देऊळींचा देव मेला...

             मी देव मानत नाही. पण देवळाशी मात्र माझे सख्य आहे. जिथे वेगवेगळ्या वारी,वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या माणसांची ऊठबस होते अश्या ह्या घरात देवाचे वेगळे अस्तित्व कुठून दाखवणार? अजूनही मला एक प्रश्न नेहमी सतावतो; लोक स्वत्व विसरून देवाला शोधायला देवळात जातात असा माझा समज आहे. मी मात्र स्वतःचा शोध घ्यायला देवळात जातो. अजूनही लोक देवाला शोधत आहेत, अजूनही मी मला शोधतो आहे.
      एकेका देवाला एकेक वार नेमून देणार्या मनुष्यप्राण्याची गंमत वाटते.  प्रत्येक देवाचे देऊळ वेगळे,थाट वेगळा, आरत्या वेगळ्या, स्तवने वेगळी पण प्रेरणा मात्र एकच. मला तरी प्रत्येक देऊळ वेगवेगळे असले तरी देवळातले वातावरण मात्र एकच वाटते.देवळाच्या वाटेवर चालताना पायांना एक अजाणती गती असते. देवळातून परतणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तर ही गती अधीकच वाढते. दुरून दिसणारा कळस, पताका जसजसे जवळ येतात तसतसे आपण माहेरी किंवा अगदी घरीच पोहोचत आहोत असे वाटायला लागते. देवळात जाताना घरातून निघताना चपला घालूच नयेत असे माझे मत आहे. जी व्यक्ती देवाला नमस्कार करताना देवळाबाहेर काढून ठेवलेल्या आपल्या चपला चोरीस तर जाणार नाहीत ना असा विचार करत असते त्या व्यक्तीला ना स्वत:चा शोध लागतो ना देवाचा. चपला हे प्रतीकात्मक उदाहरण झालं. देवाचा शोध घ्यायला देवाकरता काही घेऊन जायची गरज लागू नये अन् स्वतःचा शोध घेण्यासाठी  स्वतःचं असं काही स्वतःजवळ ठेवावं लागू नये.
          कुठल्यातरी कोंदट, काळोख्या,भयाण कोनाड्याची तुलना कोणी गाभाऱ्याशी करू शकत नाही. प्रत्यक्षात दोन्ही अस्तित्त्वाच्या बाबतीत समानच. पण एक उपेक्षित,दुर्लक्षित तर दुसरा पवित्र. केवळ तिथे देव आहे ह्या कल्पनेने माणसाचे विचार इतके बदलतात हे अनुभवताना आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही.
         तीर्थ हे खरे अमृत आहे. क्षुधाशांतीशिवाय मनःशांती देणारे यासारखे दुसरे पेय नाही. साधे पाणी, सरबत, पन्हे, चहा, दूध,मद्य असे कोणतेही पेय असो, ते पिताना डोळे बंद करावेसे वाटतीलच असे नाही,  तळहात खोलगट करून त्याखाली दुसरा हात धरला जाणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ पळीभर तीर्थ 'प्राशन' करून मिळणारे समाधान आणि तृप्ती बाकी कोणतेही पेय 'प्यायल्याने' मिळणार नाही. आजतागायत तीर्थात काय असते,चव कशी असते असे विचार मनात आले नाहीत. ते हातावर पडताचा त्याची चव जीभेवर आपोआप येते. तीर्थाबरोबर मिळणारा प्रसाद- त्यात साखर फुटाणे, चणे शेंगदाणे, गूळ खोबरे, रेवड्या, बत्तासे, लाडू,  द्रोणातला शिरा, खिचडी एक ना अनेक प्रकार. गंमत म्हणजे देवाला तीर्थ, नैवेद्य नुसते दाखवले तरी पोहोचते. आम्हाला मात्र ते भक्षण करणे भाग असते! 
          जशी गोष्ट तीर्थाची,प्रसादाची तशीच गंधाची. गाभाऱ्यात दही,दूध ह्यांच्या अभिषेकामुळे पसरलेला आंबुस तरीही सुखावणारा गंध, उदबत्तीच्या शेंड्यावरून लवलवणारा गंध, फुलांचा संमिश्र सुवास, हळद,कुंकू, बुक्का, अबीर यांचा नाकाजवळ हुळहुळणारा वास, कापूरआरतीनंतर ताजातवाना करणारा जळकट वास, पणत्यांतील तेलाचा मंदसा वास ... प्रत्येक देवळात हे सारे गंध घुटमळत असतात. अन त्यांच्यासोबत आपणही घुटमळत राहतो.
         देवळात जाऊन आरत्या, भजनं, कीर्तनं याला कंटाळणारा माणूस विरळाच. जीला गाण्याचे अंग नसेल अगदी अशी व्यक्तीही टाळ्या किंवा टाळ-झांज घेऊन ठेका देताना दिसेल ती देवळात. इतक्या लोकांचे इतके वेगळे आवाज, वेगवेगळ्या पट्ट्या पण अंत:प्रेरणा मात्र एकच. सगळ्यांचे आवाज, त्यासोबत टाळ-झांजा, मृदंग, पखवाज, पेटी, टाळ्या आणि सोबत  शंखध्वनी, घंटानाद! ब्रम्हनाद म्हणावा तर तो हा.
          हे सगळे आज जसे आठवले तसे लिहिले ते बालकवींच्या एका कवितेमुळे. ते कवितेत म्हणतात 'देऊळींचा देव मेला विश्वी विश्वरूप झाला' ! अर्थात देव चराचरात आहे , त्याचा शोध घ्यायला देवळात जायलाच हवे असे नाही. देवळांच्या सोबतीने आता ट्रस्ट/देवस्थानं झाली आहेत, जिर्णोद्धारानंतर नामकरण व्हायला लागले आहे, गल्लीबोळांत नाक्यानाक्यावर दगडाला देवपण यायला लागले आहे, प्रवचनासाठी मोठमोठ्या गाड्यांतून बाबा आणि ताफ्याताफ्याने भक्तजन येऊ घातले आहेत अश्या परिस्थितीत देवाला देवळात रहाणं कठीण झालं आहे.  पण तरीही देवाने हार मानलेली नाही. तीर्थप्रसाद, गंधवार्ता, नादब्रम्ह आणि चपला यांना न विसरता देव आताही देवळात येतो तो तुमच्या माझ्या रुपानं. अद्वैताकडचा प्रवास देवळापासूनच चालू व्हावा आणि अखेर तो देवळाच्या पायरीशी संपावा अशी अपेक्षा धरून देव आजही प्रत्येक देवळाच्या पायऱ्या चढतो आहे....

-अ