हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत - मराठी चिजा

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील बहुतेक चिजा ह्या व्रज, बिहारी, हिंदी भाषेतील असतात. मात्र मराठीमध्येही अशा काही चिजा आहेत. त्यांचे संकलन करण्यासाठी हा प्रस्ताव. मला दोन मराठी चिजा माहीत आहेत त्या अशा -


१. राग भूपाली


निशिदिनी भज रामनाम
तेचि तव सौख्यधाम
पतिता मधुनाम परम
सुखवी फार प्रेमे ॥


सीताराम विराम
गमत हृदयी पूर्णकाम
गाऊनी प्रभूसी
शरण जाई भावे ॥।


२. राग - काफी


उपवनी फुलती जाई-जुई
विमल रूप नयना सुख देई ॥


फुलाफुलांवरी कळ्यांवरी
पतंग मोदे मारी भरारी
सेवूनी मकरंदा जाई ॥।


मात्र एकूणच मराठीमधल्या चिजा कमी असाव्यात असे वाटते. ह्या अनुषंगाने आणखी काही प्रश्न -


मराठीमध्ये लिहिलेल्या चिजा एवढ्या कमी का?


नवनवीन चिजा लिहिल्या जातात तेव्हा मराठी कवी-कवयित्री मराठीत चिजा लिहिण्याला प्राधान्य देतात का? नसतील तर का नाही?


जशा संत कबीराच्या रचना शास्त्रीय संगीतामध्ये चिजेच्या स्वरूपात गायल्या जातात तशा उपलब्ध मराठी कवितांपैकी काही कविता चिजा म्हणून वापरल्या गेल्या आहेत का? मराठी जाणणारे संगीत कलाकार मराठी कविता वा कवितेच्या काही ओळी एखाद्या विशिष्ट रागामध्ये बांधून चिजा म्हणून वापरतात का? असल्यास कृपया उदाहरणे द्या. नसल्यास, का नाही?