कंठ

प्रीतिच्या नयनबोलीने स्वप्नांना कंठ फुटावा

मुग्धतेत उत्तर दडता स्पर्शांना कंठ फुटावा



गुंफले तुझ्यासाठी मी शब्दांचे हार सुगंधी

माळता तयांना साऱ्या उपमांना कंठ फुटावा



लागला लळा त्यांनाही तव स्पर्शाने फुलण्याचा

कुंतलात सजता तुझिया सुमनांना कंठ फुटावा



का सखे तुझ्या ओठांवर विरहाचे गीत असावे

मी नसेन तेव्हा माझ्या गझलांना कंठ फुटावा



या जगात ऐकू आली डबक्यांची गाज कुणाला

हो मिलिंद सागर तेव्हा कवनांना कंठ फुटावा