ग्रॅन्ड कॅनियन सहल-मॉन्युमेंट व्हॅली

मॉन्युमेंट व्हॅली


               अरिझोना आणि उटा या राज्याच्या सीमेवर मॉन्युमेंट व्हॅली आहे. हा प्रदेश नवाहो इंडियन जमातीच्या अधिकारात आहे. वालुकाश्माने एके काळी हा प्रदेश व्यापला होता. त्यांच्या हजारो फूट उंच विविध आकाराच्या अवशेषांनी ही मोन्युमेंट व्हॅली तयार झाली आहे. लाल तांबड्या  एकमेकांपासून दूर उभ्या विविध आकृत्या वाळवंटी प्रदेशात आपले लक्ष वेधतात. चित्रपट, जाहिराती, पर्यटन व सहलींच्या पुस्तकात ही निसर्गनिर्मित शिल्पे कित्येकांनी बघितली असतील. प्रत्यक्षात त्यांचे रंग तसेच चमकदार आहेत.


              बाहेरच्या मोठ्या रस्त्याने(हायवे यूएस 163 AZ and यूएस 183 utah )जाताना बरीच शिल्पे बघता येतात.  साधारण १७ मैल कच्च्या रस्त्याने 'नवाहो' जमातीच्या ह्या आरक्षित जागेतून फिरताना त्यांचे जवळून निरीक्षण करता येते. त्या शिल्पांच्या आकारांवरून त्यांना नावे दिली आहेत.


               उन्हाचा चटका खूप जाणवत होता. रखरखीत वाळवंटात वाऱ्याने तांबड्या धुळीचे लोट उडत होते. काही आकार एवढे मोठे आहेत की त्यांचे छायाचित्र 'पॅनोरॅमिक व्हू' शिवाय घेता येणे शक्य नाही.


         एकमेकांपासून काही अंतरावर उभे पण सलग्न असे तीन सुळके दिसतात. त्यांचे नाव 'थ्री सिस्टर्स' असे आहे. थोरली आणि मधली साधारण सारख्या उंचीच्या बहिणी असाव्यात. त्यांची धाकटी बहीण रुसून जरा दूर उभी आहे असे त्यांच्याकडे पाहिले की भासते. दोघीजणी आता धाकटीची कशी समजून घालावी याची सल्लामसलत करत आहेत अशा विचारात दिसतात.!


          काही आकारांनी दिलेली नावे मजेशीर आहेत. अर्थात ही नावे खूप पूर्वी संशोधकांना जसे आकार दिसले त्यानुसार दिली आहेत.  माहिती केंद्राजवळ दिसणारा एक भला मोठा उंचवटा म्हणजे 'एलिफंटस् बट्' ! हा आकार अजस्त्र व उंच आहे. एखादी शेपटी असावी असाही भास होतो त्यामुळे त्याला असे नाव दिले असावे.  असेच 'कॅमल बट्' सुद्धा आम्ही पाहिले.


              माहिती केंद्राजवळून 'इस्ट आणि वेस्ट मिटन बट्स' असे दोन आकार लक्ष वेधतात. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाऊन आम्ही प्रत्येक आकार पाहत होतो आणि त्यांचे छायाचित्रण करत होतो.


          निळ्या आकाशात काही पांढरे ढग  रेंगाळताना दिसत होते. उन्हाची चमकती किरणे त्यावर पडत होती.  ह्या आकृत्यांचे लाल तांबडे रंग अधिकच उठावदार होत होते. या प्रदेशात तांबडी लाल भुसभुशीत माती आहे.  सर्व दूर काही अंतरावर पसरलेले असे उंच पसरट आकार आणि त्यांच्या जवळची खुरटी हिरवळ असे दृश्य वारंवार दिसत होते. आम्ही प्रत्येक आकाराकडे पाहून याचे नाव काय असावे असा अंदाज करत होतो.


            बरेच दूरवर 'ईगल मेसा' असा खूप पसरट आकार दिसला. त्याची भव्यता पाहून डोळे दिपले. गेली कित्येक वर्षे वातावरणाचा परिणाम होत असूनही ह्या आकृत्या फारशी पडझड न होता टिकून आहेत. काही ठिकाणी आकाराच्या पायथ्याशी थोडे घरंगळलेले दगड व भुसभुशीत माती दिसते. पायथ्याशी साठू लागलेला दगडामातीचा थर कालांतराने वाढून नवीन आकार निर्माण करतील असेही मनात आले.


          प्रत्येक वेळी गाडीतून चढ उतर करत होतो. त्यावेळी इतर गाड्यांमुळे उडणाऱ्या धुळीने आम्हाला तांबड्या रंगाने माखले होते. इतर सहप्रवाशांची अशीच स्थिती होती. 'ओर्गन' च्या आकाराचा एक मोठा उंच दगड ह्या व्हॅलीत आहे. त्याचे नावच आहे 'ओर्गन रॉक'.


           'मॉन्युमेंट व्हॅली' सारखीच शिल्पे पुढे बराच काळ रस्त्यावर दिसतात. पण जी भव्यता आणि विविधता ह्यांमध्ये आहे तेवढी इतर ठिकाणी दिसली नाही. त्यापैकी 'मॅक्सिकन हॅट' अशा नावाचे शिल्प खरच आश्वर्य वाटावे असे आहे. एखाद्या माणसाने एक मोठी 'टेक्सास स्टाइल' टोपी (हॅट) घातली आहे, अशी एक आकृती वाळवंटात तयार झाली आहे. माणसाचे डोके असावे असा एक गोलाकार दगड आणि त्यावर मोठा आडवा गोलाकार दगड अशी त्याची रचना आहे. हवामानाचा परिणाम किंवा मोठे वादळ अशा कोणत्याही कारणांमुळे डोक्याच्या आकाराचा दगड पडू शकतो. असे झाले तर ते शिल्प काळाच्या पडद्याआड जाण्यास वेळ लागणार नाही.


                साधारण तासाच्या अंतरावर आणखी काही आकार/शिल्पे आहेत.  त्या भागाला 'व्हॅली ऑफ गॉड्स' असे नाव आहे.  त्या भागात काही आकृत्यांना मंदिरासारखा आकार दिसला. एक आकृती ध्यानस्थ माणसासारखी दिसत होती. विविध आकृत्या बघत असताना वातावरण ढगाळ झाले होते.  आम्ही ब्राईस कॅनियनकडे जायला सुरुवात केली. परतीचा रस्ता मॉन्युमेंट व्हॅलीहूनच होता. तेंव्हा मॉन्युमेंट व्हॅलीचे ओझरते दर्शन घेऊ असा विचार मनात आला.


             दुपारचे चार वाजत होते.  आम्ही मॉन्युमेंट व्हॅलीजवळ येत असतानाच जोराचा वारा वाहू लागला. लाल तांबड्या मातीचे लोट रस्त्यावर दिसू लागले. त्या निर्जन भागात रस्त्यावर एखादीच गाडी होती. हे नक्की कोणते वादळ आहे ते कळण्यास मार्ग नव्हता. वाऱ्याचा जोर एवढा होता की गाडी हालत होती. समोरचे अंधुक दिसत होते त्यामुळे गाडी चालवणे अशक्य होते. अंधारून आले होते. काही मिनिटातच जोराच्या पावसास सुरुवात झाली.


               साधारण पंधरा वीस मिनिटाच्या त्या निसर्गाच्या रौद्र रूपाने आम्ही निःशब्द झालो होतो. पावसामुळे धुळीचे लोट मावळले. त्यामुळे गाडी चालवण्यास सुरुवात केली. काही तासातच आम्ही रणरणते ऊन, जोराचे वादळ, मुसळधार पाऊस असे विविध अनुभव घेतले होते. हवेत छान गारवा आला होता.  ब्राईस कॅनियन जवळ आम्ही एका अमेरिकन कुटुंबाच्या घरी 'ब्रेड ऍन्ड ब्रेकफ़ास्ट' अशा पद्धतीनुसार रहाणार होतो. ते ठिकाण अजून ५ तासाच्या प्रवासावर होते.   काही वेळानंतर छान संधिप्रकाश होता. काही गावात शेती, फळबागा दिसत होत्या. सगळा रस्ताभर दूरवर पर्वतांच्या विविधरंगी रांगा दिसत होत्या. ह्या रस्त्याला सुद्धा' सिनीक हायवे' असे नाव होते.  


           आम्ही ब्राईस कॅनियन जवळच्या गावात पोहोचलो. तोवर रात्रीचे साडे नऊ झाले होते. एका हॉटेलात आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणाची चौकशी केली. आमच्या यजमान कुटुंबाला फोन केला. आमच्या जवळच्या रस्त्याच्या खाणाखुणांची खात्री केली.  आम्ही थकलो होतो, अंधारात रस्त्याची नावे दिसेना. अर्धा तास भटकलो तरी घर सापडेना.  शेवटी तशा प्रकारचे दुसरे 'ब्रेड ऍन्ड ब्रेकफ़ास्ट' चालवणाऱ्या एका अमेरिकन कुटुंबाच्या दारावर टकटक केले. बाहेर चांगलाच गारठा होता. त्या आजोबांनी त्यांची गाडी सुरू केली. आम्हाला त्यांच्या मागे येण्यास सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती. अशा प्रकारची मदत ते एकमेकांना नेहमी करतात अशी माहिती त्यांनी दिली. अखेर त्या अमेरिकन आजोबांच्या मदतीने आम्ही इच्छित स्थळी गेलो. त्यावेळी माणुसकीच्या दर्शनाने आम्ही भारावलो होतो. सत्तरीच्या जवळची काही जोडपी आपल्या घरात अशी पाहुण्यांची सोय करतात. नोकरचाकराविना सगळी कामे करतात. त्यातून आपले उत्पन्न मिळवतात. आजोबा आजींनी सकाळी सात वाजता नाश्ता तयार असेल असे सांगितले. ऊबदार दुलईत आम्ही केंव्हा झोपलो ते कळलेच नाही. सकाळी जाग आली तेंव्हा उन्हाच्या किरणात ब्राईसच्या रांगा चमकत होत्या.
-सोनाली जोशी


यापुढे ब्राईस कॅनियन भेट