फ्रोह वाईनाख्टन!!!

याआधी  'नाताळची चाहूल'
सारं घरदार आता नाताळसाठी सज्ज झालेलं असतं...(पुढे)


पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या मेजवान्यांची आमंत्रणं सुरू होतात. कितीतरी जण नाताळच्या बाजारात ग्लुवाईन पार्टी करतात.मित्रमंडळी आपसात नाताळचे जेवण घेतात.ऑफिसांतूनही नाताळमेजवानी आयोजित केली जाते.हा सण जर्मनीत मुख्यत्वे कुटुंबाबरोबरच साजरा करतात.आपले आईवडील आणि भावंडांबरोबरच नाताळ साजरा करण्याकडे सर्वांचा कल असतो.बाकी मित्रमंडळींबरोबर म्हणून तर पहिल्या आडव्हेंटनंतर मेजवान्या सुरू होतात.
ख्रिस उल्मला त्याचे आईवडील आणि दोघी बहिणींबरोबर नाताळ साजरा करतो,तर सुझान मानहाईम जवळच्या एका छोट्या खेड्यात आपल्या आईबाबांबरोबर असते. रोमेन आपले नव्वदीचे आजोबा आणि आईवडीलांसोबत असतो तर श्वेनिया आपली पोझिशन बाजूला ठेवून आपल्या वडलांच्या बेकरीत केक आणि बिस्किटांची पाकिटे बांधायला उभी असते.ख्रिस्टियाना आपले बाबा नाताळभेट म्हणून"तुम्ही मुले अशीच प्रगती करा हेच दरवर्षी मागतात" हे ऐकल्यावर आईबापाचे हृदय स्थल,काल,धर्म,वंशाच्या पलीकडे जाऊन सारखेच आहे हे मनात आल्याशिवाय राहत नाही.
इथे नाताळच्या पूर्वसंध्येला 'हायलिश आबेंड' म्हणजे 'पवित्र संध्याकाळ' असे संबोधतात आणि मुख्य सण त्याच दिवशी साजरा करतात आणि २५,२६ तारखेला काका,मामा,आत्या,मावशी वगैरे इतर नातेवाईकांच्या,जवळच्या मित्रांच्या भेटी घेतात.आमचे आजीआजोबा नाताळची पूर्वसंध्या इथे साजरी करतात आणि मग दुसऱ्या,तिसऱ्या दिवशी त्यांचे सगळे कुटुंबीय आजीच्या बहिणीकडे,हेडीकडे जमतात.आमची ओळख जेव्हा नवीन होती तेव्हा एकदा सहज जर्मन नाताळबद्दल विचारलं होतं, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक नाताळ आम्ही आजीआजोबांबरोबर साजरा करतो.
संध्याकाळी ५.३०,६ च्या सुमाराला चर्च मध्ये नाताळचा पहिला मास असतो आणि दुसरा रात्री ११ ला!आमच्या घरापासून रमतगमत चालत गेले तरी १० मिनिटाच्या अंतरावर चर्च आहे पण तरीही पावणेपाचच्या सुमाराला आजी सगळ्यांना घराबाहेर काढते आणि ५ च्या सुमाराला आमची फौज तिथे हजर असते. सगळे चर्च रिकामे असले तरी तिची विशिष्ट जागा आहे तिथेच बसण्याचा तिचा कल असतो.रस्त्याने जाताना दर वेळी लहानपणी दसऱ्याला घंटाळीच्या देवळात आईबाबांबरोबर जायचे त्याची हटकून आठवण होते. चर्च मध्ये नाटकाचा पडदा वर जायची,तिसऱ्या घंटेची वाट पाहत असल्यासारखी स्थिती असते.लहान मुलं चांदण्यावाल्या चंदेरी काठ्या घेऊन उभी असतात.एक ताई त्यांना त्यांची 'एन्ट्री' समजावून देत असते,ऑर्गनवाला ऑर्गन जुळवून घेत असतो,येशूचा गोठा,मेणबत्त्या,माईक इ. गोष्टी व्यवस्थित आहेत ना हे कुणी पाहून जातो, सगळं ठीक आहे ना? हे एकदा पाद्रीबाबा पाहून जातो.आम्ही आपले त्या ठराविक जागेवर बसून ते सगळे पाहत आजीचे कुजबुजत्या आवाजातले धावते समालोचन ऐकत बसलेले असतो. हळूहळू लोक जमायला लागतात. लहान मोठे आबालवृद्ध सगळे यायला सुरुवात होते. चिमुकल्या ३,४ महिन्यांच्या बाळांनासुद्धा परड्यात घालून त्यांच्या आया घेऊन येतात. बाबागाड्यातूनही मुलांना आणतात.विशीबाविशीतली प्रेमी युगुलं येतात आणि आदल्याच दिवशी ९१ पूर्ण केलेली वेल्श आजीही असते,तर कुणी श्रावणबाळ चाकांच्या खुर्चीवरून आपल्या पित्याला घेऊन येतो.सगळे चर्च भरून जाते,लोक मग बाहेरच्या दालनातही जाऊन उभे राहतात.प्रतीक्षा असते आता येशूजन्माच्या सोहळ्याची..
वेळ झाली की फादर, त्याच्यामागे चांदण्या लावलेली चंदेरी काठ्या घेतलेली लहान मुलं आणि बाकीचा लवाजमा येतो.मंद प्रकाशातले दीप उजळले जातात.एक ताई मग मेणबत्ती घेऊन येते,आणि ज्योतीने ज्योत लावते.बायबल मधले काही उतारे वाचून दाखवते,ऑर्गनचे सूर वाजायला लागतात,सारे उठून उभे राहतात आणि प्रार्थनेला सुरुवात होते.धूपाच्या वासाने आणि ऑर्गनच्या मंद सुरांनी वातावरणात जणू मंतरलेपणा येतो. नाताळची प्रसिद्ध गाणी सारे गाऊ लागतात.
    "आज शुद्ध रात्र,पवित्र रात्र.. येशू जन्मला..." अशा अर्थाचे गाणे सुरू झाले की मला नेहमी " राम जन्मला ग सखी.." आठवतं.ख्रिस्त आणि कृष्णामधलं काही साम्यही आठवत राहतं.दोघेही मध्यरात्री जन्मले,जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आले.एक गाईगुरांमध्ये वाढला तर दुसरा शेळ्यामेंढ्यांमध्ये..तिकडे गाणी सुरूच असतात,माझं मन असं  कुठेही भरकटत राहतं. जन्मोत्सवाची गाणी झाली की पाद्रीबाबा सर्वांसाठी प्रार्थना करतो,छोटेसे प्रवचन देतो.या वर्षी "ख्रिश्चन,मुस्लिम,बौद्ध,हिंदू सगळे धर्म सारखेच!"  असा संदेश दिल्याने जुन्या विचारसरणीच्या लोकांत थोडी खळबळ उडाली!मग फादर सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देतो.फ्रोह वाईनाख्टन! फ्रोहेस फेस्ट! अशा नाताळच्या शुभेच्छा आपल्या आजूबाजूच्यांना देऊन झाल्या की फादरबाबा सगळ्यांना प्रसादाचे बिस्किट देतो.रांगेत एकेकजण त्याच्याकडे जातात, गुडघ्यात लवून अभिवादन करतात आणि प्रसाद घेऊन येतात. हा प्रसाद फक्त कॅथलिक ख्रिश्चनांनाच मिळतो.आजी कॅथलिक आणि आजोबा प्रोटेस्टंट! त्यामुळे आजी आपली एकटी एकटी जाऊन प्रसाद खाऊन येते.आजोबांना सुद्धा देत नाही याची आम्हाला फार गंमत वाटते.
फादरबाबा रुप्याच्या पेल्यातून रेड वाइन आणि प्रसादाचे बिस्किट त्याच्यामागे अर्धचंद्राकार उभ्या असलेल्या चर्चच्या पुजारीमंडळाला आणि चंदेरी काठ्या घेतलेल्या मुलांना देतो आणि सर्वात शेवटी स्वतः पितो.परत एकदा सर्वांना नाताळ शुभेच्छा देऊन लोकांची पांगापांग होते.
गणपतीची आरास पाहावी तसे लोक मग येशूचा गोठा,नाताळझाडाची आरास पाहण्यात गुंग होतात.आम्हीही मग आरास पाहतो.आजी तिच्या मित्रमंडळींशी,फादरशी ओळख करून देते आणि रमतगमत आम्ही घरी येतो.
ख्रिसबाऊम म्हणजे नाताळच्या झाडामागे भेटवस्तू दडवून ठेवलेल्या असतात. आम्हीही त्यांना द्यायच्या भेटी तिथे लपवतो.आजोबा मग टेपरेकॉर्डरवर परत नाताळगाणी लावतात. सार्वजनिक आरती झाली तरी घरच्या गणपतीची पूजा,आरती वेगळी असतेच ना,तसेच काहीसे!आजीचे नाताळझाड पारंपारिक पद्धतीने सजवलेले असते.झाडावर चिमुकले चमचमते सोनेरी,चंदेरी गोल लोलक,चांदण्या,यक्षकिन्नर असतात.येशूचा पाळणा,बाळयेशूची प्रतिमाही पायथ्याशी ठेवलेली असते.रंगीत मणी लावलेली बिस्किटे,चॉकलेटे आणि कलात्मकरीत्या मांडलेली नाताळफराळाची बिस्किटे चैत्रगौरीच्या आराशीची आठवण करून देतात.
बारा महिन्याच्या बारा मेणबत्त्या मग आजोबा लावतात,सगळे झाडासमोर उभे राहतात."रोजची मीठभाकर देणाऱ्या आकाशातल्या बापा,आम्हाला असेच सुखी,समाधानी,निरोगी ठेव."अशा आशयाची प्रार्थना म्हणतात.मग पितरांसाठी,जवळच्या मित्रमंडळींपैकी कोणी गेले असेल तर त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. गेल्या वर्षी माझ्या सासूबाई अचानक गेल्या,तेव्हा एक प्रार्थना त्यांच्यासाठीही होते,आणि आम्हाला भरून येतं.एकमेकांच्या गळाभेटी घेऊन मग नाताळच्या शुभेच्छा देतात आणि वाईनाक्ट्समानने ख्रिसबाऊमखाली आणून ठेवलेली नाताळभेट लगेचच उघडून पाहतात आणि आवडलेल्या भेटीबद्दल त्याला धन्यवाद देतात.
सेक्ट म्हणजे जर्मन शँपेन मग फसफसते आणि नाताळची मुख्य मेजवानी सुरू होते.बऱ्याच ठिकाणी टर्कीचे महत्त्व फार असते पण इथे मात्र जेवणात टर्कीचे विशेष महत्त्व नसते तर बटाटयाचे विशिष्ट सालाद आणि उकडलेली अंडी वाईसवुर्ष्ट  म्हणजे पांढऱ्या सॉसेजबरोबर खातात. जोडीला चीजबरोबर बेक केलेले बटाटे,पेअर आणि एक प्रकारचे मऊ चीज यांचा पदार्थ,विविध प्रकारचे पाव आणि बिस्किटे असतातच.दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ तारखेला एंट म्हणजे बदक किंवा गाजं म्हणजे बदक आणि टर्की यांच्यामधला (त्याच फॅमिलीतला)एक पक्षी जेवणात असतो. आजीचा आग्रह एकीकडे चालू असतो.गप्पांच्या नादात दोन घास जास्तच जातात. जेवणानंतर ऍपलपाय, ग्रीसपुडिंग,रोटंग्रुट्झ म्हणजे एक विशिष्ट बेरीफ्रुट्सची जेली यापैकी एखादे डेझर्ट असते. जेवणे झाली तरी हात वाळवत गप्पा मात्र चालूच असतात.विषय रूळ बदलत राहतात.मंद संगीत वातावरण जादूभरलं करत असते.मनात ते चित्र तसंच जपून ठेवून मग एका आठवड्याने येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही उत्सुक होतो. Flemming Aaji Aajoba

नाताळ मेजवानीची तयारी




Church Sajawat 1 


चर्च मधील आरास-१. येशूचा गोठा





Church Sajawat 2 


चर्च मधील आरास- २‍. जेरुसलेमचे वाळवंट





Christmas Tree Sajawat at home 


ख्रिस बाऊम-घरातील नाताळ झाड




Aaji Aajoba Satkar

आजीआजोबांचा शाल श्रीफळ देऊन भारतीय पद्धतीने सत्कार!