हर एक बात पह कहते - १

हर एक बात पह कहते हो तुम कि तू कया है
तुमहीं कहो कि यह अनदाज़-ए गुफ़तगू कया है


दरवेळी म्हणतोस, की 'तू रे कोण'? ( तु काय मोठा लागून गेला आहेस अशा अर्थाने). ही का बोलण्याची रीत आहे? ग़ालिबला त्याच्या समकालिनांकडून मिळालेल्या टीकेला ग़ालिबचे यात उत्तर आहे असे वाटते.


न शु`ले में यह करिशमह न बरक़ में यह अदा
कोई बताओ कि वह शोख़-ए तुनद-ख़ू कया है


आगीची (शोला) ज्योत म्हणावे तर, त्यात हा लाडिकपणा, शृंगारिकपणा (करिशमह, करिश्मा?) नाही, वीज म्हणावी तर विजेत ही अदा (?) नाही. आता या (तिच्या) चाळ्यांना (हसणे?) म्हणावे तरी काय?



यह रशक है कि वह होता है हम-सुख़न तुम से
वगरनह ख़ौफ़-ए बद-आमोज़ी-ए `अदू कया है


तो तुझ्याशी बोलतो याचेच तर दुःख आहे, नाहीतर शत्रुने तुझे कान भरले (माझ्या विरुद्ध) तर त्यात वाईट वाटण्या सारखे काय? याचाच अर्थ त्याने तुला माझ्याबद्दल हजार वाईट गोष्टी सांगितल्या तरी चालतील पण तो तुझ्याशी बोलते हे मला पाहवत नाही! इथे हलकेच ग़ालिबने त्याचा प्रतिस्पर्धी प्रियेच्या / शहाच्या कानात जे काय सांगतो आहे त्या कडे दुर्लक्ष करण्याकडे केलेला निर्देश आला लक्षात ;)


चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन
हमारे जेब को अब हाजत-ए रफ़ू कया है


माझा सदरा रक्ताने माखला असून केवळ रक्तानेच तो शरीराला चिकटून राहिला आहे. आता मला मानपट्टी (कॉलर) ठीक करून घेण्याची गरज ती काय?
इथे हे रक्त का वाहत आहे हे सांगण्याचे ग़ालिबने जाणून बुजून टाळले आहे. हे कशामुळे झाले हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडणे ही देखील एक खेळी आहे. या जखमा विरहात त्याने स्वतःच केल्या आहेत की मजनू प्रमाणे इतरांच्या माराने (की टीकाकारांच्या खरपूस समाचाराने?) हे ज्याने त्याने ठरवावे.


जला है जिसम जहां दिल भी जल गया होगा
कुरेदते हो जो अब राख जुसतजू कया है


शरीर जळले आहेच तर मन ही जळले असेलच ना, (मग) पुन्हा पुन्हा राख चाळून पाहण्या मागे तुमचा उद्देश काय आहे? इथे हिंदू प्रमाणे दहन केल्याचा उल्लेख ग़ालिबने का बरे केला असावा? माणूस मेल्यानंतर त्याचे हृदय देखील जळले की नाही हे पाहणे (नसल्यास ते पुन्हा जाळावे या हेतूने!) ही कल्पना ग़ालिबच करून जाणे. इथे टोकाचे शत्रुत्व अपेक्षित असावे. टीकाकारांनी ग़ालिबच्या मागेही त्यावर उगवलेला सूड तर इथे अपेक्षित नसेल? की त्याच्या पश्चात त्याच्या रचनांच्या कीस पाडणाऱ्यांकडे रोख!


(क्रमशः)


शंकांचे व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे स्वागत. या शेरांचा पुरता अर्थ त्याला उमगलाच असेल असा नाही. हे अर्थ त्याने भाषांतरातून लावलेले असल्याने त्रुटी असणे सहज शक्य आहे. १०% अट पाळली जाणे कठीण दिसते, प्रशासकांना सवलतीची विनंती.