माझे मूषकप्रेम

संपूर्ण जगात जिथे जिथे मनुष्यवस्ती आहे तिथे तिथे आढळणारा दुसरा सस्तन प्राणी म्हणजे उंदीर. माणसाच्या खालोखाल याचाच नंबर लागतो आणि तरीही, मला उंदीर आवडतो असं म्हणणारी फार कमी माणसं भेटतील. उंदीर म्हणजे नासाडी करणारा, मिळेल ती गोष्ट कुरतडून ठेवणारा, इथून तिथून धावाधाव करुन नाकी नऊ आणणारा आणि वेळप्रसंगी चावा घेण्यास मागे पुढे न पहाणारा महाउपद्व्यापी प्राणी.


कल्पना करा की, आपण अंधारात थिएटर मधे बसून छानसा सिनेमा पाहण्यात गुंग आहोत. चित्रपटात काहीतरी महत्त्वाचा प्रसंग घडतोय, जसा की नायक कसले तरी रहस्य जाणून घेण्याच्या बेतात आहे. आपण आतुरतेने पुढे काय होणार त्याची वाट पहात आहोत आणि तेवढयातच आपल्या पायाशी अचानक काहीतरी  हुळहुळत. "अय्य्या ईईई!!!!" किंचाळून जितक्या बायका पाय वर घेऊन भेदरट नजरेने इकडे तिकडे बघतील तेवढेच पुरुषही यात सामिल होतात असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तशी मी ही सरसकट स्वत:ला उंदीर प्रेमी म्हणणार नाही आणि तरीही तीन-चार उंदीर मला फार आवडतात. अशा तीन उंदरांबद्दल सांगायला फार आवडेल.


उंदीर पहिला : गणेश वाहन


गणपती हे मराठी माणसाचे आराध्य दैवत. मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक. अशा तुंदिल तनु देवाला आरुढ होण्यास एक लहानसा उंदीर पुरेसा आहे ही कल्पनाच फार मजेशीर आहे.


गणपतीच्या उंदीरा बाबत अनेक आख्यायिका आहेत. काहींच्या मते उंदीर हे बुद्धीमत्ता आणि चातुर्याचे लक्षण. त्यामुळे गणपती त्यावर आरुढ होणे क्रमप्राप्त. काहींच्या मते हा उंदीर अहंकाराचे तर कधी षडरिपूंचे लक्षण म्हणून गणेश त्यावर स्वार. अहंकारावर स्वार होऊन गणेश त्याला आपल्या काबूत ठेवतो. त्याचा गुलाम न बनता अधिपती बनतो. जे काही असेल ते. मला हा उंदीर आवडतो कारण कुठल्याही देवळात प्रत्यक्ष भगवंता समोर बसून आपल्या शरीरा एवढया आकाराचा मोदक गट्टम करण्यास ही मूर्ती तयार. याला पाहिल की आईच्या हातच्या लुसलुशीत उकडीच्या मोदकांची आठवण आवर्जून होते.


उंदीर दुसरा : संगणकाचा उंदीर


ज्या व्यक्तींनी यापूर्वी DOS (किंवा तत्सम) संगणक प्रणालीवर काम केल आहे आणि त्यानंतर याला हाताळायचा योग आला, त्या सर्वांना या उंदीराची महती नक्कीच ठाऊक आहे. जगात असा एकच प्रकारचा उंदीर असावा जो सहज आपल्या हाती लागतो आणि मनात येईल तसा फिरवता येतो. याच्या शेपटीवरुन व संगणकाच्या पडद्यावर लिलयेने पळण्याच्या याच्या कलेने "स्टॅनफोर्ड रिसर्च इंस्टिटयूट" ने या यंत्राला "माऊस" असे नाव दिल्याचे वाचनात आले आहे. हल्ली त्याच्या शेपटीला चाट मिळाला आहे तो भाग वेगळा. नानाविध प्रकारांत (मेकॅनिकल, ऑप्टिकल, लेझर इ.), नानाविध आकारांत (ट्रॅकबॉल, टचपॅड, फूटमाऊस) आणि नानाविध रंगांत उपलब्ध असणारा हा उंदीर आपल्या सर्वांचाच लाडका असावा.


 


उंदीर तिसरा : अर्थातच मिकी माऊस.


७८ वर्षांच्या या चिरतरुण उंदरावर माझ अतोनात प्रेम आहे. १८ नोव्हेम्बर १९२८ हा त्याचा जन्म दिवस. १९२८ ते ४६ सालांपर्यंत स्वत: वॉल्ट डिस्नींचा आवाज लाभण्याचे भाग्य या पठठ्याच्या नशिबात होते. इतक सालस, सद्गुणी आणि मनमिळाऊ पात्र कार्टून्सच्या जगात शोधून सापडायच नाही. अजूनही याला टीव्हीवर पहायचा योग आला तर मी पापणी न लवता मनसोक्त मजा घेते.


नुकताच आम्हाला मिकीची याची देही याची डोळा भेट घ्यायचा योग आला. त्याला मारलेली घटट मिठी जन्मभर आठवत राहिल. त्याचे ते मोठे मोठे गोलाकार कान, पाणीदार डोळे, चेहयावरचे स्मितहास्य मनात घर करुन राहिले आहे.


मनातली गोष्ट सांगायची झाली तर "लहानपण देगा देवा" अशी देवाची आळवणी न करताही त्या दिवशी लहानपण उपभोगायला मिळाले.


तुम्हा सर्वांसाठी माझ्या लाडक्या मिकीचे एक अद्यावत छायाचित्र जोडते आहे.


 


 


DSC00529 मिकी माऊस


विशेष टीप : या तिन्ही उंदीरांसह त्यांच्या अधिपतींवर, अनुक्रमे गणेश, संगणक आणि वॉल्ट डिस्नी यांच्यावर ही माझे अतोनात प्रेम आहे.