चिंता करी जो विश्वाची ... (५)

श्री रामदास स्वामींचा शिष्य परिवार सतत विस्तारत होता. अनेक शिष्य समर्थांचे हे विचारधन   जनसामान्यांपर्यंत पोहोचवीत होते. स्वतःच्या आचरणातून समर्थांनी आदर्श जीवनाचा परिपाठच दिला होता. निर्वाहासाठी भिक्षांदेहीचा मार्ग पत्करला होता, पण फक्त जरूरीपुरताच . जास्तीची हाव त्यांना कधीच नव्हती. धनसंचयाची लालसा नव्हती. कठोर परिश्रम आणि खडतर साधना त्यांची नित्यकर्मे होती.
समर्थ देशाच्या अनेक प्रदेशात संचार करीत असत. निरनिराळ्या प्रदेशातील , निराळ्या संस्कृतीची, आणि वेगवेगळ्या जीवनपद्धती अनुसरणाऱ्या लोकांशी त्यांची गाठ- भेट होत असे. अनेक स्वभावांची, प्रकृतींची माणसे ते बघत होते, त्यांच्याशी संवाद साधत होते. या नित्य जनसंपर्कातूनच त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीने हेरलेले गुण, अवगुण ते आपल्या ग्रंथाद्वारे लोकांना अवगत करून देत होते. 
सद्गुरूची थोरवी समर्थांनी अनेक वेळा वर्णन केली आहे. उत्तम शिष्याला उत्तम गुरूचा लाभ झाल्यास त्या शिष्याचे कल्याण होते. असे ते सांगत असत. परंतु लोकांना शिकविणारे सारेच गुरू उत्तम नसतात हे ते जाणत होते. अयोग्य गुरू योगे अधोगतीची प्राप्ती होईल असे सांगून ते लोकांना सावध करीत होते. गुरूची निवड करताना आपली बुद्धी जागृत असणे अत्यंत जरूरीचे आहे असे ते म्हणत, अन्यथा तुम्ही ज्ञान अथवा विद्या प्राप्तं न करता कुविद्येचे धनी व्हाल असा इशारा ते देत असत. आ अशा प्रकारे कुविद्या प्राप्तं केलेला मनुष्य, अनेक कुलक्षणांनी युक्तं असा होतो.  अशी माणसे नेहमी ताठ्याने वागतात, इतरांना उपदेश करतात. परंतु स्वतःचे आचरण मात्र त्या उपदेशाप्रमाणे करीत नाहीत. 

हीन देह आणि ताठा। अप्रमाण (पुरावा नसताना ) आणि फाटा ( इतरांना सल्ले देणारा) । 
बाष्कळ आणि करंटा । विवेक सांगे । 
कुविद्या, म्हणजेच अपुरे आणि अनुचित ज्ञान प्राप्त केलेली व्यक्ती अनेक कुलक्षणांनी युक्त असते. असा मनुष्य,  पापी, संतापी, दीर्घद्वेषी, कपटी, दुराचारणी, भित्रा, लबाड, व्यसनी, विश्वासघातकी, आळशी, वाचाळ, कृपण, इतरांची सदा नालस्ती करणारा निंदक, लोकांमध्ये कलह लावून देणारा कारस्थानी असा असतो. असा मनुष्य इतरांच्या मदतीस कधीच येत नाही, आणि तो कधीच, कुणाचाही  चांगला मित्र होऊ शकत नाही. 

युक्तीहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन ।
क्रियाहीन सत्त्वहीन । विवेकहीन संशई ॥
भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
शांतीहीन क्षमाहीन । सर्वहीन क्षुल्लकु ( क्षुद्र, तुच्छ ) ॥
समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे । 
आर्जव नेणे मैत्री नेणे । काहीच नेणे अभागी ॥ 
कुविद्येपायी अशा प्रकारच्या अनेक दुर्गुणांचा प्रवेश त्या व्यक्तीच्या अंतर्यामी होतो. या दुर्गुणांच्या योगे दुष्कीर्ती होते. आप्तस्वकीयात दुरावा निर्माण होतो. आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडते. इतके सारे अघटित घडते ते एक कुविद्येच्या कारणाने. अशा लोकांना वेळीच ओळखून, त्यांच्यापासून दूर राहणे श्रेयस्कर असं समर्थ सांगतात. अर्थात त्यांच्या सांगण्याला त्यांच्या अनुभवांची, निरीक्षणाची आणि विचक्षण बुद्धीची जोड आहे. म्हणूनच त्यांचा प्रत्येक शब्द हा अनमोल आहे. 

असो ऐसे नाना विकार । कुलक्षणांचे कोठार । 
ऐसा कुविद्येचा नर । श्रोती वोळखावा । ।
ऐसी कुविद्येची लक्षणे । ऐकोनी त्यागचि  करणे । 
अभिमाने तऱ्हे (हट्टास पेटणे ) भरणे । हे विहित नव्हे ।
अशा कुलक्षणी व्यक्ती माहिती असूनही, त्यांच्याशी हट्टाने मैत्री ठेवणे अहितकारक आहे. अशा व्यर्थ अट्टहासाने आपले केवळ नुकसानच होईल.  अशा दुर्जनांच्या योगे आपणासही दुःख, दैन्य आणि दुष्कीर्ती   सोसावी लागते.  ज्ञानसंपादन करणे जरूरीचे आहेच. परंतु चुकीचे अथवा अपूर्ण ज्ञान अहितकारक असते. अशी व्यक्ती ज्ञानाचा वृथा अहंकार बाळगत असते, जे परिपूर्ण नसते. संकटकाळी अशी कुविद्या कधीच कामास येत नाही. 
अविद्यागुणें मानवा ऊमजेना । भ्रमे चूकले हीत ते आकळेना ।
परीक्षेविणे बांधिले दृढ नाणे । परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥ 
सत्य-असत्याची पूर्ण जाणीव व्हावी, हित-अहितातील फरक कळावा आणि गुणावगुणांची कसोटी कशी घ्यावी हे उमजावे, याकरिता विद्यार्जन करणे अत्यंत जरूरीचे आहे.  आपल्या ठायी कुविद्या न यावी, आपणास परिपूर्ण अशा ज्ञानाची प्राप्ती व्हावी  या  साठी  योग्य  त्या  गुरूचे  शिष्यत्व पत्करलेले चांगले. सद्गुरू आपल्या  शिष्याचे कुविद्येपासून आणि  कुलक्षणांपासून   संरक्षण करतात. आपल्या शिष्यांना  सद्गती  प्राप्तं  करण्यास  मार्गदर्शन करतात, असे समर्थांचे सांगणे आहे. 
विद्यार्जन करणे हा सुखी, समाधानी आणि सात्त्विक आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. परंतु एकमेव मात्र नाही. ज्ञान संपादना बरोबरच शिस्तशीर आणि नियमित आचरण, नित्य नेमस्तपणा  असणे देखिल गरजेचे आहे. दैनिक स्नान, संध्या, पूजाअर्चा करणे कधीच चुकवू नये. चार लोकात वावरताना विनयशील असावे. इतरांना योग्य तो आदर देऊन मान राखावा. वेळोवेळी हरिकथा, कीर्तन इत्यादी करावे, शास्त्रार्थ करावा. त्या योगे सज्जन आणि ज्ञानीजनांच्या सहवासाचा लाभ होतो, आणि परस्पर सद्भावना वाढीस लागते हा फायदा. क्रोधावर नियंत्रण असावे, अन्यथा अयोग्य कर्म घडण्याची शक्यता असते. परोपकार हा थोर सद्गुण आहे. इतरांच्या कठीण समयी मदतीस तप्तर असावे त्यायोगे समाजमान्यता आणि कीर्ती प्राप्तं होते. दया, क्षमा आणि शांती या गुणांचे कायम अनुसरण करावे. अशा प्रकारे समाजातील हरएक व्यक्तीने आपला जीवनक्रम ठेवल्यास, द्वेषविहीन, कलहविहीन अशा समाजाची निर्मिती होईल.  असा समाज उत्तरोत्तर वैभव आणि प्रगती पथावरच राहील.  ज्या व्यक्ती असा जीवनमार्ग अनुसरणार नाहीत, त्यांचा जन्म आणि जिणे हे व्यर्थ आहे असे मर्थ सांगतात. पापी आणि दुराचारणी व्यक्तीने केलेली भक्ती, साधना त्याला कधीच लाभत नाही. आपण जे वागतो, बोलतो, ते आणि तसेच आपणांस इतरांकडून प्राप्तं होत असते. म्हणून समाजात वावरताना नेहमीच सावधपणा अंगी बाळगावा असा उपदेश रामदास स्वामी करतात. 

परगुणांचा संतोष नाही परोपकारे सुख नाही । 
हरिभक्तीचा लेश नाही । अंतर्यामी ॥ 
ऐसे प्रकारीचे पाहतां जन । ते जीताचि प्रेतासमान । 
त्यांसी न करावे भाषण । पवित्रजनी ॥ 
पुण्यसामग्री पुरती । तयासीच घडे भगवद्भक्ती । 
जे जे जैसे करिती । ते पावती तैसेचि ॥ 
(क्रमशः)