चिंता करी जो विश्वाची ... (१८)

 समर्थ रामदास स्वामींची श्रीराम भक्ती सर्वश्रुत आहे. ते स्वतःला श्रीरामाचे दास असेच संबोधित असत. भक्तिमार्गावर त्यांनी सर्वकाळ निष्ठेने वाटचाल केली होती.  शिष्यांना तसेच श्रोत्यांना देखिल ते भक्तिमार्गाचा महिमा वर्णन करून सांगत. दासबोध या ग्रंथात त्यांनी भक्तियोगाची लक्षणे सविस्तरपणे सांगितली आहेत. परमेश्वराची भक्ती केल्याने चित्त शुद्ध आणि स्थिर होते. मनुष्यास हानिकारक असे अवगुण लोप पावतात.  अस्थिरपणा आणि चंचलवृत्ती विलयास जाऊन बुद्धी अधिक कार्यक्षम होते.  जो अति आदर आणि निष्ठापूर्वक ईश्वराप्रती भक्तिभाव ठेवतो, त्यास देव देखिल अंतर देत नाही. भक्ताच्या संकटकाळी परमेश्वर त्याच्या पाठीशी नेहमीच उभा असतो. म्हणून भक्तिमार्गाचे अनुसरण करणे हितकारक आहे  असे समर्थ सांगतात. 

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा । 
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ।
हरीभक्तीचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ 
या आधीच्या भागात श्रवणभक्ती, हरिकीर्तन ही भक्तियोगाची लक्षणे बघितली. ईश्वरभक्तीची तिसरी पायरी आहे नामस्मरण. सदासर्वकाळ ईश्वराचे नामस्मरण करीत जावे. त्यायोगे वाणी शुद्ध राहते, कडवट आणि कठोर भाषा मुखी येत नाही. दुसऱ्याचा अपमान, मनोभंग घडत नाही आणि समाजामध्ये भांडणतंटे, क्रोध, द्वेष इत्यादी नाहीसे होऊन शांतता आणि सद्भावाचे वातावरण निर्माण होते. 
स्मरण देवाचे करावे । अखंड नाम जपत जावे ।
नामस्मरणे पावावे । समाधान ॥
असा उपदेश समर्थ श्रोत्यांना करतात. पण फक्त उपदेश करून थांबत नाहीत. तर हे नामस्मरण केव्हा, कुठे आणि कोणत्या वेळी करावे हेही सांगतात. नामस्मरण केल्याने महापातके नाहीशी होतात. मनाला शांती लाभते. अनेक अनुचित विचार लयाला जातात, आणि व्यक्तिमत्त्वास सात्त्विकता प्राप्तं होते. 
हरूषकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी
विश्रांतिकाळी निद्राकाळी । नामस्मरण करावे ॥
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये ॥

नामस्मरणाची महती वर्णन करताना ते अनेकांची उदाहरणे देतात - जे नामस्मरण करीत संकटातून तरून गेले. जसे वाल्मीकी, भक्त प्रल्हाद, अजामेळ. हे आणि असे अनेक जण त्यांच्या एकनिष्ठ भक्तीच्या बळावर आणि अखंड नामस्मरणाच्या महिम्याने संकटातून पार झाले. इतकेच नाही तर त्यांना जनमानसात अढळपद प्राप्तं झाले. 

नाम स्मरे निरंतर । तें जाणावे पुण्यशरीर ।
महादोषांचे गिरिवर । रामनामे नासती ॥
अगाध महिमा न वचे वदला । नामे बहुत जन उद्धरला ।
हळाहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ 

असा नामस्मरणाचा महिमा आहे. म्हणून लहान-थोर, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, पराक्रमी -साधू, सज्जन, या साऱ्यांनी नामस्मरण करावे. प्रभूचे नाम मुखी असता, वाचा, वाणी, मती, बुद्धी शुद्ध राहतात, आणि पापक्षालन होऊन पवित्र, सत्त्वगुणी समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. म्हणून सदा सर्वकाळ नामस्मरण करावे. 

भक्ती योगाची चौथी आणि महत्त्वाची पायरी समर्थांनी सांगितली आहे, ती म्हणजे सेवा. परमेश्वर, गुरू, वृद्ध, दुर्बळ,अपंग, आजारी आणि परावलंबी व्यक्तींची सेवा करावी. सेवावृत्ती अंगी बाणली असतात, समाजातील, दैन्य, दुःख, दारिद्र्यं , यां कडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल होतो, अधिक सहानुभूतिपूर्ण होतो. असे झाल्याने समाजात कोणीही निराधार राहत नाही असे समर्थांचे सांगणे आहे. भक्ती योगाच्या या लक्षणात परमेश्वर आणि गुरू यांच्या सेवेला सर्वोच्च स्थान दिले आहे. परमेश्वर निर्माता, रक्षणकर्ता आणि सद्गुरू हे  ज्ञान देणारे असतात म्हणून. सद्गुरूची कृपा झाली असता, अगम्य ते ज्ञात होते. जे दृष्टीस दिसत नाही, अंतरास भासत नाही -- त्याचा साक्षात्कार होतो. जे सृष्टीच्या गूढगर्भी वसते - त्याचे उच्चारण सद्गुरू वाणीने होते. आणि ते श्रवण करून शिष्यास ज्ञान प्राप्ती होते. असे सद्गुरूचे महात्म्यं आहे. म्हणून ईश्वरभक्तीप्रमाणेच सद्गुरू सेवेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. 

बहुदा अनुभवांची आंगे । सकळ कळती संतसंगे ।
चौथे भक्तीचे प्रसंगे । गोप्य ते प्रगटे ॥
प्रगट वसोनी नसे । गोप्य असोनी भासे ।
भासाअभासातून अनारिसे (वेगळे) । गुरूगम्य मार्ग । 

ज्ञान प्राप्ती व्हावी या साठी सद्गुरूची सेवा करणे आवश्यक आहे. सद्गुरूची सेवा करीत असता अनेक समज-अपसमज दूर होतात. अनेक कूटप्रश्नांचा उलगडा होतो.  भ्रमांचे निराकारण होऊन दृष्टी निकोप आणि निर्मळ होते. संशय विरतात आणि साक्षेपी वृत्ती प्राप्तं होते. चित्त-बुद्धी स्थिर होऊन समाजकारणी कार्यरत होते. इतके सारे घडण्यासाठी सद्गुरू कृपा व्हायला हवी. 

नाना समाधाने पाहाता । बाणती सद्गुरूकरितां ।
सद्गुरूविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ 

(क्रमशः) 
संदर्भ : (१)  श्री मनाचे श्लोक 
          (२)   श्री ग्रंथराज दासबोध