गणित आयुष्याचे चुकतच गेले

एकेक अनुभव पुसत पुसत,
नवीन अनुभव उमटत गेले,
निवडली सूत्रे नेहमीच विपरीत,
गणित आयुष्याचे चुकतच गेले..


उघडली जेव्हा जीवनपत्रिका,
पाहता गणित सोपे वाटले..
परि बेसावध मी केल्या चुका,
गणित आयुष्याचे चुकतच गेले..


जीवनपत्रिकेत या एकच गणित,
एकदा चुकले कि वाया गेले.
वेड्या मज मनास हे अज्ञात,
गणित आयुष्याचे चुकतच गेले..


पडेल एका अंकाने कितीसा फरक,
म्हणून अंदाजे आकडे लिहीतच गेले,
चुकवला नेहमी आकडा फक्त एक,
गणित आयुष्याचे चुकतच गेले..


घे परत विधात्या तुझी जीवनपत्रिका,
चुका सुधारुन हात हे थकून गेले,
करायच्या नाहीत मज त्याच त्या चुका,
गणित आयुष्याचे चुकतच गेले..