दहशतवादाच्या प्रतिकाराची तयारी.

११ जुलैच्या मुंबईंतील भीषण बॉम्बस्फोटांनंतर आता काही दिवस दहशतवादाच्या आघाडीवर सामसूम असल्याचे भासेल. याचा अर्थ दहशतवाद्यांच्या कारवाया पूर्ण बंद असतील असे नाही तर त्या प्रकारच्या लहानसहान घटना होतच राहणार आहेत. फक्त त्या सर्वांचे लक्ष वेधून घेण्याइतक्या मोठ्या नसतील.


कारखान्यांमधून होणाऱ्या अपघातांविषयी एक अनुभवसिद्ध नियम आहे. लहानलहान अपघातांची काही ठराविक संख्या झाली की एक मोठा अपघात होतो. यांत गूढ असे काही नाही. लहान अपघातांकडे लहान म्हणून दुर्लक्ष होते. दुर्लक्ष करण्याची सवय झाली की नुसती लहान अपघातांची संख्याच वाढते असे नाही तर जरा मोठे अपघातही लहानच वाटू लागतात व सतर्कता अधिकाधिक शिथिल होत जाते. अपघातांच्या वाढत्या संख्येबरोबर वाढत जाणारी ही शिथिलता मोठ्या अपघाताला वाट करून देते. दहशतवादी कारवायांनाही हेच लागू आहे. दहशतवाद्यांच्या लहानलहान कारवायांकडे दुर्लक्ष करीत गेले की त्यांचा साहसीपणा वाढतो व एखाद्या मोठ्या उत्पाताची तयारी होऊ शकते. म्हणून लहान दिसणाऱ्या दहशतवादी कारवायांकडेही दुर्लक्ष केले जाऊ नये.


हा लहान प्रमाणावर होणारा दहशतवाद रोखण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेवर टाकणे शहाणपणाचे नाही. साधारणपणे लहानसहान कारवाया या समाजांत सहजासहजी वावरू शकणाऱ्या भुरट्या हस्तकांमार्फत अमलांत आणल्या जातात. सर्वसामान्य नागरिक थोडेसे जागरुक राहिले तर त्या कारवायांचा वेळीच सुगावा लागून त्यांना पायबंद बसू शकतो. एकदा भुरट्यांचा बंदोबस्त झाला की त्यांची मदत मोठ्या दहशतवाद्यांना मिळणार नाही व त्यांचे काम अधिकाधिक कठीण होत जाईल. या सगळ्याचा निष्कर्ष असा की  सर्वसामान्य नागरिकांची जागरूकता मोठी दहशतवादी कारवाई रोखू शकते. आता काहीशी सामसूम आहे म्हणून नागरिकांनी गाफील राहू नये, तर दहशतवादाविरुद्ध सर्व समाजांत सतर्कता कशी निर्माण होईल व तो समाजाचा स्थायीभाव कसा होईल यादृष्टीने पावले उचलायला हवीत. त्यासाठी आपल्या आचारविचारांमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे. देशाचे सर्वभौमत्व जे दहशतवादामुळे धोक्यांत येऊ शकते ते जपण्याची व त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही केवळ सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आहे असे समजू नये.  विमानांचे अपहरण व भरवस्तींत बॉम्बस्फोट घडवून आणणे यासारख्या कृत्यांनी सर्वसामान्य नागरिकांवरही युद्धसदृश परिस्थिति लादली जाऊ शकते हे लक्षांत घेऊन प्रत्येक नागरिकाने दहशतवाद निर्मूलनासाठी "मी काय करू शकतो?" याचा विचार करावा व त्यासाठी लागणारे शारीरिक, मानसिक व बौद्धिक प्रशिक्षण मिळवावे. सरकारनेच हे प्रशिक्षण द्यावे अशी अपेक्षा ठेवू नये.


आपली सदसद्विवेकबुद्धि व न्यायबुद्धि जागृत ठेवून व्यक्तिगत पातळीवरही दहशतवादाचा सामना करण्याची तयारी ठेवावी. पक्का निश्चय असणारी एक व्यक्तिही एखाद्या संघटनेला भारी पडू शकते या ऐतिहासिक सत्यावर विश्वास ठेवावा. रिकाम्या बुद्धिवाद्यांच्या टीकेकडे व हेटाळणीकडे लक्ष देऊ नये. दहशतवाद्यांना "आपल्याला प्रत्येक नागरिकाकडून व प्रत्येक पावलागणिक प्रतिकार होणार आहे" असा संदेश मिळायला हवा.    


आपल्याला काय वाटते?