अंतर द्वंद्व - खरे तर अंतर्बाह्य द्वंद्व

अंतर्द्वंव हा चित्रपट एक खळबळजनक विषय अत्यंत संयतपणे मांडतो.

दीडेक दशकामागे बिहारमध्ये अपहरण हा एक उद्योग-व्यवसाय म्हणून भरभराटीला आला होता. बहुतेक वेळेला खंडणीसाठी धनाढ्य व्यक्तींचे अपहरण केले जाई. पण काही वेळेस अपहरणाचे कंत्राट देणाऱ्यांना नाईलाजाने तसे करावे लागे.

हे असत उपवर मुलींचे बाप. विशेषतः ज्या मुली दिसायला साध्या, खेड्यात राहणाऱ्या, फार न शिकलेल्या असत त्यांना लग्नाच्या बाजारात फार खर्च करावा लागे. हा खर्च न परवडणारे मुलींचे बाप मग मुलाच्या अपहरणाची सुपारी देत.

असे पकडून जबरदस्तीने लग्न लावले नि मुलीची पाठवणी केली की बापाचे कर्तव्य संपे. मग सासरी मुलीला कशी वागणूक मिळते याची काळजी करणे नि टिपे गाळणे हे काम मुलीची आई करी.

उपवर मुलेही 'बाबूजीके आग्या का पालन तो करनाही होगा' अशी सोयिस्कर भूमिका घेऊन गप्प बसत. त्यांच्यापैकी काहींचे बाहेर सूत जुळलेले असे. पण बाबूजींनी रुद्रावतार धारण केल्यावर - 'बेटा, ये बाल हमने धूपमें नही सफेद किये' - मुलगा आईला मध्ये घाली आणि तिला दोन्हीकडून भरडल्या जाणाऱ्या त्या माऊलीला टिपे गाळण्याची संधी मिळे. एखादा बाबूजी समजूतदारपणा दाखवी - सूत जुळवलेल्या मुलीची जात नि कूळ पडताळून ते जुळले तर.

आणि हे विशेषतः उच्चशिक्षित नि उच्चवर्णीयांत चाले. यूपीएससी पार करून आयएएस/आयपीएस होणाऱ्या मंडळींत फारच. यूपीएससी झालेल्या मुलाला बाजारात फार चांगला भाव मिळे.

असा एक दिल्लीत चार वर्षे राहून यूपीएससी ची तयारी करणारा उपवर मुलगा. त्याने एका पंजाबी मुलीबरोबर सूत जुळवून 'लिव्ह इन' सुरू केले आहे. आईबापांना अर्थातच पत्ता नाही. ती पंजाबन गरोदर असल्याचे वर्तमान कळाल्यावर नाईलाजाने हे रडतराऊत घोड्यावर बसतात नि मातापित्यांना 'सून तयार आहे' ही बातमी द्यायला येतात. बाप प्रथेप्रमाणे 'सफेद बाल' पुढे करतो. खरे तर कलप चोपडल्याने बापाचे केस कुळकुळीत काळे असतात, टक्कल तेवढे पडायला सुरुवात झालेली असते. पण बापाचाही नाईलाज आहे. संवादलेखकांना दुसरे काही लिहिण्याची परवानगी 'डायलॉग रायटर्स असोसिएशन'कडून मिळत नाही.

मुलाच्या बापाचे आक्षेप दोन. एक म्हणजे त्याने चांगले डबोले आणणारी एक मुलगी सून म्हणून आधीच हेरून ठेवली आहे. दुसरे म्हणजे ही मुलाची आवड आहे एक पंजाबन. त्यांच्याशी कुळशीलाचे, आणि मुख्य म्हणजे देण्याघेण्याचे बोलणे पहिल्यापासून सुरू करावे लागणार. शिवाय मुलगी दिल्लीत राहत असलेली. आणि दिल्लीत राहणाऱ्या मुली पॅंट घालून नाचण्याबद्दल कुप्रसिद्ध असतात हे बाबूजींना नीट माहीत आहे. त्याने ठरवून ठेवलेली सून 'अच्छे खानदानकी है, देहलीकी लडकियोंकी तरहा पतलून पहनकर नाचेगी नही' अशी आहे.

पंजाबन गरोदर आहे हे मुलाने अर्थातच बापापासून लपवून ठेवले आहे. आणि तसाही हा मुद्दाच नव्हे. शीलरूपी काचेचे भांडे भंगू न देण्याची संपूर्ण जबाबदारी मुलींची असते हे कुठल्याही अस्सल भारतीय पुरुषाप्रमाणे वधूपित्यालाही माहीत आहे.

सून ठरवून ठेवणे, मुलाला अक्कल नसल्याची द्वाही फिरवणे, बायकोला हाडुतहुडूत करणे अशा महत्वाच्या कामांमधून वेळ काढून मुलाच्या बापाने एका वधूपित्याचा (आणि वधूबंधूचा) अपमानही करून ठेवलेला आहे.

बाप ऐकत नाही म्हटल्यावर मुलगा आईला मध्ये भरडायला घालून दिल्लीला निघून जातो. भल्या सकाळी. तोवर बाप उठलेला नसतो. उठल्यावर बाप आईची आरती करतो (फूहड औरत, तुमनेही उसे सरपे चढा रख्खा है). माऊली दीनवाणा चेहरा करून गप्प बसते.

मुलगा दिल्लीला तडकाफडकी जातो कारण यूपीएससी मेन्स चा निकाल येऊ घातला आहे.

अपमानित वधूपिता मुलाचे अपहरण करवतो नि त्याला डांबून ठेवतो. त्याला लग्नाला उभे करण्यासाठी आवश्यक मारझोडीची व्यवस्थाही वधूपित्याने केलेली आहे. 'मुंहपे मत मारियेगा महराज, फोटूमें अच्छा नही दिखेगा ना'. सगळे अनुभवी नि तज्ञ.

अचानक लग्न ठरल्याने मुलीचे शिक्षण 'विथ इमिजिएट इफेक्ट' थांबलेले आहे. मुलीला विश्वासात घेण्याची आणि तिच्याशी संवाद साधण्याची बुळचट प्रथा आपल्या उच्च परंपरेत नाही. 'तुम्हारी भलाईके लिएही कर रहे है ना' असे गुरकावले की झाले. मुलीची आई ही सुद्धा एक स्त्री. म्हणजे निर्बुद्ध. तिलाही काही सांगण्याची गरज नाही. बायका बायका मिळून रडत बसतील फार तर.

इकडे नवरदेव सिया (पंजाबन) च्या आठवणींनी व्याकुळ होत मार खातो आहे, मार खाऊन व्याकुळ झाल्यावर तिची आठवण काढतो आहे, मध्येच पळून जायचा प्रयत्न करून माराचा कोटा वाढवून घेतो आहे.

अशा नवरदेवाला दारू पाज पाज पाजून लग्नाला उभे करतात. लग्न पार पडते नि नवरानवरीची एका खोलीत रवानगी होते. खोली वधूपित्याच्या महालाच्या एका कोपऱ्यात आहे. नवरा शुद्धीवर येतो नि 'दूर रहिये मुझसे' अशी बायकोला आज्ञा करून आपण दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसतो.

लग्न लावून दिल्याने मुलीच्या बापाची जबाबदारी संपली आहे. तो दारू प्यायला मोकळा. तसा तो नेहमीच दारू पितो, पण आता जरा निर्वेधपणे पितो. नवरा-नवरीच्या खोलीबाहेर पहलवान मंडळींना पहाऱ्याला ठेवले की वधूपित्याची जबाबदारी संपली.

मुलगी पूर्ण बावरून गेलेली. 'डिअर इन द हेडलाईट'ची पोस्टरगर्ल. तिची आई नि वहिनी काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्याही बायकाच. म्हणजे परत निर्बुद्ध. त्या उगाचच जोडप्याला कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ देणे (पहलवानांच्या शेपटासकट अर्थात) असे फडतूस उपाय करीत बसतात.

बायकांची रडारड चालूच आहे म्हटल्यावर वधूपिता खवळतो. अशा वेळेस काय उपाय करायचा हेही या अडाणी बायकांना कळत नाही म्हटल्यावर कुणीही मर्द चवताळणारच. तर हा मर्द वधूपिता अशा वेळेस करायचा योग्य उपाय करतो. मुलाला खूप दारू पाजतो, एका कोठेवालीसमोर सोडतो, आणि ती कोठेवाली 'मुझे नही लगता इनसे कुछ होगा' असा बाण मारते. वधूपित्याचे मित्र 'कुछ कमी है तो बताईये मेहमानजी, उसकाभी इलाज करे देते है' असे जहर घेऊन हजरच असतात.

या जहरी बाणाने नवऱ्यामुलाची 'मर्दानगी' जागृत होते का, त्यापुढे काय काय घडते नि त्याला सगळे कसकसे तोंड देतात, 'तुम्हारी भलाईके लिए ही तो कर रहा हूं' हा वधूपित्याचा मुखवटा गळून पडतो की ओरबाडून काढला जातो इत्यादी प्रत्यक्षच बघावे. अर्ध्याहून अधिक कथा सांगून बसलोच आहे.

काम करणाऱ्या मंडळींत विनय पाठक (वरपिता) नि अखिलेंद्र मिश्रा (वधूपिता) हे ओळखीचे चेहरे. त्यात अखिलेंद्र मिश्राचा चेहरा ओळखीचा आहे म्हणजे भलत्याच कारणासाठी. खलनायकाच्या तिय्यम सहायकाच्या अत्यंत टाकाऊ दर्जाच्या भूमिकांत(च) त्याला आधी पाहिले होते. इथेही मध्येमध्ये तो त्या 'मोड'मध्ये जातो. वधूमाई सुमुखी पेंडसे. घाऱ्या डोळ्यांची सगळी माणसे दुष्ट असतात या न्यूटनच्या चौथ्या नियमामुळे हिंदी-मराठी मालिकांमधून खलभूमिका करणारी. वहिनी जया भट्टाचार्य. जया भादुरीची आठवण करून देणारी.

नवरा मुलगा राज सिंग चौधरी. गंमतीदार प्रकरण आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर करताकरता मॉडेलिंग, मग स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, त्यात भागीदारांनी गंडवल्यावर चित्रपटसृष्टीत शिरण्याची धडपड. 'नो स्मोकिंग' नि 'गुलाल' या चित्रपटांची कथा त्याची. या चित्रपटातले त्याची भूमिका नीटस संयतपणे मांडलेली आहे. चडक-भडकपणा नाही.

नवऱ्यामुलीचे (जानकीचे) काम करणाऱ्या स्वाती सेनने कमाल केली आहे. 'बाकी सगळ्यांना खाऊन टाकले आहे' असा (नर/मादी)भक्षकपणा न करता. सुरुवातीला फ्रेममध्ये लक्षातही न येणारी एक सामान्य मुलगी. अचानक कोसळणाऱ्या प्रसंगांनी बावरून गेलेली. प्रसंगी अगतिक, असहाय झालेली. ही दिव्याच्या झोतात बावरलेली हरिणी (डिअर इन द हेडलाईट) शेवटी ताठरपणे उभी राहते. आपल्याकडे स्टिरिओटाईप म्हणजे अन्याय साहणारी गरीब गाय आपल्या अपत्यांसाठी चवताळलेली वाघीण होते. पण इथे तसे नाही. जानकी स्वत्वासाठी ताठर होते. दिसायला एरवी सर्वसामान्यच नव्हे, तर बहुजनांसाठी अतिसामान्य असलेल्या या मुलीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहण्यासारखे, पाहून स्तिमित होण्यासारखे.

'चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे' ही शेवटी येणारी पाटी अंतर्मुख व्हायला भाग पाडते.