खंत

वेदनांशी मीच नाते तोडल्याची खंत आहे.
श्वास माझे आसवांना बोचल्याची खंत आहे.


"अर्जुना तू काय केले! वार बघ आडून झाले.
आज शरशय्येवरी या झोपल्याची खंत आहे".


गावच्या त्या याच बोरी, याच गावी बाभळीही,
आज का मग तेच काटे टोचल्याची खंत आहे?


रे तुम्हाला शिकविणारा मी कवी बदनाम मोठा,
चोरट्यांसहि नाव माझे चोरल्याची खंत आहे.


भावना मी दाबलेल्या वृत्त हे सांभाळताना,
कधि नव्हे तो आज ओळी मोजल्याची खंत आहे.


काय कोणा दोष देऊ? हात माझे बांधलेले.
मालकीचे श्रेय माझ्या खोडल्याची खंत आहे.


"हात घे खाली तुझे हे छंदवेड्या चक्रपाणी,
ठाउकाहे का तुला ते जोडल्याची खंत आहे".