मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - भाग ३

हे लेखन वाचण्याचे नियम आतापर्यंत सर्वांना माहिती झालेले आहेतच. ( यात यापूर्वी लिहीलेले दोन भाग 'मनोगतीं'नी वाचलेले आहेत हे सुप्त गृहितक दडले आहे हे 'चाणाक्ष' मनोगतींच्या लक्षात येईलच!). त्यामुळे नमन न लांबवता वृत्तांताचा हा पुढचा भागः

मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - भाग ३


संमेलनाचा तिसरा दिवस उजाडला.  तरीही अजून संमेलनाची नक्की रुपरेखा काय हा घोळ संपलेला नव्हता. 

'पहिले दोन दिवस वाया गेले, आता तिसऱ्या दिवशी तरी संमेलनाच्या पहिल्या सत्रात 'प्रार्थना, व्यायाम, नामस्मरण व लाठीचे काही हात' याचा समावेश असावा' असा प्रस्ताव विनायक व नरेंद्र गोळे यांनी मांडला. 

व्यायामाचे नाव ऐकताच विसोबा, सन्जोप राव व अनु यांना एकसमयावच्छेदेकरुन एक महत्वाचे काम आठवले, व "आलोच" असे म्हणून ते तिघेही त्यांच्या शरीराला शक्य तितक्या लगबगीने सभागृहाच्या दाराकडे निघाले. तेवढ्यात "हे मनोगती संमेलन आहे, रा‌. स्व. संघाची शाखा नाही" असे कुणीतरी ठणकावून सांगितल्याने विनायक व नरेंद्रने हा प्रस्ताव मागे घेतला. ('संमेलन महत्वाचे, कामे काय चालूच रहातील..' विसबा, सन्जोप व अनु मागे वळाले.) तथापि आपण हा प्रस्ताव मांडला होता यची संमेलनाच्या अहवालात नोंद झाली पाहिजे, असा हट्ट विनायक व नरेंद्र गोळे यांनी धरला.

"नुसत्या नोंदी करुन काय होते? लोकांनी ते वाचले पाहिजे ना! 'हे शब्द असे लिहा' चेच बघ. खि..खि...खि.." कोण कुणाला हे सांगायला नकोच!

त्यावेळी संमेलनात नक्की काय काय घडते आहे याची कुणीही नोंद ठेवत नाही, हे लोकांच्या लक्षात आले. 

विसोबांनी पुढे सरसावले "मी या संमेलनाच्या नोंदी मोडीत करतो. मला मोडी येतं ना!"  यावर सर्वसाक्षीने "तात्या, तुझं मराठी अक्षरच मोडीसारखं आहे, मग तुझं मोडी कुणाला कळणार?" असं म्हणून विसोबांना खाली बसवले. शेवटी सुलक्षणा टंकलेखनात प्रविण असल्याने हे काम तिच्याकडे सोपवण्यात आले.

संमलनाचे कार्यक्रम सुरळीत पार पडावे म्हणून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली.  राधिका, जयन्ता ५२, मी आगाऊ, मेघदूत हे त्या समितीचे सदस्य होते.  एकंदर मनोगतींची संख्या किती हे कळल्याशिवाय कोणतेच कार्यक्रम घेता येणार नाहीत, त्यामुळे ती संख्या मोजून पहावी असा प्रस्ताव जयन्ताने मांडला. 


"हा सगळा शुद्ध गाढवपणा आहे" स्वच्छ आवाजात राधिका म्हणाली. समन्वय समितीचे सदस्य तिच्याकडे चपापून बघू लागले. "अहो, मी माझ्या कटपयादि सूत्रांच्या भाषेत बोलत होते." राधिका गांगरुन म्हणाली. " चार हजार पाचशे बावन्न, असं मला म्हणायच होतं...."


मेघदूताने राधिकेला बाजूला घेतले. "चार लोकांना समजेल अशा भाषेत बोलावं बाळ! सोपं सांगता येत असताना ते क्लिष्ट करुन सांगायला तू काय स्वतःला भोमेकाका समजतेस की दिगम्भा? उद्या मला नऊ पस्तीस ची लोकल पकडायची आहे, याचं भाषांतर जर, 'उद्या मला कमरेखाली  लाथ घालायची आहे', असं जर कुणी केलं, तर ते कुणाला कळेल?"


"मित्रांनो," दरम्यान जयन्ता व्यासपीठावर पोचला होता. "येत्या दोन दिवसात सादर होणाऱ्या कार्यक्रमांची ढोबळ रुपरेखा आणि कार्यक्रमाच्या अटी व नियम असे आहेत." सभागृहात थोडी शांतता पसरली.
" या संमेलनात आपण काही विचारप्रवर्तक परिसंवाद, काही चर्चा, काही मुलाखती, काही एकपात्री कार्यक्रम असे भरगच्च ( "म्हणजे योगिता बालीसारखे..." परत एकदा "खि..खि..खि..") आयोजन केले आहे." जयन्ता सांगत होता "त्यातही 'मनोगतीं ची सोय म्हणून आयत्या वेळी एखाद्या विषयावरील चर्चेलाही प्रवेश देण्याचे आम्ही ठरवले आहे. तर उपस्थित मनोगतींनी प्रस्तावित विषय व त्यातील 'माझा सहभाग' सांगावा..."

"गीता....फक्त गीता... गीता माझी लाडकी" डोळे मिटून नरेंद्र गोळे म्हणाला.

'भारतात शेअर मध्ये गुंतवणूक सध्या कशी फायद्याची आहे' या विषयावर खाजगी आवाजात आपल्या आसपासच्या चार लोकांना सल्ला देणारी गीता आगाशे गोरीमोरी झाली.  "भगवद्गीता म्हणायचं आहे का तुम्हाला नरेंद्र?"  तिने चढ्या आवाजात विचारले.
"अर्थात!" नरेंद्रच्या लक्षात हा काहीही घोळ आला नव्हता. "मग तशी दुरुस्ती कर सुलक्षणा...." गीता म्हणाली.

"थांबाथंबाआम्हलाबोलायचहेआमालाअयत्यावेळ्चाएकविशयमान्डाय्चाअहे" बापु सोनावणे आणि पन्कज्जोशी धावत व्यासपीठावर आले. बापुने जयन्ताच्या हातातून माईक जवळ जवळ हिसकावूनच घेतला.
"ज्या अर्थी सदर इसम प्रस्तुत प्रस्तावाच्या अगर चर्चेच्या अगर वादाच्या अगर यापैकी एक अगर अनेक विषयांच्या...." त्यांने सुरुवात केली
"तू थांब रे बाप्या.." पन्कज्जोशी म्हणाला. "एकतर काय लिहितो ते स्वतःचे स्वतःला कळत नाही... नमस्कार मंडळी! असं मधेच घुसल्याबद्दल माफ करा.  पण मला आणि बापुला एका महत्वाच्या विषयावर येथे चर्चा सुरु करावयाची आहे.  चर्चेचा विषय आणि प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडतो.  चर्चेचा विषय आहे,
'अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा अर्थात पावसाळ्यात कांदाभजी'..."  पन्कज्जोशी बोलू लागला.
'मनोगतीं'च्या ' काय...काय... तुला ऐकू आलं का.. अशा आपापसात खाणाखुणा सुरु झाल्या.
इकडे पन्कज्जोशी बोलत होता..


"भारतातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मुंबई-पुणे महामार्गाची दुर्दशा पाहता हस्त नक्षत्रात सुध्दा अपेक्षेइतका पाऊस होणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.  एकीकडे दिल्लीत टोमॅटो वीस रु. किलो आणि दुसरीकडे सानिया मिर्झा विम्बल्डनच्या पहिल्या फेरीतच बाद याचा अर्थ धुण्याच्या पावडरीतल्या फॉस्फेटमुळेच हेमामालिनीच्या हाताची त्वचा सोलवटून निघाली असा होतो. शरद पवारांनी साखर कारखान्यासाठी  विशेष पॅकेज जाहीर करताना याचा विचार केला नाही तर 'कौन बनेगा करोडपती' चे उरलेले भाग आता कोण बघणार? आणि अशाने कोकणातील आंब्यावरचा मावा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होणार कसा? एकीकडे गर्भवती महिलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी जागातिक बँकेकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घ्यायचे आणि दुसरीकडे बाकी अकरावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया २८ जुलै पर्यंत लांबवायची हा दुटप्पीपणा मनोगतच्या प्रशासकांना शोभतो का?...."  पन्कज्जोशी बोलायचा थांबला.

केवळ भयाण या शब्दातच वर्णन करता येईल अशी गंभीर शांतता सभागृहात पसरली. लोकलज्जेस्तव टाळ्या वाजवण्याचे भानही कोणाला नव्हते.


'पोचॅक्क....' सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावरुन खालच्या बागेत भरभक्कम पिंक टाकल्याचा आवाज आला. 
"इचीभनं...." तमाखूने कमावलेल्या आवाजात खेडूत म्हणाला.  " काय बी कळ्ळं न्हाई रावं...."
खेडूताची ही प्रतिक्रिया 'प्रातिनिधीक' होती, असे चहापानाच्या सुट्टीत एकलव्य मेघदूताला सांगत होता.


(तरीही अपूर्ण)