वाटसरू

इथे न कोणी सखा-सोयरा
मिळे न येथे कुणा आसरा
बंद येथली सारी दारें
काय इथे थांबून करू
दुज्या गावचा ठावठिकाणा पुसत चालला वाटसरू

कुणी न उरले तुझे सोबती
घरचे निंदक सांड मागुती
अस्तनीतले सर्व निखारें
कटू क्षणांना चल विसरू
दुज्या गावचा ठावठिकाणा पुसत चालला वाटसरू

रुतले काटें , रक्त सांडले
विस्कटले जे डाव मांडले
दीप मनाचे विझले सारे
स्वप्नराख हातात धरू
दुज्या गावचा ठावठिकाणा पुसत चालला वाटसरू

भूलोकीची सोड आस तू
खुज्या मनांची सोड कास तू
पोखरलेली सर्व भुयारें
भराव कुठवर त्यात भरू
दुज्या गावचा ठावठिकाणा पुसत चालला वाटसरू

मिळेल जेथे शीतल छाया
पांथस्था विश्राम कराया
मंद वाहती जेथे वारें
शोध गड्या तो आम्रतरू
दुज्या गावचा ठावठिकाणा पुसत चालला वाटसरू