ग्रॅन्ड कॅनियन सहल -ग्रॅन्ड कॅनियनकडे

लासवेगासहून ग्रॅन्ड कॅनियनकडे



         विमानाच्या बाहेर येताक्षणी विमानतळावर नजर जाईल तेथे सट्टाबाजीला उद्युक्त करणारी स्लॉट मशीन्स दिसू लागली. दिव्यांचा झगमगाट, रोषणाई,नाण्यांची खणखण, बियर व इतर मद्ये आणून देणाऱ्या ललना दिसत होत्या.  सारे विसरून जुगारात दंग झालेले कित्येक लोक मी अचंब्याने पाहात होते!. २१ वर्षाच्या तरूणापासून तर ८० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत जणु सारे आपले नशीब अजमावायला लासवेगासला आले होते! सट्टाबाजी आणि सौंदर्याची खुली वसाहत म्हणून अमेरिकेत, नेवाडा राज्यात, वसविलेले लासवेगास जगभरात ओळखले जाते. 


              घरी फोन केला व खुशाली सांगितली. लगेच भावाशी संपर्क साधून त्याला आमचे सामान येते तेथे भेटण्यास सांगितले. आम्हा सर्वांची भेट झाली आणि आमचे सामानही मिळाले. आता सगळ्यांच्या नजरा होत्या ग्रॅन्ड कॅनियनकडे!


              स्थानिक वेळेनुसार दुपारचे तीन वाजत होते. नकाशे पाहून मार्गाची खात्री केली. मी ग्रॅन्ड कॅनियनच्या दिशेने  गाडी चालवण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने पोटपूजा करून जवळच्या गॅस स्टेशनवर(पेट्रोल पंप) कॉफी घेतली.  पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा घेतला. यापुढील प्रवासात गाडीतले पेट्रोल आणि पिण्याचे पाणी याकडे लक्ष देणे आवश्यक होते. वाटते आमचा पहिला थांबा होता 'हूवर धरण'.  बोलता बोलता असे लक्षात आले की कॅमेराचे सेल घेतले नाहीत. पुढील प्रवासात आणखी काय विसरले आहे याचे नवीन शोध लागणार होतेच! काही अंतरावर एक गॅस स्टेशन आले.तिथे ते सेल घेतले आणि सर्वजण हूवर धरणाकडे निघालो. 


     वातानुकुलीत गाडी असूनही उन्हाळा चांगलाच जाणवत होता,काचा गरम होत्या आणि गाडीत ऊन्हाचे चटके बसत होते. काळ्या रस्त्यावर चमकणारे ऊन मृगजळाचा भास निर्माण करत होते. साधारण ताशी ९० मैल अशा वेगाने मी गाडी चालवत होते. गाडीचे गतिरोधक दाबले तर गाडी पाण्यातून घसरणार नाही ना? असा विचार कित्येकदा मनाला स्पर्शून गेला.


          लासवेगास मागे पडल्यावर रस्त्यावर अगदी एखादी गाडी दिसत होती. दोन्ही बाजूला नजर जाईल तिथवर वैराण, उजाड प्रदेश. खूप निरखून पाहिले की अगदी क्षितिजाजवळ उंचच्या उंच  लांबलचक पर्वताच्या रांगा दिसत होत्या. खरं तर आता रस्त्यावर बरीच गर्दी असेल असा आमचा अंदाज होता. त्यामुळे आपण रस्ता चुकलो नाही ना याची दहा वेळा खात्री केली. जसे जसे हूवर धरण जवळ येऊ लागले तशी रस्त्यावरची गर्दी वाढली. चढावाचा घाटातून जाणारा रस्ता नागमोडी वळणांचा होता त्यामुळे गाडीचा वेग खूप कमी करावा लागला.     


              धरणाच्या आसपास सर्व गाड्या लावण्याच्या जागा (पार्कीग लॉट्स) भरल्या होत्या. बरेच पुढे गेल्यावर शेवटी एक जागा मिळाली. धरणाकडे चालण्यास सुरुवात केली. उंचावरून दिसणारा धरणाचे दृश्य सुंदर होते. फेसाळणारे निळे हिरवे पाणी आणि त्याच्या प्रवाहाचा जोर! हे धरण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने एक उत्कृष्ट उदाहरण समजले जाते. त्याची रचना व कार्य समजवून सांगण्याकरता इथे शासनातर्फ़े सोय आहे.  


                     धरणाच्या आजुबाजुला सगळीकडे उंच पर्वत आहेत आणि पर्वताच्या रांगेतून तसेच नागमोडी वळणे घेत वाहणारी नदी दिसते.  उन्हापासून संरक्षणाची सर्व खबरदारी घेऊनही कानाला उन्हाच्या झळा जाणवत होत्या, दहा मिनीटे चालताच आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो. धरणाचे चित्रण करण्यासाठी मी चलचित्रक सुरू केला. पहाते ते काय समोर सगळीकडे अंधार दिसत होता.


                 तापमानातील फरकाने लेन्स वर बाष्प जमा झाले होते, त्याचे हात लावताच तयार होणारे पाण्याचे थेंब पुसूनही दोन्ही चित्रके(कॅमेरे) काम करेना. छायाचित्रांपेक्षा चलचित्रीकरणाने बघणाऱ्याला खरी अनुभूती येते. भारतात परत गेल्यावर आई बाबांना भेटायला घरी येणाऱ्या प्रत्येकाला अमेरिकेतील निसर्गाचे दर्शन घडवण्याच्या 'पुण्याला' मी मुकणार होते! चलचित्रीकरणातून माहितीपट तयार करण्याची एवढी मोठी संधी मी गमवणार होते. 


                  अखेर थोड्या वेळाने बाष्प तयार होणे थांबले. शिवाय गडबडीत मी कोणतीतरी चुकीची कळी दाबली होती. बराच वेळ खटपट केली. अखेर सर्व अंधारवणारी चलचित्रकाची कळी सापडली. एकदाची दोन्ही चित्रके (कॅमेरे)सुरू झाली. मला चलचित्रीकरण करता आले. 


           आजुबाजुच्या वैराण भागातून वाहणारी ही नदी म्हणजे एक आश्चर्यच होते. खुरटी झुडपे आणि कॅक्टसशिवाय कोणतीही झाडे नजरेच्या टप्प्यात नव्हती. उन्हाचा तडाखा जबरदस्त होता. असेच ऊन पूर्ण सहलीत राहिले तर सगळ्याच स्थळांना अगदी धावती भेट द्यावी लागणार होती. हूवर धरणाचा निरोप घेऊन आम्ही ग्रॅन्ड कॅनियनचा मार्ग धरला. परतीच्या प्रवासाचा मार्ग वेगळा होता. आम्हाला तेंव्हा धरणाचे जवळून दर्शन होणार नव्हते.


-सोनाली जोशी
 यापुढे- ग्रॅन्ड कॅनियन भेट