आमचे सख्खे शेजारी (२)

आजीआजोबा दोघंही युद्धकाळात खूप काही भोगलेले,खूप काही गमावलेले... पण तरीही कायम आनंदी,दुसऱ्याला मदत करायला तत्पर आणि या वयातही नवीन गोष्टींविषयी उत्सुकता असलेले आहेत.एखादा नवीन पदार्थ कसा करायचा पासून साडी कशी नेसतात पर्यंत आणि संगणक कसा वापरायचा पासून डिजीटल कॅमेऱ्यावरच्या चित्रांची सिडी कशी तयार करायची इथंपर्यंत सगळ्याच गोष्टी शिकण्यामध्ये तोच उत्साह,तीच उत्सुकता..आमचे सूर जुळत चालले.वयातला फरक कुठे आड आला नाही.आमच्याकडे येणाऱ्या मित्रमंडळींनी सुद्धा त्यांच्याकडे डोकावल्याशिवाय वर यायचं नाही असा जणू नियमच झाला‌.कधीही आम्ही  भारतात जायला निघालो की विमानतळावर आणापोहोचवायला येतातच, पण आमच्या मित्रमंडळीपैकी सोनिका कायमची भारतात परत गेली तेव्हा तिच्या साठी मुद्दाम 'ग्रुनसॉस'*ची पार्टी केली आणि तिला विमानतळावर सोडायलाही आले.
आजीला ३ बहिणी ,मोठी मार्सेला(८०),मग हेडी (७८),मग त्सेंटा(७५)म्हणजे आजी आणि लहान फॅनी(७२)..तर आजोबा एकटेच!या सगळ्या परिवाराशीच आता परकेपणा उरलेला नाही. हेडी 'बॉब्फिंगन हून आमच्यासाठी तिच्या बागेतले टोमॅटो आणि फरसबी आणते,तर मार्सेला आमचे वाढदिवस लक्षात ठेवून अमेरिकेतून फोन करते आणि वयाच्या ८० व्या वर्षीही 'kaesespaetzle' **कसं करायचं ते शिकवते.
आजीआजोबांचा मित्रपरिवारही खूप मोठा!त्यांचा दिनक्रमही भरगच्च!वर्षातून एकदा आजीच्या शाळा कॉलेजातल्या मित्रमंडळीचं सम्मेलन,एकदा आजोबांच्या! एकदा डॉइश बान मधल्या सहकाऱ्यांचं सम्मेलन,त्यांच्याबरोबरच्या सहली, महिन्यातून दोनदा 'केगेल्न' म्हणजे 'बॉलिंग' खेळायला 'माइन्स'ला जाणे, डॉक्टरकडे वर्षातून एकदा तपासणी,नातेवाईकांची येणीजाणी,घर विमानतळा पासून जवळ म्हणून गाडी ठेवायला येणारे मित्र...आणि तरीही आमच्याबरोबर गप्पागोष्टी मनापासून चालतात.त्यांचे मित्र यायचे असले की  'एकतरी भारतीय पदार्थ हवा'अशी फर्माईश आधीच येते, आणि ती मित्रमंडळीही आम्हाला भेटल्याशिवाय परत जात नाहीत.
आमचा इथला संसार बराचसा प्लास्टीकचा!इथे कायम राहायचं नाही,त्यामुळे प्रत्येकवेळी काही खरेदी करताना ते २५किलोमध्ये नेता येईल का ? असा विचार करुन घ्यायचं नाहीतर 'वापरा आणि फेका' मधलं घ्यायचं(आणि ते फेकताना सुद्धा जीव खालीवर करुन घ्यायचा आणि दिनेशने मग माझ्या नकळत ते सामान फेकून द्यायचं...)त्यामुळे आमच्याकडे जेव्हा आमचे आईबाबा(दोन्ही,पण वेगळ्या वेळी..)यायचे ठरले तेव्हा आजी माझी 'पुरवठामंत्री'च झाली होती.गाद्या, उशा,पांघरुणांपासून सगळं तिने मला पुरवलं.
आमच्याबरोबर विमानतळावर आजोबा आले त्यांना घ्यायला आणि इकडे आजीने आमच्या नकळत जिना प्रवेशदारापासून वरपर्यंत फुगे आणि फुलांनी सजवला, आणि स्वतः दारात स्वागताला तयार.. त्यांच्याकरता स्वतः खपून कितीतरी पदार्थ केले,जर्मन पद्धतीने पार्टी केली.कधीतरी बोलण्याच्या ओघात त्यांच्या सांगितलेल्या आवडी लक्षात ठेवून त्यांना भेटी दिल्या.माझ्या बहिणीला मुलगी झाली तेव्हा आजीने बाळंतविडा सुद्धा  केला.
आमच्या बऱ्यावाईट प्रसंगी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले,आम्हाला धीर दिला,आमच्यासाठी प्रार्थनाही केली.
कोण आहेत हे आमचे? ना नात्याचे,ना गोत्याचे!ना एका धर्माचे की वंशाचे..पण तरीही खूप जवळचे,हे मागच्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत की या जन्मीचे प्रेमरज्जु? पण जेव्हा जर्मनी सोडून परत येऊ तेव्हा निरोपाच्या हळव्या क्षणांना आम्ही कसे सामोरे जाऊ? माहित नाही .. आमचं जर्मनीतलं हे घर मात्र आमच्यासाठी कायम राहील...


अवांतर:


*ग्रुनसॉस=ग्रीन सॉस यात ७ प्रकारच्या विशिष्ट हिरव्या भाज्या वापरून ग्रेव्ही केलेली असते ,ती उकडलेले बटाटे+अंडी याबरोबर खातात,ही फ्रांकफुर्ट ची खासियत आहे.
**केझस्पेझ्टलं'= एक प्रकारचे चीज आणि विशीष्ट प्रकारच्या छोट्या नुडल्स यांनी एक पदार्थ बनवतात,कॉन्स्टान्झ लेक/बोडन झे या जर्मनी व स्विस बॉर्डर वरच्या भागातील हा पदार्थ खासियत आहे.