रंथातून ते सतत लोकांना उपदेश करीत होते. पण तो उपदेश म्हणजे नुसताच शब्दबंबाळ नाही, तर अनुभवाच्या धगीतून तावूनसुलाखून निघालेला एकेक घडीव अलंकारच. त्यात कसलेही हीण सापडणार नाही, किंवा स्वार्थाचा वाराही त्यांस स्पर्श करणार नाही. 
समर्थ समाजात आढळून येणाऱ्या गुण आणि अवगुणांचा श्रोत्यांना परिचय करून देत होते. अवगुणांपासून सावध राहा, सद्गुणांची संगती त्यागु नका असे परोपरीने सांगत होते. समस्तं मानव त्रिगुणांनी युक्तं आहेत. ते गुण म्हणजे  सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या गुणांच्या योगे मनुष्य सर्व जीवनक्रिया करीत असतो. म्हणून अशा  त्रिगुणांचे संतुलन साधणे अती महत्त्वाचे आहे. 
सत्त्वगुणे भगद्भक्ती । रजोगुणे पुनरावृत्ती । 
तमोगुणे अधोगती । पावती प्राणी । 
असे या त्रिगुणांचे वर्णन करतात. या पैकी ज्या गुणाचे प्राबल्यं असेल, त्यानुसार वर्तन घडते. एका गुणाचे महत्त्व वाढले, की अन्य दोहोंचा ऱ्हास होतो. 
तया संसारिकांची स्थिती । देही त्रिगुण वर्तती । 
येक येता दोनी जाती । निघोनिया ॥ 
समर्थ या तिन्ही गुणांची लक्षणे वर्णन करतात. सर्वात उत्तम तो सत्त्वगुण, आणि सर्वाधिक हीन तो तमोगुण. रजोगुणायोगे मनुष्यामध्ये आढ्यता येते, स्वार्थ येतो. ईश्वराचे थोरपण नाकारून, स्वकर्तुत्वाचा अहंकार मनामध्ये जो जपतो, तो रजोगुणी असतो. 
माझे घर माझा संसार । देव कैचा आणिला थोर । 
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ 
माझे आयुष्य मी स्वकर्तुत्वाने घडवले. माझे कष्ट आणि बुद्धी मी कामास लावली आणि सारी धनसंपत्ती प्राप्तं केली असे म्हणणारा रजोगुणी असतो. तो ईश्वराचे अस्तित्वं नाकारतो, दैवी शक्तीशी जो कृतज्ञ नसतो अशास रजोगुणी संबोधावे. असा मनुष्य सदा सर्वकाळ स्वतःची आणि आप्तस्वकीयांची चिंता वाहतो. कारण त्याचा परमेश्वरावर अविश्वास असतो. तो नेहमी प्रापंचिक कार्यात गुंतून राहतो. भौतिक सुखांची त्यांस अनिवार अभिलाषा असते. आपणाव्यतिरिक्त इतरांकडे काय आहे यावर त्याचे लक्ष असते. आपल्याअधिक जर काही आढळले तर ते प्राप्त करण्याची इच्छा करतो. दानधर्म, पुण्यकर्म करण्यात जो जराही समय व्यतीत करीत नाही. धार्मिक कार्यात त्याला जराही रस नसतो. स्वतःच्या साधनसंपत्तीचे तो सतत चिंतन करीत असतो. आत्मस्तुतीचा विकार त्याला जडलेला असतो. 
मी तरूण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर । 
मी सकळांमध्ये थोर । म्हणे, तो रजोगुण । 
रजोगुणाचे प्राबल्यं असणाऱ्या व्यक्तीमध्ये ईश्वरोपासना, साधना, भक्ती इ. बद्दल नावड असते, अथवा तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. स्वाभिमानाचे रुपांतर कधीच अहंकारात झालेले असते. इतरांहून सतत जास्त काही मिळविण्याची आस लागून राहिलेली असते. 
दुसऱ्याचे सर्व जावे । माझेची बरें असावे । 
ऐसे आठवे स्वभावे । तो रजोगुण ॥ 
आप्तस्वकीयांमध्ये तो सदा गुंतलेला असतो. त्यामुळे त्या बाहेरील विश्व त्यांस अज्ञात असते. संसाराची अखंड चिंता त्यास सतावत असते. आपल्याविना दुसरा कुणीच कर्ता नाही, या जाणिवेने ही चिंता भयामध्ये रूपांतरित होते. भूतकाळातील घटना आठवून दुःख-संताप होत असतो. सुखाच्या पाठीमागे जीवाचे रान करताना संसारा व्यतिरिक्त सारे काही अप्राप्यं होऊन जाते. सदासर्वकाळ आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत राहावे लागते. कुठेही स्थैर्य मिळत नाही. जे काही चांगले आहे, उत्तम आहे -- ते स्वतःसाठी आणि स्वकीयांसाठी मिळविण्याची अविश्रांत धडपड हा रजोगुणी मनुष्य करीत राहतो.  त्याची अवस्था मृगजळामागे धावणाऱ्यासारखी होते. दृष्टिपथात तर आहे, परंतु गवसत नाही.  शांती समाधान सुद्धा अशांपासून दूरच राहते. 
जे जे दृष्टी पडिले । ते ते मने मागितले । 
लभ्यं नस्ता दुःख जाले । तो रजोगुण ॥ 
रजोगुणी मनुष्य हा स्तुतिप्रिय असतो. आत्मस्तुती करणे, इतरांची निंदानालस्ती करणे .. यात त्याला काहीच गैर वाटत नाही. दुसऱ्यास तुच्छ लेखून त्यांची निर्भत्सना करणे, मस्करी करणे त्याला बरे वाटते. त्यातच त्याला आनंद मिळतो. स्वप्रकृतीनूसार, समानधर्मी लोकांची संगती  प्रिय वाटते. त्यामुळे सज्जन सहवासाला त्यांस  अंतरावे लागते. संपत्तीची अतीहाव त्याच्याकडून गैरकृत्ये घडवून आणते. नीचांच्या संगतीत सदा वावर असल्याने देव धर्म, परोपकार, सेवा इ. सद्गुणांपासून तो वंचित राहतो. नेहमीच भौतिक सुखामध्ये मग्नं राहून पारमार्थिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मन: शांती दुरावते. 
तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावे वाटे । 
नित्यनेमास मन विटे । तो रजोगुण ॥ 
अशा प्रकारे रजोगुणाचे प्राबल्यं झाल्यास ईश्वरप्राप्ती दुष्कर होते. अनिश्चितता आणि भय मनास ग्रासून राहते आणि अंती दुःख पदरी येते. म्हणून रजोगुणांस ओळखून, वेळीच त्यांचा त्याग करणे सुयोग्य आहे. रजोगुणांपासून मुक्तीचा राजमार्ग आहे तो म्हणजे विरक्ती. या संसारातून, त्यातील माया, मोहा पासून अलिप्त राहणे. घरदार, आप्तस्वकीय, नातेसंबंधी या सर्वात न गुंतलेले चांगले. या सर्वांहून दूर राहिले की त्यांच्या काळजी, चिंतेपासून आपोआपच मुक्ती मिळेल. पण सर्वांना हे शक्य नसते. विरक्त होऊन संसाराकडे पाठ फिरविणे सर्वांनाच जमते असे नाही. मग यातून मार्ग कोणता ? 
उपाये येक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती । 
तरी येथानुशक्ती । भजन करावे ॥ 
काया वाचा आणि मने । पत्रे पुष्पे फळे जीवने । 
ईश्वरी अर्पुनिया मने । सार्थक करावे ॥ 
भय, दुःख आणि चिंता या सांसारीक तापत्रयांपासून सुटकेचा मार्ग समर्थांनी सांगितला आहे. मन ईश्वरभक्तीत लीन असेल तर त्यास अन्य कशाची अभिलाषा राहणार नाही. हेवा, द्वेष , तुलना, मत्सर आदी गुणांना वावरण्यास जागा राहणार नाही. दुसऱ्यास नित्यनेमाने काही देण्याच्या सवयीने मोह, माया आणि लोभ या पासून सुटका होईल. अशा स्थानी सुख, समाधान आणि शांती ची वसती होईल. आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल. म्हणूनच स्वहीत कशात आहे हे ओळखावे आणि रजोगुणांचा त्याग करावा असा सल्ला समर्थ श्रोत्यांना देतात. ईश्वराप्रती श्रद्धा आणि भक्ती असेल तर अधिकाची गरज भासणार नाही.  त्या पायी उद्भवणारी तृष्णा संपुष्टात येईल आणि मृगजळाचा पाठलाग विराम पावेल. 
घरी कामधेनू पुढें ताक मागे । 
हरीबोध सांडूनी वीवाद लागे ॥ 
करी सार चिंतामणी काचखंडे । 
तया मागता देत आहे उदंडे ॥ 
(क्रमशः)