प्रिय मित्रा


आधी एक वचन दे. हसू नकोस. माझ्या अस्तित्त्वाचे ध्येय काय हा ‘गहन’ प्रश्न काल मला पुन्हा एकदा पडला.

चाकरी का करतोस? सोडून का देत नाहीस? मग कविता का करतोस? हे का करत नाहीस? ते का करत नाहीस?  एकच वाट का चोंखदळत नाहीस...हो , काहींचं बरं असतं. डोळ्यांपुढे एकच वाट. वाट चुकायचा प्रश्नच नाही.


जाबसाल सुरू असताना मधूनमधून, ‘मला कुणीच कसे समजून घेऊ शकत नाही’ नावाची  पुरातन उदासी डोकावून हसत राहते. ‘मी कुणी थोर विचारवंत आहे, कवी आहे, वेगळा आहे’ ह्या माझ्या आविर्भावाचे तिला हसू येतं. बहुधा तुझ्यासारखेच.


 मग मी तिकडे दुर्लक्ष केल्यासारखे करून बिछान्यात पडल्यापडल्या तासन्तास पंख्यावरील जळमटांकडे बघत राहतो. भूताला भेटतो.


 त्यावेळी माझे चुकलेच… मी किती naive होतो, भोळा होतो… मी किती महापातकं केली… तिला मी एकदा विचारायला हवे होते… पण मी लहान असताना कसा ‘श्याम’ होतो. मग असा अचानक केव्हा आणि का बदललो? मी असा का घडलो?


नुसते अरण्यरूदन.


अजूनही काही बिघडलेलं नाही. सारं काही मनासारखं होऊ शकतं.


विचारभग्न मन तिथून तडक शेतात धावतं. दुरून आजी मला हाका मारते.


 अरे गाडी निघून जाईल. असा लपून का बसलास? घरी जायचे नाही काय? पुढच्या सुट्टीत चांगला १५ दिवसांसाठी ये हो!


 पुन्हा निरागस व्हावं. शेतातल्या रिठ्याच्या झाडाखाली बसून मनसोक्त  रडावं. मन निरभ्र व्हावं, भल्याबुऱ्या सर्व विचारांचा निचरा व्हावा. कोरी पाटी घेऊन पुन्हा मुळाक्षरांपासून आयुष्य नव्याने गिरवायला सुरवात करावी. 


 बैरागी