ग्रॅन्ड कॅनियन सहल- लासवेगास भेट

लासवेगासला परत- लासवेगास भेट 

                झायन कॅनियन पाहून आम्ही लासवेगासकडे निघालो. जवळजवळ सर्व रस्ता मोठाले डोंगर दुभागून तयार केला आहे.  ग्रॅन्ड कॅनियन व झायन सारखे खडक असलेले पर्वत कितीतरी वेळ आमची सोबत करत होते.  चार ते पाच पदराचा हा रस्ता घाटाघाटातून जातो. लोक वळणांवरही ८० मैलाहून अधिक वेगाने गाडी चालवत होते. काही वेळेस तुम्ही वळणावर असता आणि अचानक तुमच्या अगदी समोर मोठा पर्वत दिसतो.  तुमचा रस्ता मोकळाच असतो पण पर्वताची भव्यता नकळत गती गतिरोधकावर पाय ठेवण्यास भाग पाडते. हा अनुभव वारंवार येत होता.


                    रात्री सातच्या सुमारास आम्ही लासवेगासला पोहोचलो. ज्या रस्त्यावर दोन्ही बाजूला हॉटेल्स आणि कसीनो आहेत तो रस्ता माणसांनी गजबजला होता. पायवाटेवर माणसांची गर्दी होती. ठिकठिकाणी थांबून लोक छायाचित्रे घेत होते.  ह्या रस्त्यावरील प्रत्येक इमारत स्थापथ्यशास्त्राच्या दृष्टीने वेगळी आहे. कित्येक नव्या इमारतींचे बांधकामही सुरू होते.गणेशोत्सवात जसे देखावे करतात तसे जगभरातील प्रसिद्ध इमारतींच्या किंवा शिल्पांच्या प्रतिकृती म्हणजे ह्या इमारती.  हॉटेल न्यूयॉर्कच्या प्रांगणात आम्ही स्वातंत्र्य देवतेचा भव्य पुतळा पाहू शकलो. काही अंतरावर हॉटेल इजिप्तसमोर इजिप्तचे पिऱॅमिडस् दिसले.  काही अंतरावर आम्हाला पॅरिसचा आयफेल टॉवर होता.  इमारती सभोवतीची झाडे, फुलझाडे लक्षवेधी होती. रंगीबेरंगी फुलांनी भरलेले ताटवे आणि लगतची हिरवळ पाहता आपण वाळवंटी प्रदेशात आहोत याचा विसर पडला. तासाभरात इमारतींवरचे दिवे लागले. त्या रोषणाईने इमारतींचे सौंदर्य अधिकच खुलले.


        इंग्रजी चित्रपटाची माहिती असणाऱ्यांना एम जी एम ग्रॅन्ड हे नाव परिचित आहेच. ह्या रस्त्यावर एम जी एम ग्रँड कसीनो आहे. त्या कसीनोसमोर सिंहाचा सोनेरी लखलखणारा भव्य पुतळा आहे. आम्ही त्या कसीनोत शिरलो. वाद्याचे मंद सूर कानावर येत होते.  काही भागात मंद प्रकाशाचे दिवे होते.  काही ठिकाणी झगझगीत प्रकाश होता. सगळीकडे जुगारात मग्न झालेले लोक दिसत होते. त्यांच्याकरता मदतीला टापटीप पोशाखातले कर्मचारी होते. काही सुंदरी हातात मद्याचे चषक घेऊन सगळीकडे फिरत होत्या.  त्यांचे पोशाख आणि पदलालित्य विशेष आकर्षक होते. जुगारात मग्न असणाऱ्यांना त्या मद्य आणून देत होत्या.


                बऱ्याच हॉटेल्स मध्ये 'ऍडल्ट शोज' असतात. थोडक्यात सांगायचे तर अंगप्रदर्शन होईल अशा विविध प्रकारच्या पोशाखात जथ्याने तरुण तरुणीचे नृत्याचे कार्यक्रम सुरू असतात. कमीत कमी अंगावर काय घालावेच लागेल त्याचे नियम आहेत म्हणे! अशा पोशाखातली एकटा पुरूष किंवा स्त्री दिसली तर  संकोच वाटू शकतो.  रंगमंचावर १०० जणांना नाचताना पाहून हा संकोच नक्कीच कमी होतो. किंवा परदेशात राहून माझी नजर मेली आहे असे म्हणा. तसेही आता हिंदी चित्रपट भारतीयांच्या सर्व प्रकारच्या सहनशक्तीच्या सीमा ताणतात. इंग्रजी चित्रपटांविषयी न बोललेलेच बरे.  त्यामुळे ह्या शोंच्या नावावर जाऊ नकाः) जगामध्ये ज्या साधनांनी वा पद्धतीने जुगार खेळत असतील त्या सर्व सोयी लासवेगास मध्ये आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


                   सर्व कसिनो कमी अधिक प्रमाणात सर्वसाधारणपणे त्याच सोयींनी युक्त होते. चालत चालत आम्ही आयफेल टॉवरजवळ आलो.  कसिनो पॅरिस बघण्याकरता आत गेलो. पूर्ण कसीनोभर निळा प्रकाश नजरेला सुखावत होता. पॅरिसमध्ये जशी घरे किंवा दुकाने आहेत तशा स्वरूपाची छोटी उपाहारगृहे आत होती. युरोपीय पद्धतीची घरे चटकन लक्षात येत होती. प्रत्येक कसिनोमध्ये छतावर व भिंतींवर नक्षीकाम व कलाकुसर केली होती. कसिनो पॅरिसही त्याला अपवाद नव्हता. फक्त त्यासर्वांवर फ्रेंच संस्कृतीचा पगडा अधिक होता. बरेच लोक मान वर करून छताकडे पाहत होते. आम्ही सुद्धा उत्सुकतेने वर पाहिले. निळ्या आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांनी आम्हाला भुरळ पाडली. खरच आकाश आहे की छतावर केलेली कलाकुसर?  असा प्रश्न मनात आला.  तो फरक न कळण्याइतकी सुंदर आणि बेमालूम सजावट कसिनोतील छतावर केली होती.  तेच दृश्य डोळ्यात साठवून आम्ही बाहेर पडलो.


          ह्याच रस्त्यावर एका चौकात मोठे कारंजे आहे. दर अर्ध्या तासाने त्याचे फवारे सुरू होतात. साथीला वाद्यांची जोड असते. आम्ही त्या चौकात थांबलो. कारंज्याचे फवारे सुरू झाले. विविधरंगी दिव्याच्या प्रकाशात पाण्याच्या फवाऱ्यांचे आकार अधिकच खुलले.  जाता येता लोक थांबून पाण्याचे तुषार अंगावर झेलत होते. वाऱ्याबरोबर हा गारवा खूप सुखद वाटला.   


          आमचे हॉटेल जवळजवळ तासभर चालत जावे लागेल एवढे दूर होते. चौकाचौकात थांबणाऱ्या बसेस रस्त्यावरून ये जा करत होत्या. काही जण दिवसभराचे तिकीट काढून या रस्त्यावर हवे तितके वेळा जाणे येणे करतात. आम्ही परतीचे तिकीट काढून एका बसमध्ये चढलो आणि आमच्या हॉटेलमध्ये गेलो. लासवेगासची श्रीमंती डोळ्यासमोरून जात नव्हती. दुसऱ्या दिवशी न्यूऑर्लिन्सचा विमानप्रवास करायचा होता.
-सोनाली जोशी
यापुढे सुखरूप घरी परत