एका आईचा मृत्यू

सकाळ होताच राणीच्या बागेत नेहमीची धावपळ चालू झाली.  बंदिस्त प्राणी पाहायला  माणसांच्या रांगा लागल्या. जंगलातले ते निर्बंध जीव त्यांच्या भक्कम लोखंडी पिंजऱ्या आडून बाहेरच्या जगाकडे आसुसलेल्या नजरेने पाहू लागले.


बघ्यांची सगळ्यात जास्त गर्दी ही नेहमी वानरांच्या पिंजऱ्या भोवतीच असे. माणसांना माकड उड्या पाहण्यात नेहमीच मजा येते. खास उभारलेल्या गुळगुळीत खांबांवरून उड्या मारण्याचे वानरांचे प्रयत्न चालू झाले. रानात कोवळ्या फांदी वरून लीलया इकडून तिकडे जाणारी वानर, या खांबांवरून मात्र उड्या मारायला बावचळत होते. त्यांची पिल्लं आईची पाठ गच्च पकडून भिरभिरत्या डोळ्यांनी इकडेतिकडे पाहत असत. त्यांच्यापैकी कोणी खांबांवरून घसरून खाली पडले तर बघ्यांच्या गर्दीत जोरदार हशा पिकत असे व त्याने परत खांबावर चढावे म्हणून त्याच्यावर खड्यांचा वर्षाव होई.


वाघाच्या पिंजऱ्या भोवती ही माणसांचा गराडा होता. पिंजऱ्यातुन रोखलेल्या त्याच्या भेदक नजरेने बघणाऱ्याचा थरकाप होई. ज्याच्या एका आरोळीने जंगल दणाणून जात असे व पाखरू झाडावर बसायला मागत नसे, तो आज दुसऱ्याने टाकलेल्या उष्ट्या अन्नावर जगत होता.


हळूहळू सर्व पिंजऱ्यांमधे प्राण्याची हालचाल सुरू झाली व त्यांच्या आयुष्याला आणखी एका बंदिस्त दिनक्रमाचा टाका पडला.


हत्तीवरून सवारी चालू झाली. हत्तीच्या कानाच्या मागे रक्ताचा एक छोटासा व्रण दिवस-रात्र ठसठसत होता. दिवसभर उन्हातानात चालल्यानंतर त्याचे थकलेले पाय संध्याकाळी जड साखळदंडात बांधले जात असत.  सवारी चालू होताच, तो गजराज आपल्या अनुभवी शहाणपणाने दुसऱ्यांचे पारतंत्र्य दाखवत फेरी मारू लागला. दिवस वर येताच वर्दळ वाढली व पिंजऱ्यात कोंडलेले प्राणी बघत बघत माणसांची रांग निर्धास्त पणे पुढे सरकू लागली.


पिंजऱ्यांच्या रांगेतला शेवटचा पिंजरा हा काळविटांचा होता. निसर्गात अनिर्बध धावणारे असे ते दहा-बारा जण त्या ठीकाणी एकत्र राहतं होते. दोन दिवसांपूर्वी त्यात एका जोडीची भर पडली होती - एक काळवीट आई व तिचं लहान पिलू.  पिलाला आईपासून वेगळं करून शेजारच्या छोट्या पिंजऱ्यात ठेवलं होत व आईला मोठ्या पिंजऱ्यात!


दोन्ही पिंजऱ्यांमधे तारेचं एक अभेद्य कुंपण होत. आई जवळ नसल्यामुळे पिलू नेहमीच भेदरलेलं राहतं असे. त्याला उमगत न्हवतं की त्याची आई समोर दिसत असून त्याच्या जवळ का येत नाही आहे ते. एक-दोनदा ते तारेच्या जवळ गेलं पण माणसांचा आरडाओरडा ऐकून ते इतकं घाबरलं की आता ते एकदम कोपयात चोरून उभं राहू लागलं. त्याच्या समोरच्या खाण्यालाही ते तोंड लावत न्हवतं. समोरच्या पिंजयातून आईचे डोळे ही त्याच्या कडेच लागले होते. तिला पिलाच्या जवळ जायचं होतं, शिकाऱ्यांपासुन सावध करायचं होत, उड्या मारण्यातलं इंगित समजवायचं होत, पण दोघांमध्ये आता तारेच अभेद्य कुंपण आलं होत व मानवी नियमांपुढे निसर्गनियम थिटे पडले होते.


गोगलगायीच्या वेगाने दिवस मावळला व संध्याछाया पसरल्या. माणसांची वर्दळ ही बंद झाली. काळविटांचा जथ्था इकडेतिकडे पसरला. पिलाने थोडीशी हालचाल केली व ते हळूच मधल्या कुंपणाजवळ आले. आई ही तीच्याबाजुच्या कुंपणाला पिलाच्या जवळ आली.  आता त्यांच्या मधील ती अभेद्य भिंतही त्यांना टोचेनाशी झाली व त्या अरुंद जागेत आई पिलाच्या जितकं जवळ सरकता येईल तितकी सरकली. आजकाल ते दोघ संध्याकाळच्या याच वेळेला जवळ येत असत व स्पर्शानेच एकमेकांना जाणून घेत असत. काही वेळातच गडद अंधार होऊन सगळीकडे सामसूम झाली. आई व पिलूही आपआपल्या पिंजऱ्यात डोळे मिटून पडून राहिले.


रात्रीच्या गडद वेळी अचानक आईला जाग आली. ती पटकन छोट्या पिंजऱ्याच्या दिशेने धावली. कसला तरी कोलाहल जवळ येत होता. बघता बघता तीन-चार रानकुत्री पिलाच्या पिंजऱ्याच्या दिशेने गेलेली तिने बघतली. तिच्या काळजाचा ठावच चुकला. ती नैसर्गिक प्रेरणेने पिलाच्या दिशेने धावली पण मधल्या तारेच्या कुंपणाची जोरदार धडक बसून ति तेथेच भोवळली. आता कुत्र्यांनाही ते पिलू दिसू लागले व कसलेल्या शिकाऱ्यांप्रमाणे त्यांनी पिलाच्या पिंजऱ्यात शिरण्यासाठी वाट शोधायला सुरुवात केली. त्यांना एके ठिकाणी काही तारा निघालेल्या दिसल्या तिथून त्यांनी आत जायचा प्रयत्न चालवला. पिलालाही या आरडाओरड्या मुळे जाग आली. त्याला धावत त्याच्या आईकडे जायचं होत पण त्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे ते एवढं घाबरलं की त्याला जागेवरून हालता येईना. आता कुत्र्यांच्या कोलाहलाला न जुमानता बाकीच्या काळविटांनीही मधल्या कुंपणाला धडका द्यायला सुरुवात केली.


इकडे आईही निग्रहाने उठली व मधल्या तारेच्या कुंपणाला जोरात धडका देऊ लागली. तिला कुत्र्यांचे टोकदार सुळे व आपलं पिलू एवढंच डोळ्यासमोर दिसत होतं. तिच्या धडकांचा आवाज सगळीकडे घुमत राहीला पण कुंपणाला काही होईना. पिलूही आपल्या आईची ही धडपड बघत होत व घाबरून अजूनच अंग चोरत होत. कुत्र्यांनाही कळलं होत की आई काही कुंपण तोडून इकडे येऊ शकत नाही. त्यांच्या आत शिरण्याच्या प्रयत्नांना जोर चढला होता.


आईच्या अविरत धडका चालू होत्या. तिची शक्तीही आता क्षीण होत चालली होती, पण तिचं पिलू तिकडे तिची वाट बघत होतं. तिने एक जोरदार धडक दिली. कुंपण थोडं खिळखिळं झाल्या सारखं झालं. ते जाणवून तिने त्वेषाने जोरात कुंपणाला धडक मारली. अजून एक.. अजून एक.. एवढ्यात सैल झालेल्या कुंपणातील एक टोकदार तार खसकन तिच्या कपाळात शिरली व रक्ताचा एक ओहोळ वाहू लागला. त्या जखमेने तिला भोवळल्या सारखं झालं पण तरीही ती प्राणांतिक निग्रहाने कुंपणाला धडका मारत राहिली. प्रत्येक धडकेला ती तार तिच्या कपाळात खोल खोल जात राहिली. जखम आता चांगलीच खोल झाली होती व रक्तही खूप गेलं होत. तिच पिलू तिच्या डोळ्यासमोर होतं पण आता ते तिला अस्पष्ट दिसू लागलं. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिच्या पावलांतला जोर संपला व ती डगमगू लागली. तिने शेवटची प्राणांतिक धडक दिली, तार खोलवर शिरली व तिच्या असहाय पिलासमोर ति धाडकन खाली कोसळली. तिच्या शरीरातला प्रत्येक कण पिलाच्या भेटीसाठी आसुसला व तिच्या निष्प्राण डोळ्यांत तिच्या पिलाची भेदरलेली छबी गोठून राहिली. बाकीच्या काळविटांच्या धडका चालूच होत्या. त्यांचा त्वेष बघून कुत्र्यांनीही थोड्या वेळांतच माघार घेतली.


थोडी शांतता होताच, पिलू हळूच उठले व आईच्या पिंजयापाशी येऊन तिला हुंगू लागले. बराच वेळ झाला तरी त्याची आई उठेना. मग ते तिथेच खाली बसले व आई उठण्याची चिरंतन वाट बघू लागले...


..राहुल..


(काही दिवसांपूर्वी राणीच्या बागेत १०-१२ काळविटांचा पिंजऱ्याच्या दाराला धडका मारुन मृत्यू झाला होता ह्या खऱ्या बातमीवरुन वरचं 'काळं-पांढरं' केल आहे)