'दहावा' ग्रह

'जावयाला' दहावा ग्रह म्हटले जाते. पण आता मात्र जावयाचे हे दहावे स्थान डळमळीत झाले आहे. सध्या तरी तो एकदम तेराव्या स्थानावर फेकला जाण्याची शक्यता आहे. आणि पुढील काळात त्याचे स्थान आणखीही खाली घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


निमित्त आहे गेल्या एक-दोन दिवसातील नवीन ग्रहांबद्दलच्या चर्चांचे. प्लुटो चा जुळा भाऊ शेरॉन, प्लुटो च्या पलीकडचा आणि सूर्यापासून सर्वात दूर असणारा झेना/झीना आणि मंगळ आणि शुक्राजवळचा सेरेस यांना 'ग्रह'पद देण्याविषयी  आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे.


पण आता हे तीन नवे ग्रह आपल्यावर कसा प्रभाव टाकणार आहेत ते पाहूया.


सर्वप्रथम जावयाची हेटाळणी करताना समयसूचकता बाळगणे भाग पडेल.


खरोखरच जर या ३ जणांना 'ग्रह' अशी मान्यता मिळाली तर सर्व पाठ्यपुस्तके बदलणे भाग पडेल. मग ती चालू वर्षी बदलायची की पुढील वर्षांपासून यावर एक परिचर्चा केली जाईल. आणि जसे प्रिंस साठी ५० तास आपण वेड्या-खोक्यासमोर बसून राहिलो तसे या चर्चेच्या निर्णयासाठी बसून राहू. पुस्तके बदलण्याचे ठरल्यास पाठ्यपुस्तक व्यापाऱ्यांचे धंदे अकाळी तेजीत चालतील. 'नवीन तीन ग्रहांची' नावे लिहा हा प्रश्न हमखास प्रश्नांच्या यादीत मानाचे स्थान पटकावेल.


सेरेस त्यातल्या त्यात पृथ्वीजवळ असल्याने सेरेसवरही जीवसृष्टी आहे की काय हे पाहण्यासाठी यान पाठविले जाईल.


मला या सगळ्या गोष्टीत कुतूहल वाटले ते कुंडली, ज्योतिष इत्यादींबाबत. कालच एका बातमीपत्रात पाहिले असता एका तथाकथित ज्योतिषाचार्यांनी या तीन नवीन ग्रहांचा मानवावर काय परिणाम होईल हे ही विस्तृतपणे सांगितले. अचानकपणे उपटलेल्या ग्रहांचे परिणाम या ज्योतिषांनी इतक्या लवकर कसे सांगितले हे कोडेच आहे. बर विशेष कौतुक वाटते ते याचे की त्यातल्या एकाचा कँसर होण्याशी संबंध जोडला आहे. तसेच कोणा एकाचा दहशतवादाही जोडला आहे म्हणे.


असो. आता तीन नव्या ग्रहांना साहजिकच कुंडली मधे स्थान देणे गरजेचे पडेल. आणि असे केल्यास आत्तापर्यंतच्या सगळ्या पत्रिका चुकीच्या ठरतील. म्हणजेच आपल्या सर्वांना आपापल्या पत्रिका सुधारून घ्याव्या लागतील. तसेच ज्यांचे (म्हणजे जवळपास सर्वांचेच) भविष्याचे अंदाज चुकत आले ते सर्व चुकांचे खापर या तीन नवीन ग्रहांवर फोडून मोकळे होतील. आता नवग्रह मंदिरात/ पूजेत / स्तोत्रात आणखी तीन ग्रहांना (निदान दोन ग्रहांना तरी) स्थान देणे भाग पडेल.  या नव्या ग्रहांना नवे खडे, वृक्ष, रंग इ. इ. द्यावे लागतील. आता कदाचित राशींचे स्वामीपदही विभागून द्यावे लागेल किंवा नवीन राशी तरी तयार कराव्या लागतील. तीन नव्या ग्रहांसाठी वेगवेगळ्या पुजा/शांती/होम उदयास येतील.


त्यातून सेरेस तर मंगळाप्रमाणे आहे म्हणतात. चला म्हणजे आता पत्रिका पाहताना मंगळाबरोबर सेरेसही आहे का ते पहावे लागेल. तीन ग्रहांवर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत लग्नेच्छुंवर टांगती तलवार आहे. कारण सेरेस पहावा तरी पंचाईत आणि न पहावा तरी !


राजकीय वर्तुळातही आता या तीन ग्रहांचे पाय धरणे गरजेचे पडेल. कोणास ठाऊक त्यांची उपासना केल्याने राजकीय समीकरणेही बदलतील. कोण जाणे  पंतप्रधान स्वतःचे निर्णय स्वतः घेतील आणि बिहार मधे शिक्षण, शेती ,उद्योग, सामाजिक बौद्धिक/मानसिक पातळी या सर्वच क्षेत्रात भरघोस सुधारणा होऊन देशाचे आर्थिक केंद्र होण्याकडे वाटचाल करेल.  


पत्रिकांबरोबर पंचांगही बदलणे भाग पडेल.


बाकी काही म्हणा यामुळे छपाई, दुकाने, ज्योतिषी, सोनार, पौरोहित्य इत्यादी क्षेत्रातील लोकांचे धंदे मात्र नेहमी तेजीत असूनही आणखी तेजीत चालतील. वरील सर्वजण दर वर्षी असेच नवेनवे ग्रह सापडावेत यासाठी या तिघांसाठी निश्चितच महापूजा घालतील. कदाचित नवीन व्रत-वैकल्ये/उपास-तापासही जन्माला येतील.


आता या तीन ग्रहांचा आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, सांपत्तिक, राजकीय परिस्थितीत एव्हढे बदल होत असूनही तुम्ही म्हणता की ज्योतिष-बितिष सब झूठ आहे आणि ग्रहांचा आपल्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही ??