पत्रमैत्रिण(२)

इटली,मॉरिशस आणि वेस्ट इंडिज हून पत्र येणं आणि साहजिकच पाठवणं दुर्मिळ झालं पण फ्रान्सिस,स्टेफी आणि मी; आमची तिघींची पत्रापत्री मात्र अजून चालू होती.


 


नंतर मग हळूहळू नोकरी,लग्न इ.प्रापंचिक व्यापात शाळा,कॉलेज,त्यातले मित्रमैत्रिणींच्या भेटी कमी कमी होत गेल्या,तर पत्रमैत्रिणीला पत्र लिहिणे कधी थांबले ते कळलेच नाही. असं काही माझं एकटीचंच झालं नाही,बहुतेक सगळ्यांचं थोड्याफार फरकाने असंच होतं. जुने धागे काळाच्या ओघात हरवतात कधी ते कळत नाही,पण त्याच वेळी नवे मित्रमैत्रिणी,नवी नाती,नवे परीघ रुंदावतात त्यात हे जुने हरवल्याची चुटपुट कमी होते एवढेच!
मला कधी तरी आठवण व्हायची पण आसुसून पत्र लिहावसं मात्र वाटलं नाही.बाकीचे पत्रमित्र केव्हाच हरवले पण स्टेफी आणि फ्रान्सिसशी पत्रापत्री नाताळच्या,नववर्षाच्या,वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती तरी कितीतरी दिवस चालू होती,पुढे ते ही कधीतरी असंच बंद झाले.


पुढे इथे जर्मनीत आल्यावर मात्र परत स्टेफी माझ्या मनातून बाहेर डोकावू लागली.दिनेशचीही एक जर्मन पत्रमैत्रिण(उटं) होती.आम्ही दोघांनीही आपापल्या मैत्रिणींना पत्रे लिहिली.दोनच दिवसात उटंचे पत्र 'पत्ता चुकीचा' असा शेरा घेऊन परत आमच्याकडे आले!झाले! आता आपली शोधमोहिम बारगळली,असे वाटून आम्ही खिन्न झालो, आणि त्यानंतर एका संध्याकाळी स्टेफीचा फोन आला! तिला पत्र मिळाले होते.तिचे आईवडिल अजूनही हारेनला त्याच जुन्या घरी राहत होते आणि त्यामुळेच तिला पत्र मिळू शकले होते.आम्हाला दोघींनाही आनंदातिशयाने काय बोलावे सुचेना..खरंच वाटत नव्हतं की आपण परत भेटलो आहोत!‌आता मात्र  इपत्र,चॅट,फोन द्वारे आमची मैत्री मागील कित्येक पानांवरची धूळ झटकून परत फुलायला लागली. दोघींची एकमेकींना पुन्हा ओळख होत होती.त्या वेळचे आणि आजचे विषय वेगळे, परिस्थिती वेगळी आणि प्रगल्भताही! आम्ही आता नियमित चॅट करू लागलो. उटंचा नवा पत्ता सुद्धा तिनेच शोधून काढला आणि दिनेशलाही त्याची मैत्रिण भेटली.


आम्ही फ्रांकफुर्ट मध्ये राहतो तर स्टेफी मेप्पन/दालुम या उत्तर जर्मनीतील एका छोट्याशा टुमदार गावात!उटंचं ओस्नाब्रुक सुद्धा मेप्पनला जवळ(म्हणून तर स्टेफीला उटंचा नवा पत्ता शोधून काढता आला.)५,६ तास आगगाडीने जायला लागतात हे कळल्यावर एका शुक्रवारी आम्ही मेप्पनला जायचे ठरवले.'मेप्पन' हे उत्तर जर्मनीतलं छोटसं गाव आणि त्याचच जुळं गाव दालुम! या दालुमला रेल्वेस्थानक सुद्धा नाही,मेप्पनला यावे लागते त्यासाठी. इतकं सुंदर, अगदी देखाव्यातल्या चित्रासारखं आहे हे गाव. छोटी छोटी घरं, मोठी अंगणं आणि त्या अंगणांमध्ये गुलाब, चेरी, सफरचंद,आक्रोड,बदाम यांची झाडं,रस्त्याच्या दोबाजूना पाईन,मयुरपंखी चे वृक्ष.. किती पाहू,आणि किती डोळ्यात साठवू असं झालं आम्हाला!आणि स्टेफी प्रत्यक्ष भेटल्यावर किती बोलू आणि किती नाही असंही झालं होतं.स्टेशनपासून घरी पोहोचेपर्यंत आमची अखंड बडबड चालू होती.


स्टेफीचं घर तर फारच छान आहे.आत्त्तापर्यंत आम्ही चित्रातच अशी जुनी घरे पाहिली होती आणि पुस्तकातून त्यांची वर्णने वाचली होती‌. दालुममध्ये वारा भरपूर ,हिवाळा कडक! घरामध्ये लाकडाचा भरपूर वापर.लाकडी तुळया, तक्तपोशी,आणि 'फायरप्लेस'.. आता सगळीकडे वीजेचे हिटर असतात पण काही जण फॅशन म्हणून फायरप्लेस ठेवून घराला 'एथनिक लूक' देतात.पण स्टेफीच्या पूर्ण घरालाच एथनिक लूक होता.तिने ती शेकोटी नुसती शोभेकरता ठेवली नव्हती तर लाकडेबिकडे घालून पेटवली आणि मग रात्री १.३०/२ पर्यंत आमच्या गप्पा त्या शेकोटीच्या साक्षीने रंगल्या.