वाचनालय

महाजालावरचे वाचनालय हा लेख मी मनोगतावर वाचला. त्यानंतर लेखकाने 'अनामिका' नावाचे संकेतस्थळ सुरु केले होते. पण गेले काही दिवस ते बंद आहे. पण त्या निमित्ताने माझ्या मनात एक विचार आला. 'अनामिका' हे सुध्दा मराठी साहीत्य सुलभपणे उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आले होते. त्यात इतरांकडे असलेली ई-बुक्स सगळ्यांना सार्वजनिक रीत्या उपलब्ध करून द्यायचा हेतू होता. तसेच मान्यवरांचे साहित्य या प्रकारात (ई बुक) आणायचा हेतू होता. पण माझा विचार थोडा वेगळा आहे.
पुस्तकांची पाने टाईप करून ती ई बुक मध्ये परिवर्तीत करणे जिकीरीचे काम आहे. करायला तर हवेच पण त्याला वेळही लागणार. तेव्हा हे काम करत असतानाच जर उपलब्ध असलेले नविन साहीत्य एकत्र केले तर ?

म्हणजे सध्या मनोगतावर नामवंत नसले तरी चांगले लेखक , कवि लिखाण करत असतात. बरेच जण आपले लेख लेखमालेच्या रुपात मांडतात. ( उदा. - वसंताच लग्न , हॄदयविकार आणि व्यायाम, रामरक्षा, ज्ञानेश्वरी इ.) ते लिखाण जर एकत्र केले तर ?

वानगीदाखल, मी स्वतः 'घरचा गणपती' हा लेख ३ भागात लिहिला. जर एखाद्याला हा लेख आवडला आणि संग्रही ठेवायची इच्छा आहे तर त्याला काय उपाय ? तर त्याकरता अश्या लेखमाला एकत्रित करुन, त्याचे ई बुक बनवून, महाजालात एका ठिकाणी एकत्रित करून ठेवाव्या असा माझा मानस आहे. जेणेकरून कोणालाही ते आपल्या संगणकावर उतरवून घेऊन वाचता येतील. इतरांना पाठवता येतील.

यात मला मनोगतींचा नैतिक पाठींबा हवा आहे. कारण कॉपिराईट कायद्याचा प्रश्न असल्याने कोणाच्याही परवानगी शिवाय त्याचे/तिचे साहीत्य मी याकरता वापरू इच्छित नाही. मी तयार केलेल्या ई बुक मध्ये लेखाच्या नावाबरोबरच लेखकाचे नाव आणि लेख जिथून घेतला ते ठीकाण नमुद केले जाईल. माझे नाव फ़क्त एक संकलक म्हणून येईल. अशी पुस्तके तयार झाल्यावर मनॊगतावर त्याची सुची दुव्यासकट मांडली जाईल. ज्याला हवे तो ते आपल्या संगणकावर उतरवून घेऊ शकेल. अश्या रितीने सध्याच्या अस्तित्वातल्या लेखांना तरी पुनरुःजीवन मिळेल. अर्थात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे केवळ अशक्य आहे.

उदाहरण म्हणून मी माझाच 'घरचा गणपती' ह्या लेखांचे संकलन   केले आहे ते
पाहावे.