एका लग्नाअगोदरची गोष्ट

एका लग्नाअगोदरची गोष्ट!!


संदर्भः- मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट


मी मागेच म्हटल्याप्रमाणे जसजशी हरकामेगिरी संपत येते तसतशी आमच्यामागील आईवडीलांची लग्नाची घाई वाढत जाते. आमचंही असंच झालं. किती वेळा सांगूनसुद्धा दोन्हीकडच्या आईबाबांनी लग्नाचा एवढा तगादा लावला, की शेवटी त्यांच्या म्हणण्याला आम्हाला मान तुकवावी लागली. पण आमच्या दुर्दैवाने आमच्या ज्युनियर बॅचची ऍडमिशन काही दिवस लांबली आणि लग्नासाठी आम्हाला फक्त सहा दिवस रजा मिळाली.एक लग्नाचा स्पेशल ड्रेस/साडी वगळता आमची लग्नखरेदीसुद्धा आईबाबांनीच केली.


आणि हो आणखी एक गोष्ट मी एकटीने केली--"सौंदर्यसाधना!" त्याचीच ही गोष्ट.


लहानपणी म्हणजे बारावीपर्यंत माझे आणि माझ्या बहिणीचे केसही बाबा घरातच कापत असत. त्यामुळे 'ब्युटीपार्लर' म्हणजे काय हे कधी बघितलं नव्हतं . नंतर शिकायला जे. जे. ला आल्यावर 'ब्युटीपार्लर म्हणजे केस कापायची जागा' असंच माझं समीकरण होतं. त्यावेळी जे. जे. तल्या मराठी मुली एकदम साध्या राहायच्या. तुम्ही जर आदितीला (गोवेत्रीकर)आमच्या कॉलेजात असताना बघितलं असतत तर आताची आदिती बघून "हीच ती" यावर तुमचा विश्वास बसला नसता. माझ्या घरच्यांनापण 'पोरगी मुंबैत राहूनही साधी राहते' याचं फार कौतुक होतं. त्यामुळेच लग्नाच्या आठ दिवस आधी आईचा फोन आला तेंव्हा मी चक्रावलेच.


"साते, जरा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन तोंडाचं कायतरी करून ये हो."


"आई, कायतरी काय सांगतेस? मी कधी तिथे गेलेय का? मला वेळतरी कुठाय जायला?" मी.


"ते काही नाही, लग्नाच्या मांडवात मुलगी कशी ऊठून दिसली पाहिजे! माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग--"


"बास,बास तुझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात काय झालं ते ऐकण्यापेक्षा मी ब्युटीपार्लरमध्ये जाणं पसंत करेन" या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नानेच माझ्या आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचा भुंगा सोडला होता.म्हणूनच त्या बिचाऱ्या मैत्रिणीचा आणि तिच्या मुलीचा मला खूप राग यायचा.


चला, आता ब्युटिपार्लर शोधमोहिम.बुद्धिमान मुली (या शब्दरचनेला कृपया मराठीतला "तो" अलंकार समजू नये.)  ब्युटीपार्लरची पायरी चढत नाहीत असा माझा समज होता.त्यात माझ्या मेडिसिनच्या बॅचमध्ये मी एकटीच मुलगी असल्याने विचारायचं कुणाला हा प्रश्न होता. माझ्या एका हुशार-मित्राच्या खूप मैत्रीणी गायनॅकमध्ये होत्या. त्याने माहिती काढली-- आपल्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रसिद्ध पार्लर आहे. भारतीय प्रसाधनसाहित्याच्या बाजारपेठेत मोठं नाव असणाऱ्या कंपनीच्या मालकीचं . सोयीसाठी आपण त्याला " लखुमाई पार्लर" असं म्हणू. माझा हुशार मित्र तर त्या पार्लरचा नंबरही घेऊन आला.


मी फोन लावला. स्वागतिकेने मोठ्या प्रेमाने इंग्रजीत स्वागत केले.


"येस मॅडम, हाऊ कॅन आय हेल्प यू?"


बाई, मला आजची अपॉइंटमेंट दे फक्त.


"मॅडम , व्हॉट वुड यू लाईक टु चेक"


काय काय बरं ते? त्या मैत्रिणीच्या मुलीने दिलेली लिस्ट मी वाचून दाखवली.


"मॅडम वुड यू लाईक टु हॅव एनी स्पेसिफ़िक ऑपरेटर?"


म्हणजे काय? ऑपरेटर म्हणजे काही प्रणाली असते की ब्युटिशियनला ऑपरेटर म्हणतात?


"नो,नो रेग्युलर वन विल डू" मी आपलं दिलं दडपून.


मग त्या बाईने माझं नांव , पत्ता वैगेरे लिहून घेतला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अपॉइंट्मेंट दिली.


दुसऱ्या दिवशी माझ्या म्होरक्याला मस्का लावून आणि माझ्या सहहरकाम्याला माझ्या वॉर्डची  जबाबदारी देऊन मी पोचले लखुमाईत.


दरवाजा ढकलताच एक थंड सुगंधी झुळुक माझ्या अंगावरून गेली. काउंटरवरच्या परीला मी म्हटलं,


" माझी अपॉइंटमेंट आहे दोन वाजताची"


"युवर नेम प्लीज." सगळा इंग्रजीतून कारभार दिसतोय.


" साती, डॉ. साती काळे."


"व्हेन इज शी कमिंग ? इट्स ऑलमोस्ट टु."


बये , तुझ्यासमोर काय भूत उभं आहे काय? मग माझ्या लक्षात आलं , डॉ. म्हटल्यावर काही भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या अपेक्षा असणार बिचारीच्या. हा 'किरकोळ प्रकार'  काही डॉक्टर म्हणून तिच्या पचनी पडला नसणार.


"आय ऍम डॉ. साती"


"ओ. आय ऍम वेरी वेरी सॉरी मॅम, यू लुक सो यंग" तिची टिपीकल व्यावसायिक मखलाशी चालू झाली.


आता पुढचा सगळा भाग मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करते.


तर मग परीने बेल दाबून एका मुख्य ब्युटिशियनला बोलावले.


" मॅम , तुम्ही पहिल्यांदाच येताय का इकडे?"


"मॅम, काही खास प्रसंगासाठी तयारी करताय का?"


"हो. म्हणजे लग्न आहे ना माझं म्हणून." मी.


"ओहो, एकदम योग्य जागी आलात. आम्ही ब्राईडल थेरपीमध्ये स्पेशालीस्ट समजले जातो. आमच्याकडे तीन पॅकेजेस आहेत. एक तीन महिन्यांचं, एक दोन महिन्याचं आणि एक एका महिन्याचं . तुम्हाला कुठलं हवंय?"


"या बावीस तारखेला माझं लग्न आहे?" मी आवंढा गिळत म्हणाले.


"क्का--य?" तिथे असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर "काय यडी बाई आहे" असे भाव उमटले. "मॅम , इटस टू लेट टु डू एनिथिंग"


"मग मी जाऊ?"  हुश्श! सुटले, नको ती कटकट मिटली.


"नो, नो मॅम इटस बेटर लेट दॅन नेव्हर! लेटस थिंक समथिंग."


"मॅम , तुमच्या लग्नाची थीम काय आहे?" परीने विचारले.


माझे आई! थीम-मॅरेज करायला काय तू मला रतनपूरीची राजकन्या समजलीस? मी आपली रत्नागिरीच्या गांवातील साधीसुधी मुलगी.


"नाही नाही . काही विशेष थीम नाही. आपलं नेहमीचंच."


"म्हणजे टिपीकल महाराष्ट्रीयन लग्नं?"


"नाही , कानडी! माझे इन लॉज कानडी आहेत ना!"


"देन देअर इज नो क्वेश्चन ऑफ़ हेअर-स्टायलिंग. कन्नडिगा कीप देअर हेअर इन लाँग प्लेट"


हो का? अरे वा. (मला माहितीच नव्हतं)


ब्युटिशियनने मला एकवार आसेतूहिमाचल न्याहाळून घेतलं मग माझ्या चेहऱ्यावरून एक स्कोप फिरवला. तो एका मॉनिटरला जोडलेला होता. माझ्या चेहऱ्यावरचे खाचखळगे चंद्रावरच्या दऱ्यांप्रमाणे दिसू लागले आणि बारीकशी लव जाड्या काळ्या दोरखंडांप्रमाणे!


मग त्या बायकांची बरीच चर्चा झाली. मध्ये मध्ये मला काही अगम्य प्रश्न विचारणं आणि 'गरीब बिचारी' असे कटाक्ष टाकणं सुरूच होतं.


त्यांचं असं ठरलं की -- मला खालील उपचारांची तातडीची गरज आहे-


१.ब्लीच २. फ़ेशियल ३. आयब्रो ४. पेडिक्युअर ५. मॅनिक्युअर ६. हेअर कंडिशनिंग.


 यातले ४ आणि ५ क्रमांकाचे प्रकार मी प्रथमच ऐकत होते. "त्या मुलीच्या " यादीतही ते नव्हते.


मी सगळ्याला मान तुकवली. किती खर्च येईल ते विचारले. मनातल्या मनात पर्सच्या सगळ्या कप्प्यांत असणाऱ्या पैशांची बेरीज केली. आणि स्वतःला त्यांच्या तावडीत सोपवलं.


                                                         क्रमशः