गुंता

वागणे विक्षिप्त माझे लोक समजू लागले

हासले छद्मीपणे, माणूस ठरवू लागले



तो पहा वेडा कुणी पाऱ्यास पकडू लागला
वा सुखाचे मृगजळी आभास फसवू लागले



का जुन्या वाटेकडे, ग, पाउलें वळली पुन्हा

का तुझे-माझे नव्याने पाय घसरू लागले



बासरीचे सूर घुमले, राधिका नादावली

तेच दैवी सूर का अनयास खिजवू लागले



आडपडदा फेडण्याचा व्यर्थ का आटापिटा

सावल्यांना चेहऱ्यांचे साज सजवू लागले



सांग गुंता जीवनाचा वाढला इतका कसा

एक उत्तर शेकड्याने प्रश्न प्रसवू लागले



दूर तेथे पैलतीरी वाट पाहे मोक्षदा

ऐलतीरी चार-दोघे ऊर बडवू लागले



फसविले ज्यांनी तुला दे भृंग तू त्यांना दुवा

या जगाचे बेरकी व्यवहार उमजू लागले