हास्यास्पद निरिक्षणे

आपल्या आजूबाजूला काही घटना घडतात त्या पाहून काहीवेळा हसु अनावर होते अशा काही घटनांची चर्चा करूया का?


माझे एक निरिक्षण देते.


पूर्वी आमच्या शेजारी एक बाई रहायच्या. त्या व मी कित्येकदा भाजी आणायला जायचो. जाताना त्या कुलूप लावायच्या. कुलूप लावल्यावर त्या लगेच निघायच्या नाहीत. त्या कुलूपाला ३-४ वेळेला हलवायच्या. खडखडखड  खडखडखड खडखड


नंतर त्या कुलूपाची मुंडी धरून एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. नंतर त्या कुलुपाला धरून खाली जोर लावून ओठायच्या त्या कुलुपाला. म्हणजे घट्ट लागले आहे ना ते बघण्यासाठी हे सर्व प्रयत्न!


मग मी त्यांना म्हणायचे. चला वहिनी. निघायचे ना. हो हो. झाले माझे कुलूप लावून. असे म्हणून जिन्यातून खाली उतरताना ह्या बाई परत मागे वळून पहायच्या. आता परत काय झाले? अगं नाही गं. परत एकदा बघितले कुलूप नीट लागले की नाही ते.


मला हे सर्व पहाताना इतके काही हसु यायचे आणि वाटायचे की आता इतक्या खडखडाटाने लावलेले कुलूप उघडेल!