कौतुक करताना घ्यावयाची काळजी

आपण एखाद्याचे कौतुक करायला जातो. पण ते कौतुक होते की हिरमोड?


एखाद्या कवीला आपण म्हणतो 'तुमची शैली बालकवींसारखी आहे'. आपल्या हे लक्षातच येत नाही की असे करताना आपण त्या कवीच्या किंवा लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेवर अन्याय करत आहोत. कारण 'तुमची कविता वाचून अगदी बालकवी आठवले' म्हणजे 'त्यांनी जे आधीच लिहून ठेवले आहे तेच तुम्ही लिहिताय. त्यात नवीन काय?' म्हणजे कवीने एवढी मेहनत घेतली त्याचे काहीच नाही.


बालकवीच काय इथे प्रतिसाद वाचून बघा. कोणी कोणाला बालकवी म्हणत आहे, कोणी आणखी कोणाला कुसुमाग्रज. सुरेश भट काय. ग़ालिब काय. ओ हेन्री काय. आज तर कहरच झाला. नारायण धारप???


आपले काहीतरी चुकत आहे का?


अर्थात एखाद्या रचनेचे जुन्या रचनेशी फारच साम्य असेल तर 'तुमची रचना वाचून भटांच्या ह्या ओळी आठवल्या' वगैरे म्हणणे एक वेळ समजू शकते. पण उठसूट कुसुमाग्रजांच्या ह्या ओळी आहेत. भटांच्या त्या ओळी आहेत. मार्क ट्वेनच्या अमुक आहेत, शकील बदायुनीच्या तमुक आहेत म्हणाल्याचा कवीला किंवा लेखकाला त्रास होत नसेल ना?


पण ह्या गोष्टींचा बाकीच्या वाचकांना नवी माहिती मिळते हा फायदा आहे.


मी माझे स्पष्ट मत मांडले. पण ह्याला दोन्ही बाजू आहेत म्हणून तुमच्यासमोर हा मुद्दा चर्चेला ठेवत आहे.


- स्पष्ट वक्ता


स्पष्ट बोललो क्षमा करा. कोणाला दुखवण्याचा माझा हेतू नाही.