चिंता करी जो विश्वाची .....(१)

भाव भक्तीने भारलेली , अभंग, ओव्या, भारूडे, कीर्तने, भजने यांच्या रसाळ आणि सुरेल कथनाने आणि  श्रवणाने तृप्त झालेली, -- अशी  संत परंपरा या मराठी मातीस लाभली आहे. शतकानुशतके महान धर्मग्रंथामध्ये बंदिस्त असलेले ज्ञान या संत सज्जनांनी जनसामान्यांसाठी  खुले केले.  सामान्यांच्या भाषेत, त्यांना समजेल , भावेल अशा पद्धतीने त्यांनी धर्माचे ,तत्त्वज्ञानाचे मर्म उलगडून सांगितले .  मराठी जनांच्या आयुष्याला त्यांनी सात्त्विक आणि तात्त्विक चौकट प्रदान केली.

 अनेक थोर संतांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे.  "ज्ञानदेवे रचिला पाया ... तुका झालासे कळस " असे या  परंपरेचे वर्णन केले जाते. संतांच्या या मांदियाळीत ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखोबा,एकनाथ, सावता माळी, नामदेव, तुकाराम  जनाबाई,  सखुबाई आणि असे कितीतरी थोर संत होऊन गेले.  याच प्रभावळीतील एक नाव लखलखीत सामोरे येते - ते म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. समर्थांचा जन्म . सन १५३०  मध्ये  रामनवमीच्या दिवशी गोदातीरावरील जांब या गावी झाला. चार शतकांनंतर आजही त्यांचे  विचार , त्यांची शिकवणूक काळाशी सुसंगतच वाटतात.. त्यांनी सांगितलेली मूल्ये शाश्वत आणि कालातीत आहेत हे पुन्हा पुन्हा जाणवते. 

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।

असा सर्व भूमंडळी कोण आहे । 
जयाची लीळा वर्णीती लोक तिन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥  
असंख्य वेळेला उच्चारलेला हा  श्लोक. कसे ओजस्वी आणि नेमके शब्द . लिखाणातूनही विचारांचा स्पष्टपणा प्रतीत होतो. निर्भीडपणे सत्यं तेच सांगणे, त्यात कसलीही लपवाछपवी नाही, की शब्दांचे मोहक परंतु फसवे खेळ नाही. 
आपणांस जे ठावें .. ते इतरांस सांगावे । 
शहाणे करावे .. सकळ जन ॥ 
हीच स्वच्छ भूमिका . 
समर्थ वाणीशी जो परिचित नाही असा मराठी माणूस विरळालाच. समर्थांचा परिचय देणे म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवणे . एव्हढे धारिष्ट्यं कोण करणार. आपण फक्तं समर्थांनी दाखविलेला ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग , नीती आणि कृती मार्ग अनुसरावा. 
श्री समर्थं रामदास स्वामी यांचे मूळ  नाव नारायण सूर्याजी ठोसर (कुलकर्णी) , आणि मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील जांब . अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान असलेल्या नारायणाचे आगळेपण लहानपणापासूनच प्रकट होत होते. त्या काळातील प्रथे प्रमाणे वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा विवाह निश्चित करण्यात आला. त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी "शुभमंगल सावधान" हे शब्द ऐकताच ते लग्नमंडपातून  निघून गेले अशी कथा सांगितली जाते. इतक्या लहान वयात  आयुष्याचे ध्येय त्याच्या नजरेसमोर सुस्पष्टं दिसत होते हे विशेष. आणि त्यानुसारच त्यांनी  संपूर्ण आयुष्याची कालक्रमणा केली. ध्येयापासून ते कधीच ढळले नाहीत. अविचल आणि एकनिष्ठ वृत्तीने लोकोद्धाराचे व्रत अंगिकारले. 
गणाधिश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ जो निर्गुणांचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । 
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ 
या समर्थ रचित श्लोकाने पाठांतराची सुरूवात होते. शब्द असे की जणू तेजस्वी मोतीच. त्या शब्दांतून  उलगडणारा एक एक  श्लोक म्हणजे सुघड, सुंदर अशी मोत्यांची माळ. अशा श्लोकांमधून त्यांनी जीवनाचे सारच लोकांसाठी विशद केले. ते सुद्धा सहज आणि सोपे करून. सामान्यातील सामान्याला देखिल हे ज्ञानामृत प्राप्त व्हावे  अशाच पद्धतीने. समर्थाच्या सर्व लिखाणाला एक वास्तवाचा आणि व्यावहारिक शहाणपणाचा स्पर्श आहे. स्वतः आयुष्यभर डोंगर दऱ्यातून आणि गुहांमधून वास्तव्य केले, सर्वं सुखोपभोगांचा त्याग करून संन्यासीपण स्वीकारले, पण तरी गृहस्थाश्रमी नांदणाऱ्या लोकांना तुच्छ लेखले नाही  अथवा सर्वसंगपरित्यागाचा उपदेश केला नाही. उलट त्यांनी " प्रपंच करावा नेटका .. " असेच म्हणले .
 स्वतः संन्यासी जीवन व्यतीत करत असताना, जनलोकांना व्यवहारज्ञानाचा उपदेश केला. सामान्य माणासांना अनेक परीने उपदेश केला, जेणे करून त्यांचे आयुष्यं सुसह्यं होईल,  दुःख आणि भीतीला सामोरे जाण्याची त्यांच्यात क्षमता येईल. लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध आणि अहंकार हे षड्रिपू साऱ्या दुःखाचे मूळ आहे. पण त्याचा त्याग करणे सामान्यास जमत नाही. म्हणून समर्थ त्यांना या  जीवनाची क्षणभंगुरता विशद करून सांगतात. सर्व अवगुणांना कवटाळून मी आणि माझे असा जप करीत आयुष्य जगणाऱ्यांना ते सांगतात, तुम्ही काहीही करा पण मृत्यूला टाळू शकत नाही. तो जेव्हा यायचा तो येणारच ... मग कशासाठी हा सारा अट्टहास . सुखाच्या मागे धावताना सगळ्यांची दमछाक होते... पण सुख मिळत नाही ते नाहीच. काहीतरी अपूर्ण असल्याची खंत मनात राहतेच. म्हणून समर्थ उपदेश करतात, 
जनीं सर्व सूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंची शोधूनि पाहें ।
मना त्वांची रे पूर्वसंचित केले । 
तयासारिखे भोगणे प्राप्त झालें ॥ 
असे शहाणपणाचे बोल ऐकवत समर्थांनी लोकजागृतीचे मोठेच काम उभे केले. जागोजागी आश्रम शाखा स्थापित करून विचारांचा प्रचार केला. समर्थ हे श्रीरामाचे भक्त . ते स्वतःला रामदास म्हणवून घेत असत. रामाचा आदर्श ध्यानी धरून लोकांनी आपले नित्यव्यवहार करावे असे त्यांचे सांगणे असे. त्यांची शिष्य संख्या प्रतिदिन वाढतच होती. चाफळ येथील मठात समर्थांचे वास्तव्य असे. परंतु त्यांचा शिष्यगण सर्वदूर पसरलेला होता. समर्थ आपल्या प्रतिभावान वाणीने ज्ञानदान तर करीतच, पण आपल्या शिष्यांना बलोपासनेची देखिल प्रेरणा देत. त्या कालातील सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीवर मार्मिक टीका टिपणी करीत असत.
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महारांजांचे समकालीन. परंतु त्याची भेट होण्याचा योग बराच उशीरा आला. महाराज चाफळच्या मठात समर्थांना भेटण्यास आले होते. तेथे त्यांनी समर्थांकडून गुरुपदेश घेतला. परंतू या भेटीच्या कितीतरी आधी समर्थांनी शिवरायांचे थोरपण जाणले होते. राजांची स्तुती करताना त्यांची वाणी जराही अडखळत नव्हती. 
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । 
श्रीमंत योगी ॥ 
असे नेटके आणि नेमके वर्णन ते करतात. आदर्श राजा कसा असावा याच्या संकल्पना पक्क्या आहेत. त्यांचा आदर्श अर्थात श्रीराम -- यासम असणारा , वर्तणारा तो योग्य राजा असेल असेच त्यांचे मत. राजा हा फक्तं शूरवीर पराक्रमी असून चालत नाही, तर सामान्यांचा कळवळा असलेला समाजकारणी, बुद्धी चातुर्याने राज्य राखणारा धुरंधर असाही असायला हवा. त्यांच्या या आदर्शाचे मूर्त स्वरूप म्हणजे महाराज. 
महाराजांचे गुणवर्णन करताना ते लिहितात --
यशवंत, कीर्तिवंत। सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा । 
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ। सकळां ठायी। 
किती यथायोग्यं वर्णन. असे म्हणतात अनमोल हिऱ्याची पारख कसबी जवाहिऱ्यालाच असते. स्वतः संन्यासी आश्रमात राहूनही सामाजिक परिस्थितीची किती यथायोग्यं जाणीव त्यांना होती हे ही लक्षात येते. 
समर्थांचे वास्तव्य जास्तकरून चाफळ च्या मठात, शिवथर घळीतील गुंफेमध्ये, अथवा सातारा नजीक परळीच्या गडावर (सज्जनगड) येथे असे. परंतू त्यांचा संपूर्ण भारतवर्षात सर्वदूर संचार होता. त्यांचे सारे जीवन लोकोद्धार आणि लोकशिक्षणासाठीच वाहिलेले होते. स्वतःसाठी कुणापुढेही कधी हात पसरला नाही. क्षुधाशांतीसाठी ते भिक्षांदेहि करीत असत. पण ते सुद्धा जरूरीपुरतेच. जास्तीची हाव त्यांनी कधीच धरली नाही. वाणी रसाळ पण रोखठोक. सामान्यांसाठी अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी "मनाचे श्लोक " रचले. घरातील एखाद्या जुन्या जाणत्याने आपणापेक्षा लहान , अजाण अशा नेणत्यास उपदेश करावा अशीच शब्दरचना. 
मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे । 
विवेकें देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ 
(देहेबुद्धी - देह म्हणजेच मी अशी भावना ) 

अनेक दुर्गुणांचे वर्णन करून त्यांचा त्याग करण्याचा उपदेश समर्थांनी केला. एका दुर्गुणापायी सर्व सद्गुणांचा नाश होतो . त्याचा त्याग करावा म्हणजे सर्व सुखे प्राप्तं होतील असे ते सांगतात. आणि हा महाभयंकर दुर्गुण म्हणजे अहंकार.  या दुर्गुणापायी अनेक थोर मातीस मिळाले. म्हणून तो सोडणे हितकारी आहे असे ते म्हणतात.
अहंतागुणे सर्वही दुःख होते।
मुखें बोलिले ज्ञान  तें व्यर्थ जातें ।
सुखी राहता सर्वही  सूख आहे ।
अहंता तुझी तूंची शोधूनी पाहें ॥ 
समर्थांचा एकेक विचार अमूल्य आहे. त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या तप: साधनेचे सार शब्दरूपात प्रकट केले आहे.  आपली तीव्र बुद्धी, सर्वसंचार,  साधू सज्जनांच्या सहवासाने आलेले शहाणपण , अथक परिश्रम आणि अभ्यासातून प्राप्तं केलेली विद्या यांच्या संयोगातून एका महान नीतीग्रंथाची रचना केली . तो ग्रंथ म्हणजे " श्री ग्रंथराज दासबोध" .