चिंता करी जो विश्वाची
- चिंता करी जो विश्वाची .....(१)
- चिंता करी जो विश्वाची .... (२)
- चिंता करी जो विश्वाची ... (३)
- चिंता करी जो विश्वाची ... (४)
- चिंता करी जो विश्वाची ... (५)
- चिंता करी जो विश्वाची ... (६)
- चिंता करी जो विश्वाची ... (७)
- चिंता करी जो विश्वाची ... (८)
- चिंता करी जो विश्वाची ... (९)
- चिंता करी जो विश्वाची ... (१०)
- चिंता करी जो विश्वाची ... (११)
- चिंता करी जो विश्वाची ... (१२)
- चिंता करी जो विश्वाची ... (१४)
- चिंता करी जो विश्वाची ... (१५)
- चिंता करी जो विश्वाची ... (१६)
- चिंता करी जो विश्वाची ... (१७)
- चिंता करी जो विश्वाची ... (१८)
- चिंता करी जो विश्वाची ... (१९)
- चिंता करी जो विश्वाची ... (२०)
श्री रामदास स्वामी ईश्वरभक्तीची महती वर्णन करतात. ईश्वरभक्तीने अनेकांना संकटातून सुखरूप तारले आहे. देव भक्तीच्या बळावर, भक्तांनी अनेक दिव्य, भव्य कार्ये या पृथ्वीतलावर घडवून आणली आहेत. भक्ती सामर्थ्याची प्रचिती भक्तांना घडोघडी येतच असते असे समर्थ सांगतात. अशा सदभक्तांसाठी देव सुद्धा पुनः पुन्हा वेगवेगळे अवतार धारण करून या धरित्रीवर वावरतात. भक्तांच्या संकटकाळी साहाय्य करतात. म्हणून भक्तीचा महिमा थोर असाच आहे.
मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
असा दिलासा, समर्थ त्यांच्या श्रोत्यांना देतात. मनात कसलाही किंतू न बाळगता देवावर श्रद्धा ठेवल्यास, इच्छितं फलप्राप्ती निश्चितच होते. परंतु जे लोक अहंगंडाने भारलेले असतात, ज्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर जरूरीपेक्षा जास्त विश्वास असतो, काहीवेळा परमेश्वराचे अस्तित्वच नाकारू पाहतात, त्यांच्यासाठी समर्थ काही उपदेश करून त्यांना सावध करतात.
मुखीं नाम नाही तया कैची मुक्ती ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ।।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥
ईश्वरभक्तीसाठी मोठाली कर्मकांडे करण्याची जरूरी नाही. मनामध्ये सच्ची भगवद्भक्ती असली, तर केवळ मनोभावे केलेल्या नामस्मरणाने देखिल देव प्रसन्न होतो. परंतु काहीं जणांस तेही जमत नाही .
जया नावडे नाम त्या येम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे ।
मुखें बोलता दोष जाती स्वभावे ॥
अशी देवभक्तीची थोरवी. आणि भक्ती कशाप्रकारे आचरणात आणावी तेही समर्थांनी विस्तृतपणे सांगितले आहेच. भक्तियोगाची आठवी पायरी म्हणजे ईश्वराप्रती अविचल श्रद्धा. मनात कसलाही संदेह, किंतू न ठेवता, केलेली ईश्वरभक्ती सर्वश्रेष्ठ असते. ईश्वरी सामर्थ्यावर कदापिही शंका घेऊ नये असे समर्थांनी सांगितले आहे. काही वेळा अशा घटना, प्रसंग घडतात, त्याची संगती आपणास लागत नाही, कार्यकारण भाव उमगत नाही. पण म्हणून त्यासाठी ईश्वरावर राग धरणे, त्याला दोष देणे सर्वथा व्यर्थ आणि मूर्खपणाचे आहे. आनंद, सौख्य, दुःख, चिंता, भय, क्रोध या सर्व भावना दूर सारून, फक्त अनन्यभावे भक्तिमार्ग आचरणे हेच भक्तियोगाचे लक्षण आहे.
देवाच्या सख्यत्वकारणे । आपले सौख्य सोडून देणें ।
अनन्यभावें जीवे प्राणे । शरीर तेंही वेचावे ॥
सांडून आपली संसारवेथा । करीत जावी देवाची चिंता ।
निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याची सांगाव्यात ॥
अशा प्रकारे तनामनाने केलेली भक्ती देवासही भावते. अशा भक्तांच्या सौख्यासाठी देवही धरतीवर अवतार धारण करतात. मग आपल्या अवतीभवती असणारा देव कसा ओळखावा ते समर्थ सांगत आहेत. त्यांच्या मते देव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्याच विचांरांची, भावभावनांची निर्मिती आहे. आपणासारखाच देव असावा असे भक्तास वाटते, भासते. देवाचे रूप भक्तांच्या कल्पनेतून साकार होते.
देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तो वर्म आपणाची पासी ।
आपण वचने बोलावी जैसी । तैसी येती पडसादे ॥
जैसे जयाचे भजन । तैसाची देवही आपण ।
म्हणौनी हे जाण । आपणाचिं पासी ॥
देवाचा शोध काही अशक्य नाही, कारण तो आपणामध्येच सामावलेला आहे. तो निराकार आहे, म्हणून आपणापैकीच कुणाच्या रूपात तो प्रकटतो. पण देवाचे हे स्वरूप जाणण्यासाठी दोषविरहित भक्ती असणे आवश्यक आहे. भक्त आणि देव एकरूप आहेत. म्हणूनच भक्तास होणारा त्रास देवही सोसतो. सर्व नातीगोती ही देवाच्या ठायी कल्पावी, म्हणजे प्रत्येक संकटकाळी देव आपला सहाय्यकर्ता होतो असे श्री समर्थांचे सांगणे आहे. आपल्या भक्तांचाच संहार करणारा देव कुणीही पाहिला नाही.
देवे भक्त कोण वधिला । कधी देखिला ना ऐकिला ।
शरणांगतास देव जाला । वज्रपंजरू ॥
देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसी तारी ।
देव होये साहाकारी । अनाथांचा ॥
अशा प्रकारे काया, वाचा मनाने देवाचे चरणी श्रद्धा आणि भक्ती अर्पण केल्याने, जनमजन्मांतरीचे हित साध्य होते. म्हणून भक्तिमार्गाची वाटचाल नेहमीच लाभदायक असते. याच भक्ती योगाची अखेरची, नववी पायरी म्हणजे आत्मनिवेदन. ईश्वरासमोर आपले गुणदोष प्रामाणिकपणे कथन केल्याने, अभूतपूर्व शांंती प्राप्तं होते. मन, बुद्धीवरील भार उतरतो. प्रांजळपणे केलेले कथन, देवाप्रती निश्चितच पोहोचते. अनेक दोषांचे निराकरण होते आणि मुक्तीचा मार्ग सुकर होतो. असे हे आत्मनिवेदन म्हणजे काय, आणि ते कसे करावे याची माहिती समर्थांनी दासबोधात सांगितली आहे.
ऐका निवेदनाचे लक्षण । देवासी वाहावे आपण ।
करावे तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ॥
देवासमोर सत्यकथन करावे. ते करीत असताना आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. आपण आपले परीक्षण करावे. परंतु बरे वाईट ठरविण्याच्या अधिकार परमेश्वराप्रती समर्पित करावा. निवेदन करताना ते सविस्तरपणे करावे. काही हातचे राखून ठेवून करू नये. अन्यथा अशा निवेदनाचा काहीच उपयोग होणार नाही. त्रयस्थपणे आपले संचित आठवावे. बरे -वाईट, पाप-पुण्य सारे सारे काही सांगावे. जनलोकांपासून राखलेले गुपित, ते ही उघड करावे. निवेदन करताना आपणासाठी जे फायदेशीर, उपयोगी आणि चांगले, तेच आणि तितकेच कथन करू नये. असे करत असताना आपणास, आपलेच खरे स्वरूप देखिल सामोरे येते. तिच आत्माभूती आपणास मुक्ती मिळविण्यास मार्गदर्शक ठरते. म्हणून प्रामाणिकपणे आणि त्रयस्थ वृत्तीने आत्मनिवेदन करावे.
भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणि विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण काहीच नव्हें । समाधान ॥
तस्मात विचार करावा । देव कोण तो वोळखावा ।
आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामी ॥
अशा प्रकारे केलेल्या चिंतनाने, स्वतःची जनमानसात स्थापित केलेली प्रतिमा आणि आपुल्या मन्मनी प्रकटलेले स्वतःचे सत्यस्वरूप निराळे असू शकतात. अशा प्रकारे साक्षात्कार झाल्याने सारे पोकळ, वृथा भ्रम गळून पडतील. हेच तर परमभक्तीचे फलित आहे.
तत्त्वे तत्त्व जेव्हा सरे । तेव्हा आपण कैचा उरे ।
आत्मनिवेदन येणेप्रकारे । सहजची जाले ॥
तत्त्वरूप सकळ भासे । विवेक पाहाता निरसे ।
प्रकृतीनिरासे आत्मा असे । आपण कैचा ॥
अशा प्रकारे भक्तिमार्गी वाटचाल केल्यास मुक्तीचे द्वार आपणासाठी उघडेल. जन्म, मरणाच्या येरझाऱ्यातून मुक्ती मिळेल. निर्गुण निराकार परमेश्वराप्रति एकरूपता साधेल. निःसंग, निर्विष आणि किंतुविरहित केलेली भक्ती हेच मुक्तीमार्गाचे साधन आहे असे समर्थ सांगतात.
नवमी भक्ती आत्मनिवेदन । न होता न चुके जन्म-मरण ।
हे वचन सत्य, प्रमाण -। अन्यथा नव्हे ॥
ऐसी हे नवविधा भक्ती । केल्या पाविजे सायोज्यमुक्ती ।
सायोज्यमुक्तीस कल्पांती । चळण नाही ॥
(क्रमशः)
संदर्भ : श्री मनाचे श्लोक
श्री ग्रंथराज दासबोध