माझे अमेरीकेतील शेजारी

माझे अमेरीकेतील शेजारी
"कसे आहात? सगळी खुशाली आहे ना? "असे म्हणून मुलाशी बास्केटबॉल खेळत असतांना विल्यम आमच्याशी हस्तांदोलन करतो. उंचपुरा, धिप्पाड, हसतमुख विल्यम, त्याची हसरी आणि कधीही पाहिले तरी टवटवीत दिसणारी पत्नी स्टेसी व त्यांची बागडणारी ३ मुले , हे आहेत आमचे जवळचे शेजारी. जाता येता बोलणे व हवापाण्याच्या चर्चेव्यतिरिक्त आम्ही आजवर कोणत्याही अमेरीकन कुटुंबाच्या जास्त जवळ गेलो नव्हतो.  त्यामुळे नवीन गावात, भारतीय नसणार्‍या वसाहतीत आपला कसा निभाव लागणार याची काळजी वाटत होती. पण आमच्या हया शेजार्‍यांमुळे आम्हाला जरा धीर आला. 
          थोड्याच दिवसात निरीक्षणाने मला कळलेसकाळी ६-६.३० च्या सुमारास विल्यम कामाला जातो. त्याला निरोप दिला की स्टेसीचा विविध कार्यक्रमांनी भरलेला दिवस सुरु होतो. थोड्याच दिवसात निरीक्षणाने मला कळले की लिसा(१३वर्षे), थॉमस (११वर्षे) व ३ वर्षाच्या लहानग्या मॅगीला पटापट तयार करून, ती न्याहारी झाल्यावर त्यांना घेवून स्टेसी आपल्या मोठ्या गाडीतून शालेत सोडते. त्यानंतर कधी सायकल चालवणे, टेनिस खेळणे तर कधी शाळेत नृत्य शिकवणे याकरता तिचा वेळ आखलेला असतो. मुलीशी खेळत मी जर बाहेर अंगणात असेन तर जाता येता स्टेसी माझ्याकडे पाहून हसते आणि तिचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे सांगत गाडीतून दिसेनाशी होते. घरकाम, थोडे बागकाम झाले की  दुपारी १२.३० च्या सुमारास ती छोट्या मुलीला शाळेतून घरी आणते आणि बाहेरून येता येता पाकीट्बंद जेवण उचलून घेवून येते. मनात विचार यायचा  काय कमी आहे त्याच्या आयुष्यात? सगळे कसे सुंदर, निटनेटके आणि हेवा वाटावे असे.
          एका संध्याकाळी दारावरची घंटा वाजल्याने या वेळी कोण आले? आणि तेही काही कल्पना न देता? या विचाराने साशंक मनाने मी दरवाजा उघडला. दारात शेजारच्या स्टेसीला पाहून तर मी चकीतच झाले. जरा संकोचून तिने "मला थोडे लसूण हवे आहे", हे सांगितल्यावर माझा माझ्या कांनांवर विश्वासच बसला नाही. शेजार्‍याने न विचारता येणेअशी जवळीक भारतातच मोठया शहरात पहायला मिळत नाही मग अमेरीकेचे तर दूरच राहीले. त्यांचे सारे आयुष्यच शिष्टाचार पाळण्यात जाते. असो.
          मग हळूहळू मुलींच्या खेळण्याच्या निमित्त्याने आम्ही दोही एकमेकींना विचारून घरी भेटू लागलो. माझ्या चटकन लक्षात आले की स्टेसीचे घर निटनेटके आणि सजवलेले असते. दिवाणखाण्यात मोठाली लक्ष वेधणारी चित्रे आहेत, जगभरातून गोळा केलेलया शोभिवंत वस्तुंने भरलेली कपाटे आहेत. स्टेसी घराविषयी सजावटीचे व बागकामाचे सर्व निर्णय घेते व नवर्‍याच्या मदतीने ते प्रत्यक्षात आणते. त्यातूनच त्यांचे वाद होतात हे सांगणे नलगे. तिला खरच दिवसभर घर आवरत खपाव लागत. एक एखादे वेळी जर जरा पसारा असेल तर स्टेसी योग्य कारण देवून लगेच आवरायला उशीर कसा झाला ते मला सांगते.
            अमेरीकन मुले त्याच्या स्वत:च्या खोलीत झोपतात आणि लगानपणी तरी खूप वळणात असतात. व्यक्तीस्वातंत्र्याचे वारे आणि मित्रमंडळाचा सहवास यावर मग सारे काही बदलायला लागते. आता स्टेसीच्या लहान मुलांचेच पहा ना. स्टेसीची मुलगी लिसा ही आपल्या दोन्ही भावंडांना नीट सांभाळते, आई करत असलेले कष्ट जाणून घेते आणि त्याबद्दल आदर दाखवते. लिसा सुंदर चित्रे काढते,घरांच्या विविध प्रतिकृती करते.  तिला अभ्यासात लागणारी मदत स्टेसीच करते. मुलगा थॉमस हा आपला वेळ अभ्यासाव्यतिरिक्त बास्केट्बॉल, फ़ूट्बॉल खेळण्यात आणि इतर अमेरीकेन मुलांप्रमाणे"व्हिडीओ गेम" ख़ेळण्यात घालवतो. दोन्ही मुली बाहुल्या आणि त्यांचे सगळे खेळ खेळतात. स्टेसी घरकाम करत असतांना कधीकधी विल्यम मुलांबरोबर खेळतो. जमेल तेव्हा भांडी विसळून भांडी घुण्याच्या यंत्रात टाकणे हे त्याचे नित्याच काम असते. अमेरीकेत आलयावर स्वावलंबनाचे आणि कष्टांचे अधिक महत्त्व कळते. भारतीय लोक भारतीय आणि अमेरीकन अशा दोन्ही समाजात वावरत असतात त्यामुळे त्यांची धावपळ पाहाण्यासारखी असते.
            स्टेसीकडून कळले की त्याना दुसर्‍या राज्यात असतांना भारतीय मित्र होते.  त्यामुळे भारतीय चालीरिती,पदार्थ याची बरीच माहिती आहे. भारतीय शेजारी आहेत याचा तिला आनंद झाला होता. थॉमसला बटाट्याचे पराठे आवडतात हे ही तिने मला सांगितले. आणि शक्य झाले तेव्हा माझ्याकडून कृती लिहून करूनही पाहिले. माझ्या मुलीला आंग्ल भाषेचे एवढेसेही ज्ञान नसल्याने तिची कळकळीची मराठीतील बडबड, स्टेसीला व तिच्या छोट्या मुलीला मॅगीला अनुवाद करून सांगण्यात माझा बराच वेळ जायचा.  जास्त ओळख झाल्यावर भाषा समजत नसतांही खाणाखुणा आणि अनुकरणाने दोघी खेळायला लागल्या. स्टेसीच्या बोलण्यातून कळले की विल्यम व स्टेसीचे कुटुंबीय  अमेरीकेतल्या दक्षिण भागात वाढलेल्या काही मूळच्या फ़्रेंच रहिवास्यांपैकी आहेत. जुने रितीरिवाज पाळणार्‍या कुटंबांमध्ये त्याचे नाव असावे असे मला वाटते. त्याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक सणसमारंभ करतांनाच्या पद्धतीतून आणि दैनंदिन राहणीमानातून मला येत गेला. त्यांचे दोन्हीकडील जवळचे नातलग गावात आणि नजीकच्या छोट्या खेडयात आहेत. त्यामुळे मुलांना दोन्हीकडील आजीआजोबा भेटायला येतात वा सुटीच्या दिवशी घरी घेवून जातात. येथील आजीबाईंकडे पण बटव्यात औषधे आणि युक्त्या असतात बर का! हे मला स्टेसी कडूनच कळले. समारंभाला जायचे म्ह्टले की मुलांना आजीआजोबांकडे ठेवून विल्यम व स्टेसी झकपक कपडे घालून जातात. त्याकरता ३-४ दिवस आधीपासुन स्टेसीची तयारी व रंगीत तालीम सुरु असते.
         " दिसत तस नसत" म्हणतात ना. वरवर हसतमुख आणि टवटवीत स्टेसी किती काळजी करते हे तिच्या बोलण्यातून कळले. स्टेसी दोन मुलांच्या जन्मानंतर नोकरी सोडून घरी राहिली होती. नृत्य शिकवणे आणि मसाज थेयरपी ह्यातून ती आपला वरखर्च चालवत होती. तिच्या बोलण्यातून आई आणि आपले विश्व असणारी स्वावलंबी स्री ह्यातले द्वंव दिसत होते. मुले मोठी झाली की आपणही पुन्हा पूर्णवेळ नोकरी करु अशी तिला आशा वाटत होती. तिचा अहम जोपासणारा तिला काही उद्योग करता येईल का? असे तिच्या मनात सतत विचार असायचे. "अग मग तू कविता कर, लेख लिही, लहान मुलांसाठी लिही"असे सांगोतल्यावर उजळ्लेला स्टेसीचा चेहरा अजुनही माझ्या डोळ्यासमोर आहे. इतर काही ओळखीच्या कुटुंबातील अमेरीकन नवर्‍यांप्रमाणे काही कारणाने विल्यम आपल्याला घटस्फ़ोट तर देणार नाही ना?ही भिती तिला मनातल्या मनात कुरतडत होती. अशा वेळी विल्यम हुशार आहे, त्याला माझ्यासारखी प्रेमळ बायको आणि मुलांची आई मिळणार नाही म्हणून तो असे वागणार नाही. असा दिलासा ती स्वत:ला देत असते. अगदी भारतातल्या पारंपारीक सुनेप्रमाणे आपली सासू काय म्हणेल याची काळजी दिसते. स्टेसी माझ्याकडून घरी करायच्या चपात्या शिकल्यावर तिच्या सासूला झालेला आनंद आणि तिने केलेले कौतुक ऐकून मला गंमत वाटली होती.
              हळूहळू आमचे जाणे येणे वाढले आणि मग मला वसाहतीतील कोण काय काय करतो, कोणाचे घर कसे असते, मुले काय करतात याची माहीती मिळू लागली अर्थातच माझ्या खास जासूसाकडून! मला जाणवले की राजकारण, धर्म ,सिनेमा, खेळ या सर्व विषयांवर अमेरीकन माणसे मनमोकळेपणाने बोलतात. एवढेच काय जास्त ओळख झाली की अगदी खास बायकांच्या ज्या गप्पा असतील त्या सुध्दा रंगायला वेळ लागत नाही! तेव्हा मात्र पारंपारीक चाळीत जे काय पहावे, ऐकावे, त्याची जरा सुधारीत आवृत्ती अमेरीकेत आहे याची माझी खात्री पटली.  नको तेवढा स्पष्टवक्तेपणा,मुलाचा अभ्यास, तब्येतीच्या तक्रारी, नवरा बायकोचे घरर्खचावरून भांडण या गोष्टी अमेरीकनांमध्ये असतात म्ह्टलयावर "घरोघरी मातीच्याच चुली" या म्हणीची सार्थता कळली. पण फ़क्त पराकोटीचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि स्वछंदी जीवनाचा परिणाम स्टेसी सारख्या लोकांना आता उशीरा का होईना घाबरवतो आहे कारण त्याचा शेवट असतो तो मोडकळीला आलेली कुटुंबसंस्थतेत. स्टेसीला कुटुंबाकरता तडजोड करणार्‍या कितीतरी स्त्रीया माहीती आहेत. काही पुरुषांनाही निदान लग्न केल्यावर तरी येणार्‍या जबाबदारीची आणि मायेच्या धाग्यांची जाणीव होते आहे. मी अमेरीकेच्या वेगवगळ्या भागात राहीले आहे. आमच्या भारतीय मित्रमंडळींकडूनही त्यांच्या विविध भागातल्या अमेरीकन शेजार्‍यांच्या कथा ऐकल्या आहेत. तेव्हा आपले घर आणि त्यासाठी झटण्याची आणि तडजोडीची मनोवृत्ती साधारण दक्षिण भागात आणि छोट्या गावात अधिक दिसून येते असे मला वाटते. माझ्या शाळेतही ( graduate school) अशा विचारांचे अमेरीकन स्रीपुरुष होते त्यांचेही उदाहरण देता येईल. कदाचित ह्या अशा अमेरीकनांची संख्या पूर्ण अमेरीकेच्या दहा टक्केच असेल पण तेही नसे थोडके.  ही कुटुंबासाठी जगण्याची वृत्ती मध्यमवर्गीय सुशिक्षीत अमेरीकन समाजात वाढली लागते आहे. ही गोष्ट्च मुळी किती धीर देणारी आणि अंधानुकरण करणार्‍या काही भारतीयांना योग्य दिशा दाखवणारी आहे. इथे जे वाईट आहे ते सातासुमुद्रापार आपल्याकडे पोहोचले आहेच.  पण आपल्याकड असलेले चांगले इथे रुजू पहाते आहे हे किती आशादायी चित्र आहे. कदाचित वारे उलटे वाहयला लागले नाहीत ना?
 -सोनाली जोशी