ग्रॅन्ड कॅनियन सहल- विमानप्रवास-१

विमान प्रवास भाग १
न्यूऑर्लिन्स विमानतळाशेजारील पार्किंग व्यवस्थेत गाडी पार्क केली. तेथून सगळे सामान घेऊन आम्ही एका बसने "चेक इन" करायच्या रांगेत उभे राहिलो.  .....


                     विमानाची सुटण्याची वेळ एकदा पुन्हा भटक्याने(भ्रमणध्वनी, मोबाईल फोन) संपर्क करून तपासली.  आतापर्यंत विमान वेळेवर आहे असे दाखवणारे फलक आता विमान दोन तास उशीरा सुटणार असे दाखवत होते.  लगेच घरी पतीला व भावाला दूरध्वनीने त्याची कल्पना दिली.  थोडक्यात आमच्या आधी पोचल्यामुळे भावाला लासवेगासला आमची प्रतीक्षा करावी लागणार असे दिसत होते. 


          विमानप्रवासाच्या वेळापत्रकात असे थोडे फार बदल होऊ शकतात याची आम्हाला कल्पना होती. आई बाबा गप्पा मारत होते. मी अधून मधून बॅगांशेजारी रांगेत उभी राहत होते. जसजशी गर्दी वाढत होती तेंव्हा लोकांशी बोलताना नवीन माहिती मिळाली. याच कंपनीचे काल सुटणारे हेच विमान रद्द झाले होते आणि त्यातील विमानप्रवासी आज आमच्या बरोबर येणार होते. शेवटी एकदाच्या आमच्या बॅगा 'चेक इन' होऊन हातात 'बोर्डिंग पास' मिळाले.   आमच्या गप्पा सुरू होत्या.  विमानतळावर जवळपास चार तास ताटकळत थांबलो होतो.    
  
                    अखेर ज्याची भिती वाटत होती तेच घडले. रात्री साडेअकराच्या सुमारास अखेर आज सुटणारे आमचे विमान रद्द केल्याची घोषणा कानी आली! विमान कंपनीशी संपर्क करून पुढील प्रवासाचे पुर्नआरक्षण करण्याची व सामान परत घेण्याची आम्हाला सूचना मिळाली. आता काय? असे मोठे प्रश्नचिह्न सगळ्याच्याच चेहऱ्यांवर दिसत होते. चिंतातुर मुद्रेने सामान परत घेण्याच्या ठिकाणाकडे जात असताना सगळ्या हातातील भटके विमान कंपनीशी संपर्क साधू लागले..


           एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे चेंडूफेक करावी तशी टोलवाटोलवी होत शेवटी मला मदत करण्यास समर्थ अशा कर्मचाऱ्याशी दूरध्वनीच्या रांगेत बोलण्याचा माझा क्रमांक लागला.

"नमस्कार, माझे नाव मेगन आहे. मी तुम्हाला आरक्षणात मदत करणार आहे. आपण कृपया वाट पाहू शकता का?" असा प्रश्न मंजुळ आवाजात कंपनीच्या स्त्री कर्मचाऱ्याने विचारला.

"हे देवी माते, आता मला तारणे वा मारणे तुझ्याच हातात आहे." अशा भावनेने मी तिला 'हो' सांगितले.


                   सुदैवाने आमचे सगळे सामान आम्हाला मिळाले होते. आई बाबांनी अधिक विचार न करता सामानाशेजारी बैठक मारली. शारीरिक श्रमापेक्षा पुढे काय होईल या अनिश्चिततेमुळे त्यांना,मला आणि इतर सहप्रवाश्यांना थकवा आला होता. नवराबायकोची भांडणे, लहान मुलांचे रडणे, किरकिर आणि  दूरध्वनीवरील तावातावाची संभाषणे ऐकू येत होती.  वेंडिंग मशीन मधील शीतपेयांच्या कॅन्सचा घरंगळताना येणारा आवाज, बाहेर सिगारेटचा वाढता धूर सारे काही लोकांच्या सुटीच्या आनंदावर विरजण पडते की काय या भावनेच्या उद्रेकाची लक्षणे होती.


              माझी सगळी माहिती ऐकून मेगनने तिच्या संगणकाच्या यंत्रणेत आमची तिकिटे शोधली. तिला सकाळी ६ वाजता न्यू ऑर्लिन्स ते फिनिक्स आणि पुढे विमान बदलून लास वेगासला जाणाऱ्या एका विमानात दोन जागा शिल्लक आहेत असे दिसले. आई बाबांचे आरक्षण वेगळ्या कोट्यातून केले होते. त्यामुळे त्यांना या जागा मिळू शकत नाहीत असे तिने सांगितले. मी एकटीने पुढे जाण्यात काहीच अर्थ नव्हता.
" आमच्या कोणत्याही विमानात तुम्हाला देता येतील अशा जागा उद्या संध्याकाळपर्यंत उपलब्ध नाहीत."

"दुसऱ्या विमानकंपनीला विचारता का?"

 "दुसऱ्या विमान कंपन्यांच्या जागेसाठी तिच्या वरिष्ठांकडे विचारावे लागेल "


          आमचे संभाषण नक्की काय सुरू आहे याचा अंदाज आई बाबांना होता.  तिला मी सर्व पर्याय विचारले अथवा नाही याची ते खात्री करत होते. मी सार्वजनिक दूरध्वनीने घरी दूरध्वनी केला. भ्रमणध्वनीवर ती कर्मचारी आणि दुसऱ्या दूरध्वनीवर पती, असे दोन कानांना दोन दूरध्वनी लावून माझी कसरत सुरू होती.


             आम्ही दुपारी चार पर्यंत जर लासवेगासला गेलो तर हॉटेल व गाडीच्या आरक्षणात किरकोळ बदल करून बाकी इतर बेत तसाच राहणार होता.  विमानतळावरची गर्दी आता पांगू लागली. सर्व विमान प्रवाश्यांची व्यवस्था एका हॉटेलात केली होती. तिथे जाण्यास आता मंडळी लगबगीने निघू लागली. विमानतळावर बहुतेक सर्वांना उद्या सकाळ ते दुपारपर्यंत निघणाऱ्या विमानांवर जागा मिळाली होती असे त्यांचे चमकणारे चेहरे सांगत होते.


          "आमच्या कुटुंबातील काही सदस्य आधीच लासवेगासला पोचले आहेत. आम्ही उद्या दुपारपर्यंत गेलो नाही तर इतर सर्व बेत रद्द करावे लागतील"


"ओह, तुम्हाला लग्नाला जायचे आहे"


 माझे तर्खडकरी अथवा शुद्ध आमटीभात इंग्रजी ऐकून आम्ही सर्व एका लग्नाला जात आहोत असा तिचा गोड गैरसमज झाला.


जवळपास अर्ध्या तासाने आम्हा तिघांची व्यवस्था तिने दुसऱ्या एका विमानकंपनीच्या, तीन टप्प्याने लासवेगासला जाणाऱ्या विमानांवर केली.


'माझ्याजवळ हाच एक पर्याय आहे तेंव्हा तुमचा निर्णय सांगा' .

मी तिला होकार दिला. दुसरीकडून दूरध्वनीवर पतीने मी तसेच करावे असे सुचवले.
"उद्या सकाळी दोन तास आधी विमानतळावर या व तुमचे बोर्डिंग पास घ्या".


 तिने दिलेली आरक्षणाची सर्व माहिती नीट लिहून घेऊन तिचे आभार मानून मी संभाषण संपविले.


          माझा भाऊ एका तासातच लासवेगासला येऊन पोहोचणार होता. विमानात भ्रमणध्वनी बंद असल्याने त्याला ह्या घडामोडींची काहीच कल्पना नव्हती. माझे सर्व निरोप त्याला विमानातून बाहेर आला की मिळणार होते.


           एका बसने विमानतळावरून आम्ही हॉटेलवर गेलो.  आई बाबांची झोपमोड होऊ नये म्हणून मी दुसऱ्या खोलीतील दूरध्वनीवरून हॉटेल व कारचे आरक्षण बदलू लागले. सगळीकडे भ्रमणध्वनी कक्षेत असतो या फाजील आत्मविश्वासाने मी कोणतेही 'कॉलिंग कार्ड' घेतले नव्हते. नेमका हॉटेलमध्ये माझ्या भ्रमणध्वनीचा संपर्क जाळ्यापासून तुटला होता!


   भावाशी संपर्क करता यावा म्हणून मी मध्यरात्री हॉटेल बाहेरील हिरवळीवर बसून इतर आरक्षणे बदलू लागले. डास, मुंग्या रातकिडे यांच्या सोबतीने एकटेपणा वाटत नव्हता......