ग्रॅन्ड कॅनियन सहल- प्रस्तावना

प्रस्तावना             


                ग्रॅन्ड कॅनियन सहलीच्या दरम्यान काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. ह्या लेखमालेत त्या ठिकाणांची माहिती देते आहे. अमेरिकेतील लोकांचे अनुभव, प्रवासाची पूर्वतयारी, विमान प्रवासात येणारे अडथळे याचे वर्णन आणि अनुभव वाचकांपुढे मांडण्याची इच्छा आहे. माहितीजाल वापरून आरक्षणे करताना घेण्याची काळजी, अमेरिकेतील प्रादेशिक वैशिष्ट्ये याची वाचकाला माहिती व्हावी अशी सुद्धा माझी भूमिका आहे.  छायाचित्रे लेखमालेच्या शेवटी देणार आहे. शिवाय ती गुगल शोधकाचा वापर करून वाचकांना शोधता येतीलच.


                   आईवडीलांना या फेरीत जमेल तेवढे अमेरिका दर्शन घडवण्याचा विडा मी उचलला होता. मानवनिर्मित स्थळांपेक्षा आम्हाला निसर्गाची विविधता आवडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यान दर्शन हा चटकन समोर येणारा एक पर्याय होता.(नॅशनल स्टेट पार्क्स

)  आईवडीलांनी ग्रॅन्ड कॅनियन, मोन्युमेंट व्हॅली, ब्राईस कॅनियन व झायन कॅनियनला बघायला आवडेल असे सांगितले. 

          आमच्या सहलीतील प्रवासाचे टप्पे साधारण असे होते-आमच्या गावापासून न्यू ऑर्लीन्स,(ल्युझियाना राज्य) असा एक तासाचा कारचा प्रवास करून विमानतळावर जायचे.  त्यानंतर न्यू ऑर्लिन्स ते लासवेगास(नेवाडा राज्य) असा साधारण साडेचार तासाचा विनाथांबा (डायरेक्ट फ्लाईट) विमानप्रवास करायचा. माझा भाऊ टेक्सास राज्यातून लास वेगासच्या विमानतळावर आम्हाला भेटणार होता. त्या रात्री लास वेगास दर्शन व तेथेच रात्रीचा मुक्काम.  दुसऱ्या दिवशी चौघांनी पुढे साधारण सहा तासाचा कारने प्रवास करून वाटेतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत ग्रॅन्ड कॅनियनचा पल्ला गाठायचा.


             विमानाची तिकिटे,वेगवेगळ्या गावातील राहण्याच्या जागेचे आरक्षण, कार याची व्यवस्था झाली. त्यानंतर सगळ्या सहलीचे अंदाजे वेळापत्रक, विविध राज्यांतून वाहतुकीचे मार्ग दाखवणारे व माहितीचे नकाशे, छायाचित्रक (कॅमेरा),चलचित्रक(व्हिडिओ कॅमेरा)गाण्याच्या ध्वनिफिती, आपापल्या बॅगा यांची जमवाजमव झाली.  मेमोरियल डे हा मे महिन्यातील मोठा सप्ताहांत (लॉन्ग विकेंड)जसा जसा जवळ येऊ लागला तशी आमची पहिली वाहिली, एकत्र, कौटुंबिक सहल अगदी नजरेच्या टप्प्यात दिसू लागली.


          गावातील काही मित्रांनी,"वा तुमची काय मजा आहे .चौघेजण मस्त फिरा, बिचारा नवरा घेतो आहे मुलीची आणि घराची काळजी! अशी गंमत केली.


एकाने "आता अगदी मुहूर्त पाहून काय जाता आहात? वाळवंटात रखरखणारे ऊन आणि मोठ्या सुटीची केवढी गर्दी !आम्ही सुद्धा हीच सहल केली आहे पण कसे अगदी सगळे नीट आखून , काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन!"असा प्रेमळ सल्ला दिला.
अशा सल्ल्यांनी मिनिटा मिनिटाला माझे डोके वाळवंटापेक्षा अधिक तापत होते.


             "तुम्हाला तिकिटे कशी मिळाली? "
"केवढ्याला मिळाली? हॉटेल कोणती आहेत?त्यांचे दर काय?"
"बाप रे एवढे महाग" 
"वा!मजा आहे, छान चापलेत!" अशा संवादांनी आमच्या हितचिंतकांनी माझ्याशिवाय आईवडीलांना दूरध्वनी करून भंडावून सोडले ते वेगळेच.


मग आईबाबांना दरवेळी डॉलरचे रुपयांत हिशोब करतांना पाहून प्रवासाची मजा कमी होईल की काय अशी मला काळजी वाटू लागली. आमच्या जमा झालेल्या 'विमान मैलांतून' (फ्रिक्वेंट फ्लायर माईल्स) तुमची तिकिटे काढली आहेत आणि हॉटेलचा खर्च फार नाही असे त्यांना सांगितले.


              कार्यालयातील अमेरिकन सहकाऱ्यांनी सुद्धा ही काळजी घ्या, अमुक करा, तमुक करू नका अशा सूचना दिल्या.  कमी अधिक प्रमाणात तिकिटे आणि इतर गोष्टींविषयी उत्सुकता त्यांनी सुद्धा दाखवली. आपल्या माणसांनी, आपल्या भाषेत केलेल्या चौकश्या कदाचित जास्त बोचऱ्या वाटतात. गोऱ्या साहेबाने काही विचारले तरी त्याचा साधा सरळ आणि योग्यच अर्थ घेण्याची गुलामगिरी अजूनही माझ्यातून गेली नाही अशी खंत त्यावेळी मला वाटली.


                        सर्व आवश्यक गोष्टी घेतल्याची उजळणी करत आमची गाडी न्यू ऑर्लिन्स कडे धावू लागली. भटक्याने(भ्रमणध्वनीने, मोबाईल फोन) भावाशी संपर्क साधला. पुढील एक तासात तो सुद्धा त्याच्या गावातील विमानतळाकडे निघणार होता.


                न्यूऑर्लिन्स विमानतळाशेजारील पार्किंग व्यवस्थेत गाडी पार्क केली. तेथून सगळे सामान घेऊन आम्ही एका बसने "चेक इन" करायच्या रांगेत उभे राहिलो.  .....


पुढील भागात-विमानप्रवास १