रहाटगाडे

येथे कोणाचे तैसे कोणाविण काही अडते
हो, घुटमळते क्षण काही, पण पुढेच पाउल पडते


झालाच सराव मलाही तू नसताना जगण्याचा
मन कणाकणाने मरते, पण त्याने कुठे बिघडते?


आतातर आठवणीही भासतात परक्या साऱ्या
आल्याच कधी सामोऱ्या, तर पाहुन मी गडबडते


दिस उजाडती, मावळती.. जणु रहाटगाडे फिरते
चालते ह्रदय, सवयीने श्वासांची लड उलगडते


डोळ्यांत कोरड्या माझ्या डोकावुन रात्र परतता
चुरगळते चादर थोडी, अन उशी जराशी रडते..