माझ्या सासूबाई

सासू सुनेच अगदी झक्कास जमतय असं उदाहरण संपूर्ण जगात विरळाच असेल. ज्या कोणी 'हो! आम्ही अगदी आई लेकीच' अस सांगतात त्या धादांत खोटं बोलतात अशी आपण ग्यारंटी देतो. आणि उदाहरण म्हणून पाहा की इंग्लंडच्या महाराणी पासून ते आपल्या इंदिरा गांधींपर्यंत कुणाचीच यातून सुटका झालेली नाही. सासू या शब्दाचा "सारख्या सूचना" असा कुणीतरी अर्थ लावल्याचे वाचले आहे त्यावर सून म्हणजे "सूचना नकोत". तर अशा माझ्या सासूबाईंचे आणि माझे काही किस्से ---


लग्न झाल्यावर लगेचच आमच्या सासूबाईंनी इथून तिथून कानपिचक्या द्यायला सुरुवात केली.


"नवीनच आली आहेस हो घरात. कानामागून आली आणि तिखट झाली हे चालवून नाही घेणार हं मी."


"अहो सासूबाई आता मी घरातलीच. जे काही शिकणार ते तुमच्याकडूनच शिकणार."


असचं एकदा घरात एकाशी काहीतरी फुटकळ गोष्टीवरून वादावादी झाली, त्याबरोबर सासूबाईंनी आपलं तोंड उघडलं, "काय हे? शोभतं का बाईच्या जातीला? बायकांनी कसं शालीन असावं. इतरांच्या कृतीला फक्त 'छान', 'आवडलं' असं म्हणावं. उगीचच पुढे पुढे करू नये. घरातल्या पुरुषांनाच काय पण बायकांनाही ते मनापासून आवडत नाही हो."


"अहो सासूबाई, माझ्याही काही आवडी निवडी, मतं आहेत की नाही. ती मी मांडायची नाहीत का?"

"मांड गं! पण छान, आवडलं हं! एवढंच म्हण. आपण बायकांनी लोकांची मनं जिंकून घ्यायची असतात. लोकांना उणी दुणी दाखवणाऱ्या बायका आवडत नाहीत हो."


चला, सासूबाईंचं म्हणणं अगदीच खोटं पाडता येत नाही पण आडात नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार? शेवटी मी सून.


मग कधीतरी त्यांना चिडवायला "चार दिवस सासूचे" असं ताला सुरात रेकायच की त्याही "क्यों की सास भी कभी बहु थी," म्हणून माझं तोंड आवळायच्या. तर कधी लेकी बोले सुने लागे चा प्रयोग करायच्या.


आता अमेरिकेत बसूनही माझ्या वाट्याला सासुरवास आहेच. इतक्या दूरूनही सासू करडी नजर ठेवून असते.


"काय गं? काम करतेस न घरात की अशीच इथे तिथे उनाडक्या करत असतेस," एकदा सासूबाईंनी विचारलं.


"करते की हो माझ्या सोयीने,"


"थोडंसं समाजकार्यही करत जा. मी किनई आमच्या मंडळातील बायकांना सुनांच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसू नये यावर भाषण देणार आहे या रविवारी."


"हो का? अमेरिकेत ना सहसा सास्वा सुनांच्या व्यक्तिगत जीवनात नाक खुपसत नाहीत," माझा टोमणा हाणण्याचा प्रयत्न.


"झालं का तुझं अमेरिका पुराण सुरू. तू अमेरिकेत आणि आम्ही भारतात म्हणून उगीचच गमजा मारतेस होय? तुम्हाला काय सगळं आयत मिळत, काम धंदे नाहीत. इथे तिथे टवाळक्या करण्यात वेळ जात असणार. थोडंसं विधायक कार्य कर त्यापेक्षा. काही वाईट सांगत्ये का मी?" सासूबाई डाफरल्या.


"नाही हो! वाईट कसं तुम्ही माझ्या सासू ना; तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार, शेवटी मी तुमचीच सून, तुमच्या मुलाबरोबर 'मनोगत' बरोबर जन्म काढायचं मनापासून ठरवलंय ना."


----
वरील लिखाण घाईत झाले आहे. ते माझ्या प. पू. सासूबाईंबद्दल नसून, मनोगतावर मला भेटलेल्या अनेक सास्वांविषयी आहे. रूपक या अर्थी घ्यावे. एखाद्याला त्यात विनोद दिसल्यास (शक्यता कमी आहे) थोडासा विषादही दिसावा. प्रत्येक वाक्याची फोड करून सांगण्यास लेखिका असमर्थ असल्याने एक "टाइम पास" (याला चांगला मराठी शब्द नाही आणी नसावा) एवढेच महत्त्व द्यावे. सर्वांनी हलके घ्या.


फुकटच्या सूचनांना वैतागलेली
प्रियाली