रसग्रहण- राहिलो न अता कुणाचा दास मी

सर्व मनोगतींना आमचा सादर प्रणाम!


गेले काही महिने आम्ही नियमितपणे मनोगतावर येत आहोत. इथल्या लेखनाचा आस्वाद घेत आहोत. मनोगताच्या रत्नभांडारात दिवसागणिक अनेकविध प्रकारांच्या लेखांची, कवितांची, चर्चांची, पाककृतींची भर पडत असते. एका मराठी इ-व्यासपीठाचा होणारा उत्कर्ष पाहून आम्हाला अत्यंत आनंद होतो. याबद्दल मनोगताच्या रचयित्याचे- श्री. प्रशासक यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांच्यामुळेच आज या परक्या देशात राहत असूनही आम्हाला आमच्या मायमराठीचा सहवास घडतो. याकरिता त्यांचे आभार.


तर या मनोगतावर एकत्र नांदणाऱ्या सर्व साहित्यप्रकारांतील आमचा आवडता साहित्यप्रकार म्हणजे 'विडंबन'. एका गझलकाराच्या जमिनीची मोडतोड करून मग तिची पुनर्बांधणी करणे, यासाठी आजकालच्या पुनर्मिश्रित गाण्यांइतकीच (रिमिक्स गाणी) उच्च कोटीची प्रतिभा आवश्यक असते. मनोगतावर तर अशी प्रतिभा ओसंडून वाहत चाललेली दिसते, असे म्हणण्याचा मोह आवरत नाही. या विधानाचा आधार शोधावयाचा असल्यास, रसिकांनी पद्यविभागाकडे आपली नजर वळवावी. तिथे प्रत्येक नव्या, उच्च दर्जाच्या गझलेची (व क्वचित कवितेचीही) किमान ३ विडंबने झालेली दिसून येतात. त्यातही प्रत्येक विडंबनातील कल्पना, शब्द यांत अपार वैविध्य आढळते. या सर्व विडंबनांतही शिरोमणी ठरतात ती श्री. कारकून यांचे विडंबने. आम्ही तर आमच्या कुटुंबाशी या विषयावर चर्चा करताना श्री. कारकून यांचा उल्लेख 'विडंबनसम्राट' असा करतो. (आमच्या कुटुंबास त्यांची विडंबने आवडत नाहीत. म्हणे उथळ वाटतात. पण आपल्याकडे म्हण आहेच ना- गाढवाला गुळाची चव काय? शिवाय प्रत्येक महान रचनाकाराला सुरुवातीला 'उथळ' म्हणूनच हिणवले जाते. आमचा इतक्या वर्षांचा अनुभव सांगतो, की अशा 'उथळ' म्हणून हिणवल्या गेलेल्या व्यक्तीच पुढे कलाक्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवितात.)


याच कारणास्तव आम्ही आमच्या गुरुस्थानी असलेल्या या विडंबनकाराच्या कलाकृतींच्या रसग्रहणांची मालिका मनोगतावर आणण्याचे घाटत आहोत. या मालिकेचे प्रथमपुष्प आता आम्ही आपल्याला अर्पण करतो.


राहिलो न अता कुणाचा दास मी


हे श्री. प्रसाद यांच्या 'वेदनांची मांडतो आरास मी' या गझलेचे केलेले यशस्वी विडंबन आहे. विडंबनसम्राटांचा वाखाणण्याजोगा गुण म्हणजे 'काव्यशीघ्रता'. मूळ कलाकृती मनोगतावर प्रकाशित झाल्यापासून अवघ्या ९ तास १ मिनिट एवढ्या अल्पकालावधीत हे बहारदार विडंबन मनोगतावर प्रकाशित झाले. त्यातही विडंबनसम्राटांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक तशाच ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ श्री. प्रसाद यांच्या पावलांवर पाऊल ठेवून अक्षरांना चढवलेला जांभळा रंग. तो रंगसुद्धा जसाच्या तसा ठेवण्यामागे विडंबनसम्राटांना मूळ गझलकाराबद्दल वाटणारा आदर आहे. मूळ गझलेचा बहर देखिल त्यांनी व्यवस्थित सांभाळला आहे. काही ठिकाणी अक्षरगणवृत्त थोडेसे मागेपुढे झालेले दिसत असले, तरीही मात्रांची गोळाबेरीज मात्र नेमकी सांभाळली आहे.


राहिलो न अता कुणाचा दास मी
ठेवला ना बक्षिसाचा ध्यास मी!
या अवघ्या २ ओळींत क्रांतीच्या स्फोटाला लागणारी सारी दारू साठविलेली आहे. आता मी कुणाचाही दास राहिलेलो नाही. त्यामुळे कुणाचीही कामे करून त्याबदल्यात बक्षिसी मिळवण्याचा ध्यास मला आता उरला नाही. नव्हे, मी स्वत:च त्या ध्यासाला मनात थारा दिलेला नाही. यातून स्वेच्छेने गुलामगिरीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यास केले गेलेले प्रयत्न व त्यांना मिळालेले यश असे सर्व भाव मांडले आहेत. हाच शेर नुकत्याचे एका प्रेमप्रकरणातून बाहेर पडलेल्या भूतपूर्व प्रेमीने केला आहे असे समजून वाचल्यास अर्थाचा एक वेगळाच पदर उलगडतो.


ऐकले ते ते खरे मी मानतो 
ठेवतो अफवेवरी विश्वास मी...

मूळ शेरात कमीत कमी बदल करण्याचे कसब विडंबनसम्राटांना साध्य झालेले येथे दिसून येते. या शेरातून साध्या मध्यमवर्गीय कारकुनी माणसाचा भोळेपणा व त्यायोगे होणारे त्याचे नुकसान काव्यमयरीत्या विशद केले आहे. आजच्या माहितीविस्फोटाच्या युगात सामान्य माणसाच्या कानावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पडत असते. त्या माहितीला खरे मानण्यावाचून काहीच गत्यंतर नसते. अशी प्रत्येक गोष्ट खरी मानण्याची सवय लागलेल्या या सामान्य माणसाला मग खरे काय व खोटे काय यांच्यात फरक करता येत नाही व त्याचे पर्यवसान त्याचे अफवांना बळी पडण्यात होते. पुन्हा या अफवांमुळे नुकसान होते ते या सामान्य माणसाचेच.


वेळ जो लागायचा तो लागतो.....
एकदाचा सोडला नि:श्वास मी

या शेरात तर विडंबनसम्राटांनी कमालच केली आहे. मूळ शेरातील १० शब्दांपैकी अवघे ३ शब्द बदलून नव्या अर्थाचे  दर्शन त्यांनी घडवले आहे. मूळ शेरातील मृत्यूची वाट पाहण्याच्या नकारात्मक विचाराला, सरकारी लाल फितीच्या चेंगट कारभारातून सहीसलामत बाहेर पडून नियोजित कार्य तडीस नेल्याच्या श्रमसाफल्यानंदाचा सकारात्मक भाव मिळाला आहे.


ढापल्या कविता कधी माझ्या कुणी? 
घेत गेलो काळजीही खास मी....

हा शेर मात्र मूळ गझलेतील शेराहून सर्वस्वी भिन्न आहे व म्हणूनच विडंबनकाराच्या स्वतंत्र प्रतिभेचे दर्शन घडवतो. त्यात विडंबनकार आपल्या कविता कुणालाही ढापता न आल्यामागचे गुपित सांगत आहेत. परंतु ते गुपितही पूर्णपणे उघड न करण्यात त्यांना यश आलेले आहे. खास काळजी घेत गेलो एवढेच ते कबूल करतात. परंतु त्या खास काळजीचे स्वरूप मात्र सांगितेलेले नाही. जेणेकरून वाचकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. एक वाचक म्हणून आम्ही काही तर्क करतो-
१)- विडंबनकार आपल्या ढापण्यायोग्य कविता प्रकाशित न करता, अशा सर्व कवितांचे एकत्रित बाड बनवून रात्री ते गालाला लावून झोपत असावेत.
२)- ते कविता लिहीत असताना, त्या ढापण्यायोग्य होऊ नयेत म्हणूनच हलक्या दर्जाच्या कविता लिहीत असावेत.


जायचे होते तिला, गेलीच ती
वादळानंतर कशास उदास मी!

या शेरातही केवळ ४ शब्दांच्या बदलातून अर्थांचे नवे संदर्भ विडंबनसम्राटांनी दाखवून दिले आहेत. मूळ गझलेतील हव्याहव्याशा मधुमासाची उपमा बदलून येथे नकोनकोशा वाटणाऱ्या विध्वंसक वादळाची उपमा दिली आहे आणि तरीही विडंबनकारास उदास वाटते, यातून त्यांचे विशाल हृदय दृष्टीस पडते.


नेत असते ती मला सगळ्यांकडे ...
जे हवे ते बोलतो हमखास मी!

या शेरात तर मूळ शेराच्या बरोबर विरुद्ध अर्थाच्या ओळी लिहून विडंबनसम्राटांनी विडंबनाला वेगळीच खुमारी आणली आहे.कुटुंबाचे 'गुण'वर्णन नर्मविनोदी शैलीत करणे ही तर आमच्या विडंबनसम्रांटांची खासियत! ती या शेरातून पूर्णपणे प्रकट झालेली दिसून येते.


का अचंबा वाटतो मज पाहुनी?..
(खेळतो राधेसवे हा रास मी! )

वरकरणी परस्परांशी काडीचाही संबंध नसल्याचे भासवणाऱ्या या २ ओळींत प्रत्यक्षात किती खोल अर्थ दडला आहे पाहा! रणांगणावर गीतेचे तत्त्वज्ञान सांगणारा, करंगळीवर गोवर्धनगिरी पेलून शेकडो जीवांना आश्रय देणारा, कालियाचे मर्दन करणारा धर्माचा आधार असा कृष्ण व राधेबरोबर रासक्रीडेत मग्न असणारा धीरललित कृष्ण हे दोघे एकच हे पाहून भक्तांना अचंबा का वाटावा? एकाच व्यक्तीच्या नाण्याप्रमाणे २ बाजू असू शकतात हे वास्तवाचे भान आपल्याला विडंबनसम्राट देतात. यावर अचंबा करण्यात काहीही हशील नाही हे तर ते सुचवतातच, शिवाय वरकरणी असंबद्ध वाटणाऱ्या २ गोष्टींत घनिष्ठ संबंधही दडलेले असू शकतात हा महत्त्वाचा धडाही देतात.


ओळखू आले सख्या डीएनए
शोधला जेंव्हा तुझा इतिहास मी!

केवळ २ ओळींत काव्य, विज्ञान व इतिहास यांचा मेळ घालणारे विरळाच! आपल्याभोवती गुप्ततेचे अभेद्य कवच उभे करणाऱ्या प्रियकराला प्रेयसी म्हणते आहे, तुझा इतिहास अखेर मी शोधून काढलाच. तेव्हा मला तुझी गुणसूत्रे कळली. म्हणजेच तुझ्या इतिहासातून तुझे स्वभावाचित्र स्पष्ट झाले. अशी स्वभाववैशिष्ट्ये, जी गुणसूत्रांतून मिळाल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही इलाज नाही. त्यामुळेच तुझ्या स्वभावदोषामुळे तुझ्याकडून ज्या चुका घडल्या असतील त्यांचा दोष वास्तविक तुला लागत नाहीच.


अशा सुंदर विडंबनांची तुलना आम्ही नेहमीच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या मदिरेशी करतो. मदिरा कशी जिभेच्या वेगवेगळ्या स्थानांनी आस्वादून पाहिल्यास तिच्याबद्दलची नवनवीन माहिती उजेडात येते, तशीच ही विडंबनेही आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहिल्यास अर्थाचे नवनवे आयाम स्पष्ट होतात.


आम्हाला जो अर्थ समजला, तो आम्ही येथे मांडला. याहून काही वेगळे जाणवल्यास वाचकांनी व श्री. कारकून यांनी कृपया सांगावे.