माझी पहिली डेट....

नुकतंच वयात आलेलं ते चाफ्याचं झाड पुलाच्या अगदी सुरुवातीलाच आहे.कमरेत वाकल्याने कमानीप्रमाणे पुलाच्या दिशेने झुकलेलं.रस्त्यावर सांडलेली त्याची काही फुलं. 'आजकाल कुणी इकडे फिरकतच नाही' असं म्हणत जरासा खट्टू असलेला तो पूल.पुलाखाली इथून कधी पाणी वाहत होतं त्याच्या खूणा.पुलाच्या पलिकडे पेटलेली गुलमोहराच्या झाडाची रांग.रंग उडालेले पुलाचे कठडे.त्या कठड्यांवरती एकत्र जमलेल्या साळुंक्या....आणि एकाच वेळी दोन जीवांच्या आयुष्यात कायमची अविस्मरणीय ठरणार असलेली उन्हाळ्यातली एक शांत,गार संध्याकाळ.
आणि ती मला दुरूनच दिसते आहे! उन्हाळ्यातल्या typical संध्याकाळी पावसाची वर्दी देत जे तांबूस पिवळसर ढग आकाशात फिरत असतात ना - त्यांच्याकडे एकटक पाहत ती उभी आहे.मुद्दाम थोडा उशीर करायचा असं आधीच ठरवलं असल्याने मी अगदी वेळेत पोहोचलो आहे.चाफ्याच्या झाडाखाली गाडी लावून तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आहे...संथपणे. तिच्या लक्षात आलं असेल का आपण आलोय ते...तिने आपल्याकडे बघितल्यावर सर्वात पहिल्यांदा काय करायचं...लांब असताना पाहिलं तर हात दाखवायचा...उजवा की डावा....अरेच्चा, डाव्या बाजूला चंद्र काय छान दिसतोय...चला सुरुवात करायला विषय तर सापडला! एक एक पाऊल आणि मनात असंख्य विचार.हे मधलं अंतर इतकं जास्त का वाटतंय...प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकयला हवंय...एक एक पाऊल....आणि धस्स्स्स!!! तिने माझ्याकडे बघितलेलं मी पाहिलं.तिच्यासाठी आणलेली फुलं डाव्या हाताने पाठीशी लपवित उजवा हात उंचावून मी हसलो, हेही मी पाहिलं.अचानक माझी चालण्याची पद्धत बदलली आहे हेसुद्धा माझ्या लक्षात आलं.त्या संध्याकाळी, त्या पुलावर, त्या माझ्या पहिल्या dating साठी तिच्याकडे चालत जाताना मला अक्षरश: हवेत तरंगल्यासारखं वाटत नसेल तरच नवल. भर स्वयंवरात शिवधनुष्य उचलायला निघालेल्या प्रभू रामचंद्रांपासून ते वर्गात फळा पुसत असलेल्या गीताकडे मार्दवाचे बाण फेकत पुढे पुढे आणखी पुढे येणा-या मोहन भार्गव पर्यंतचे सगळे नायक माझ्यामध्ये संचारून मला तिच्यापर्यंत चालवत नेत होते. मुगल-ए-आज़म मधल्या त्या रात्री दिलीप कुमार मधुबालाकडे ज्या मधाळ नजरेने पाहत असतो तसं काहीसं तिच्याकडे पाहत मी तिला "Hi" म्हणालो! आणि ती मात्र, जणु काही मी तिथे आलो नसतो तरी तिने ती संध्याकाळ मजेत घालवली असती अशा थाटात मला "Re:Hi" म्हणाली.तिच्यासाठी आणलेल्या फुलांवरची चमकी उडून जावी त्याप्रमाणे माझ्यामध्ये मघाशी संचारलेले सगळे filmi नायक एकदम गळून पडले....आणि तिला मी तिच्यासाठी आणलेली फुलं देताच ती म्हणाली, 'आज चंद्र किती छान दिसतोय'....!! मी नुसता हसलो आणि एकदा चंद्राकडे बघितलं.एकदा तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा चंद्राकडे बघितलं. अशावेळे चंद्र खरंच खूप सुंदर दिसतो.त्यावेळी तर जणु काही शुक्राची आसक्त आकर्षणशक्ती आणि मंगळाची आरक्त लाली चंद्रामध्ये उतरली होती! मी तिच्याकडे पाहिलं आणि तिने झर्रकन आपली मान दुसरीकडे वळवली. येताना आधीच मनाशी जुळवून ठेवलेली वाक्यं कुठल्या कुठे पसार झाली होती.जणु काही त्या शांत वातावरणात तसल्या शब्दांना काही स्थानच नव्हते.मग तिनेच बोलायला सुरुवात केली.मी नुसता ऐकत राहिलो.ऐकता ऐकता तिच्या प्रत्येक हालचाली मनात साठवून ठेवत राहिलो.बोलताना होणारी तिच्या ओठांची मुडप,तिच्या डोळ्यांतल्या बाहुल्यांची चपळाई, वा-याच्या कुरळ्या लहरींसोबत भुरभुरणारे तिचे केस...'अरे, फक्त मीच बोलतीये'असं अधनंमधनं म्हणत तिनेच चालू ठेवलेलं बोलणं त्या संध्याकाळी त्या शांत वातावरणात ऐकताना मला पहिल्यांदा समजलं की, गाण्या-वाजवणाशिवायही कधी कधी संगीत निर्माण होतं...एक असं संगीत की, जे तुम्हाला तुमच्या सर्व कक्षा ओलांडून दूर कुठेतरी नेतं.उंच उंच...
माझं शांत राहणं आता तिला ऐकू गेलं असावं. तीही शांतपणे आकाशतल्या चांदणीकडे बघू लागली.ती शांत झाली म्हणजे आता आपल्याला एखादा छान विषय काढून काहीतरी बोलावं लागणार म्हणून मी विचार करू लागलो.मी काही सुरू करणार इतक्यात तिच म्हणाली, 'ये तुला महितेय, आकाशात एकच चांदणी उगवलेली असताना मनापासून मागितलेली कुठलीही विश पुर्ण होते...'
आणि असं म्हणून ही पृथ्वीवरली तारका त्या आकाशस्थ चांदणीकडे डोळे मिटून काहीतरी मागू लागली.गडद निळ्या आकाशात चांदण्यांमधे चंद्र जसा दिमाखात उभा होता, त्याप्रमाणे तिच्याकडे पाहत मी नुसता हसलो. डोळे बंद असूनही तिला ते समजलं आणि माझ्या त्या हसण्यात कुठेही चेष्टेचा सूर नाहीये हेही तिला समजलं. म्हणून मग तीही हसली आणि म्हणाली, 'रात्र झाली,आता निघायला हवं!' ...इतक्या लवकर??मागच्याच तर क्षणी आपण बोलत होतो..त्याच्या मागच्याच क्षणी मी चालत तिच्यापर्यंत आलो होतो..त्याच्या मागच्याच तर क्षणी मी त्या चाफ्याच्या झाडाखाली गाडी लावली होती. मला काही सुचेना. पण तरी तिला अजून थांबण्याचा आग्रह मी केला नाही. मीही म्हणालो, 'हो, निघायला हवं!' आणि मी असं म्हटल्यावर ती चमकली!!
आणि आम्ही दोघे माझ्या गाडीच्या दिशेने चालू लागलो. आपली पावलं उलट्या दिशेने पडताहेत असं मला वाटत होतं....
ऐन बहरात आलेलं ते चाफ्याचं झाड,ऐन प्रहरात आलेली ती रात्र,राखेच्या
ढिगा-यात पडलेल्या निखा-यांप्रमाणे त्या रात्रीच्या अंधारात गुडूप झालेली गुलमोहराच्या झाडांची रांग,हळूहळू डोकं वर काढत लुकलुकणा-या चांदण्या आणि त्या चिमुकल्या दिसणा-या असंख्य स्वयंप्रकाशित तारकांवर अधिपत्य गाजविणारा तो रुबाबदार उपग्रह,दिवस आणि रात्र यांना जोडून तिथून हळूच सटकलेली ती संध्याकाळ आणि ह्या प्रचंड सृष्टिचित्रात दोन जीवांच्या ठिपक्यांना एकत्र जोडणारा,रंग उडालेल्या कठड्यांचा तो पूल.........हे सारे आम्हा दोघांना एका शांत सुरात विनवत होते -

अभी ना जाओ छोडकर....के दिल अभी भरा नही....!!!