हुतात्मा भगतसिंग - एक संपन्न व्यक्तिमत्व

२८ सप्टेंबर, २००६ - आज हुतात्मा भगतसिंग यांच्या जन्मदिनास ९९ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या जन्मशताब्दीवर्षाचा हा पहिला दिवस! त्या निमित्ताने या महात्म्याला ही आदरांजली.


इतिहास हा जेते लिहितात. अर्थातच त्यांना अनुकूल असा. साहजिकच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मा भगतसिंगांचे चरित्र अवघ्या तीन परिच्छेदात संपते. पहिला परिच्छेद लाहोर येथील सॊंडर्स वधाचा, दुसरा संसदेतील बॊंबस्फोटाचा आणि तिसरा व अखेरचा त्यांच्या हसतमुखाने व ताठ मानेने फाशी जाण्याचा. मात्र प्रत्यक्षात या असामान्य व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. या असामान्य पुरुषाचे जीवनसार माझ्यासारख्या सुमार बुद्धीच्या माणसाने काय सांगावे? पण तरीही केवळ त्यांच्यावरील भक्तीखातर त्यांचे काही पैलू दाखविण्याचा हा प्रयत्न.


एक लेखक, एक पत्रकार, एक काव्यरसिक, एक प्रतिभावंत, एक समाजवेत्ता, एक क्रांतिकारक, एक परखड तत्त्वज्ञानी, एक सहिष्णू विचारवंत, एक द्रष्टा, एक निग्रही देशभक्त अशी अनेक रुपे या महायोग्याचे जीवनचरित्र वाचताना दिसून येतात. अत्यंत ज्वालाग्रही पण अत्यंत शांत. अत्यंत निग्रही पण तितकेच हळवे. अत्यंत तडफदार पण उतावळे नाहीत. अत्यंत कणखर पण तरीही विनम्र. स्वातंत्र्य देवतेला सर्वस्वाचा नैवेद्य दाखवूनही निरीश्वरवादी राहिलेले. पुनर्जन्मावर विश्वास नसलेले पण तरीही पुन्हा याच देशात जन्माला येण्यास उत्सुक असलेले.जगात सर्वात घोर पाप असेल तर ते म्हणजे गुलामी व दारिद्र्य असे ठामपणे सांगत देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतः:ला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.


भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते.सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक.ऑस्कर वाइल्ड्चे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांचे चरित्र, वॉल्टेर, रुसो,व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते.त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नामावली फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वा. सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी स्वा. सावरकर लिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनीन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.


भगतसिंग हे एक पत्रकार होते व लेखकही होते तसेच उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लालाजींच्या मृत्यू नंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप','दुर्दशा','सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली होती.


९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.


खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र:


"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.


हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून हि उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला:-


१) बॆंका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.


२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॊंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.


३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे सहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलिस वा इतर आधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टात खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.


४) आगगाड्या उडविणे


५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे


६) वैध बंदिवासातून दंडितांची व इतरांची सुटका करणे


७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व


८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे."


सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.


बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये, समजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग - नरक, जन्म -पुनर्जन्म,८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धांत होता. जगात जर सर्वात भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वात मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादीले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.


हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. आज हुतात्मा भगतसिंगांच्या ९९व्या जयंती च्या दिवशी मला त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या ओळी सार्थ वाटतात:


'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,


 सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'