ग्रॅन्ड कॅनियन सहल- अखेर लासवेगासला पोहोचलो

अखेर लासवेगासला पोहोचलो...


             भावाशी संपर्क करता यावा म्हणून मी मध्यरात्री हॉटेल बाहेरील हिरवळीवर बसून इतर आरक्षणे बदलू लागले. डास, मुंग्या रातकिडे यांच्या सोबतीने एकटेपणा वाटत नव्हता......


          माहितीजाळ्यावरून हॉटेल, कार व विमानाच्या तिकिटांचे विविध कंपन्यांतर्फे आरक्षण ही सध्या अगदी प्रचलित बाब आहे. प्रत्येक वेळी आपण काही नियम/ अटी स्वीकारून मग पुढे आरक्षण करत असतो. प्रत्येक ठिकाणी मुख्य प्रवासी म्हणून माझे नाव व इतर माहिती दिली होती. बरीच हुज्जत घातली आणि माझ्या ध्यानात आले की माझ्या भावाकरता कार किंवा हॉटेल कशाचेही आरक्षण हस्तांतरित होणार नव्हते आणि हॉटेलचे पैसे परत मिळणार नव्हते. कारण ती अट मीच मान्य केली होती!! भाऊ टॅक्सी करून हॉटेलवर गेला असता पण आता हॉटेलचे नवे आरक्षण आवश्यक होते. तेवढ्यात भावाचा दूरध्वनी आला. त्याला सर्व माहिती दिली. हॉटेलच्या आरक्षणाचा दर कळताच त्याने लासवेगास विमानतळावर उरलेली रात्र व आम्ही येईपर्यंतचा दिवस सहज घालवता येईल असे उत्तर दिले. लासवेगास हा अतिशय गजबजलेला विमानतळ असल्याने तसा तिथे राहण्यात धोका नव्हता. 


               जेमतेम एक दीड तास झोपून पहाटे चार वाजता आम्ही पुन्हा चेक इनच्या रांगेत हजर झालो. तुमचे तिकीट या कंपनीने दिले तिथे आधी जा, ही कागदपत्रे दाखवा, असे करा, तसे करा अशी तब्बल दोन अडीच तास माझी धावपळ सुरू होती. सारे सोपस्कार पार पडले.
          'जा, सुखाने प्रवास करा' असा आशीर्वाद व बोर्डिंग पास हातात पडले. सकाळचे सात वाजत होते. सुरक्षाव्यवस्थेतून अगदी काटेकोर तपासणी झाली. सगळ्या तपासण्या पार पाडून आम्ही आमच्या विमान थांब्यावर गेलो. फलकावर आमचे विमान वेळेवर सुटणार असे दिसत होते. एवढा वेळ निवांतपणा असा नव्हता पण आता मात्र खूप भूक लागली आहे असे जाणवले. विमान कंपनीने सकाळच्या नाश्त्याकरता काही कूपने दिली होती.  ती वापरावी असा विचार माझ्या मनात आला.  ती घेणारे उपाहारगृह आमच्या नवीन विमान सुटणाऱ्या विमानथांब्यावर(टरमिनलवर) नव्हते. खिशातून एकही दमडी न देता नाश्ता करण्याचे माझे स्वप्न त्यामुळे अपूर्ण राहिले. असो. असे काही तरी मनाविरुद्ध झालेच पाहिजे!पैसे खर्चून आम्ही सर्वांनी कॉफी घेतली. खरं तर चहा कॉफीचे पैसे द्यायची आधी तयारी होती. पण त्या कुंपनांनी उगीच मनात वाद निर्माण केला. काही वेळाने विमानात प्रवेश करा अशी घोषणा झाली.


'आपले स्वागत असो 'असे मधाळ हसून हवाई सुंदरीने आमचे स्वागत केले. कमरेभोवती पट्टे आवळून आम्ही पुढील प्रवासाला तयार झालो. विमान धावपट्टीवर धावू लागले.  काही क्षणातच त्याने आकाशात झेप घेतली.


          या नंतर आणखी दोन ठिकाणी विमान बदलायचे होते, थोडादेखील  उशीर पुढील सगळे बेत उधळून लावणार होता. आता ऐनवेळी सुटीच्या गर्दीत आरक्षण मिळणे खरंच अवघड होते. विचारातच आम्हा सर्वांचा डोळा लागला आणि विमान धावपट्टीवर उतरताना आम्हाला जाग आली. चला, एक टप्पा पार पडला. लगेच दूरध्वनीने घरी व भावाशी संपर्क साधला. त्यांना पुढचे विमान सुद्धा वेळेवर आहे याची कल्पना दिली. मनात शंकेची पाल चुकचुकत होती पण तसे काही घडण्याआतच आम्हाला पोटात सामावून दुसरे विमानही आकाशात उंचावले. सर्वजण डोळे मिटून जमेल तेवढी विश्रांती घेत होतो. 


               काही वेळाने लोकांनी खिडकीतून खाली दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांची छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. मी सुद्धा चटकन त्या शिखरांना माझ्या छायाचित्रकाने टिपले. पुढील प्रवासात मे- जून मध्ये त्या शिखरांवर खरंच बर्फ आहे किंवा नाही याकरता मी दूरवर दिसणाऱ्या सर्व पर्वतांवर बर्फ शोधत होते ही गोष्ट वेगळी!


विमान धावपट्टीवर उतरले. आता फक्त एक टप्पा की आम्ही सर्व लासवेगासला जाणार होतो.


               त्या विमानतळावरून आमचे विमान सुटण्यास एक तास अवधी होता. विमानथांबा लोकांनी गजबजला होता. शाळाकॉलेजांच्या उन्हाळ्याचा सुटीची नुकतीच सुरुवात झाली जोती. त्यामुळे कित्येक कुटुंबे मुलाबाळांसह प्रवासाला निघाली होती. पुढील सहलीचा विचार करत आम्ही विमानात पाऊल ठेवले.

                 लासवेगास जसे जवळ आले तसे खिडकीतून धावपट्टीच्या एका बाजूला पसरलेले विविध कसीनो आणि मोठाली हॉटेल्स दिसू लागली. हा एमजीएम ग्रॅन्ड, हा कसीनो न्यूयॉर्क अशा किलबिलाटाने लासवेगासच्या धावपट्टीवर उतरणारे आमचे आमचे विमान सजीव भासू लागले.


यापुढे- लासवेगास ते ग्रॅन्ड कॅनियन