चमत्कार...

नमस्कार मंडळी,


देव नाही असे म्हणणाऱ्यांसाठी खास मी हे लिखाणाचे काम हाती घेत आहे. आशा करतो की माझ्या लिखाणामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत. आणि दुखावल्या गेल्याच तर आगाऊ माफी मागतो...


तर... सांगण्याचा मुद्दा असा की, काल दुपारी मी माझ्या संगणकासमोर बसलो होतो. टेबलावर समोर कॉफीचा कप होता. माझे काम चालू असताना मध्येच माझा भ्रमणध्वनी वाजला म्हणून मी उठलो. बोलून झाल्यावर परत येऊन बघतो तो काय, श्री गणेशाच्या वाहनाने, म्हणजेच साक्षात उंदराने - माझ्या संगणकाचा माऊस की हो - माझ्या कप मधली सगळी कॉफी पिऊन संपवली होती.


मंडळी, तुम्ही काहीही म्हणा, पण मला पूर्ण विश्वास आहे की साक्षात श्री गणेशाची माझ्यावर कृपा झाली आहे म्हणूनच हे घडलं... म्हटलं आपल्याला स्वतःला अनुभव आला आहे तर मनोगतावरील आपल्या मित्र-मैत्रिणींना ही तो सांगावा, म्हणून हा लेखन प्रपंच...!!