एक अविस्मरणीय चित्रपट


आज पुन्हा एकदा माझा सर्वात आवडता चित्रपट द शॉशॅन्क रिडेम्प्शन बघितला आणि वाटलं काही तरी लिहावं याच्याबद्दल.
ज्या चित्रपटानं मला इतकं वेड लावलंय, इतकं शिकवलंय त्याबद्दल इतरांनाही थोडं सांगावं. निदान थोडी कृतज्ञता म्हणून तरी.

अँडी, रेड, ब्रूक्स, तुरुंगातले त्यांचे मित्र, निर्दय गार्डप्रमुख हॅडली आणि राक्षसासारखा भासणारा वॉर्डन सॅम यांच्याभोवती विणलेली ही कहाणी आहे तुरुंगातल्या अवघड जीवनाची, अँडी आणि रेडच्या मैत्रीची, शेवटपर्यंत अँडी ज्यासाठी तो झगडला त्या स्वातंत्र्याची आणि अँडीच्या न संपणार्‍या आभाळाएवढ्या आशेची...

कथेचा नायक आहे अँडी. बायको आणि तिचा प्रियकर यांच्या तथाकथित खुनाच्या आरोपाखाली दोन जन्मठेपांची शिक्षा झालेल्या अँडीची रवानगी शॉशॅन्क तुरुंगात केली जाते. तुरुंगातील पहिल्याच रात्री धैर्य गमावलेल्या एका कैद्याला झालेली मारहाण आणि हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्याचे कष्ट कुणीच न घेतल्यामुळे त्याचा त्याच रात्री झालेला मृत्यू यातूनच आपल्याला तुरुंगाची प्राथमिक ओळख होते.

तुरुंगात त्याची भेट रेडशी होते. तुरुंगात कैद्यांना हव्या असलेल्या वस्तू चोरून आणून देण्याचे काम रेड करत असतो. अँडीला रेडकडून एक छोटी हातोडी हवी असते. तुरुंगात आल्यापासून एकलकोंडेपणाने वागणारा अँडी ह्या प्रसंगानंतर रेडचा मित्र होतो. हातोडी म्हटल्यावर अँडी भिंत फोडून पळून बिळून जाण्यासाठी हातोडी मागतोय की काय असा रेडला संशय येतो. पण ती हातोडी पाहिल्यावर तुरुंगाची भिंत फोडायला ६०० वर्षे लागतील असं मत तो व्यक्त करतो.

तुरुंगातील जीवनात अँडीला इतरांकडून नियमितपणे मारहाण, बलात्कार वगैरे प्रकार सहन करावे लागतात. दरम्यान तुरुंगाच्या बाहेर चालणार्‍या एका कामात रेडच्या मदतीने सर्व मित्रांचा नंबर लागतो. या कामात असताना अँडीच्या कानावर हॅडलीची पैशावर भराव्या लागणार्‍या कराबाबतची तक्रार पडते. तुरुंगात येण्यापूर्वी बॅंकर असलेला अँडी लगेच हॅडलीला मदत करण्याची तयारी दाखवतो. मात्र या बदल्यात आपल्या 'सहकार्‍यांना' प्रत्येकी ३ बीअर मिळाव्यात अशी त्याची इच्छा असते. हॅडली या सौद्यासाठी तयार होतो आणि प्रत्येकाला कामाच्या शेवटच्या दिवशी ३-३ बीअर मिळतात.

या प्रसंगानंतर अँडीचे इन्कमटॅक्सचे ज्ञान जवळपास प्रत्येक गार्ड आणि वॉर्डनला माहिती होते. अँडी प्रत्येकाला या बाबतीत मदत करु लागतो. त्यामुळे अँडीची इतर कामांपासून आणि सहकारी तुरुंगवासीयांकडून होणार्‍या त्रासापासून सुटका होते. त्याची नेमणूक ग्रंथपालाचे काम करणार्‍या ब्रूक्सचा असिस्टंट म्हणून केली जाते. तुरुंगाच्या ग्रंथालयात काम करताना अँडी जवळपासच्या ग्रंथालयांमध्ये तुरुंगात पुस्तके पाठवावीत म्हणून पत्रे पाठवण्याचा सपाटा लावतो. सुरुवातीला त्याला काही प्रतिसाद मिळत नाही मात्र पुढे पुढे केवळ त्याने पत्रं पाठवण्याचे थांबवावे म्हणून पुस्तके आणि गाण्यांच्या रेकॉर्ड्स पाठवल्या जातात.

ब्रूक्सची पुढे पॅरोलवर सुटका होते. आयुष्याची ५० वर्षे तुरुंगात काढलेल्या ब्रूक्सची तुरुंगाबाहेर जाण्याची आता अजिबात इच्छा नसते. त्याच्या मते आता बाहेरच्या समाजात त्याला काहीही स्थान राहिलेले नसते. मात्र त्याला तुरुंग सोडणे भाग पडते. मात्र तुरुंगाबाहेर गेल्यावर काही दिवसांतच तो आत्महत्या करतो.

टॉमी नावाचा एक नवीन कैदी पुढे तुरुंगात येतो. अँडीची बायको आणि तिचा प्रियकर यांचा खून करणार्‍या माणसाला आपण भेटलो आहोत असे तो अँडीला सांगतो. अँडी वॉर्डनला जाऊन ही गोष्ट सांगतो व आपण निरपराधी असल्यामुळे आता इथून बाहेर जाण्यासाठी मदत करावी अशी विनंती करतो. मात्र अनेक आर्थिक बाबतीत अँडीची होणारी मदत व आर्थिक गैरव्यवहारांची अँडीला असणारी माहिती यामुळे वॉर्डन ही विनंती नाकारतो. वॉर्डनच्या आदेशावरुन टॉमीला मारुन टाकले जाते व अँडीची रवानगी एकांतवासात केली जाते.

एक महिन्याच्या एकांतवासानंतर परत आलेला अँडी लगेचच तुरुंगातून गायब होतो. त्याच्या कोठडीची तपासणी केली असता भिंतीवर चिकटवलेल्या एका चित्रामागून त्याने खोदलेला बोगदा दिसतो. (रेडकडून मिळालेली हातोडी वापरुन अँडीने हा बोगदा २० वर्ष खोदला असतो!)  इथं तुरुंगातून अँडी कसा पळाला हे फ्लॅशबॅकने दाखवलं आहे.

तुरुंगात असताना पत्रव्यवहारासाठी घेतलेली नवी ओळख हीच अँडीची नव्या आयुष्यातील खरी ओळख बनून जाते. पळून येताना तो तुरुंगातील आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे असलेली कागदपत्रे घेऊन येतो. एका वर्तमानपत्रात गैरव्यवहाराची बातमी छापली जाते. अटक करण्यासाठी पोलीस आल्यावर वॉर्डन आत्महत्या करतो.
शेवटी रेडला पॅरोलवर सोडलं जातं आणि तो अँडीला येऊन भेटतो.

अतिशय साधा तरीही प्रभावी चित्रपट. काहीही स्पेशल इफेक्टस नाहीत. 'लार्जर दॅन लाईफ' वाटावेत असले मोठमोठे सेट्स लावून प्रेक्षकाला भुरळ पाडलेली नाही.  आहेत फक्त तुरुंगात एकमेकांशी बोलणारे कैदी.  संवादांतून उलगडणारे त्यांच्या मनाचे पैलू. स्वातंत्र्याचं असलेलं आकर्षण, मात्र त्याबरोबरच बाहेरच्या जगात आपली किती किंमत राहील याबाबत वाटणारी काळजी. तुरुंगात बरेच दिवस राहून आपण कायमचे इथलेच होतो की काय ही वाटणारी खंत.

चित्रपटातील प्रत्येकाचा अभिनय अविस्मरणीय आहे. विशेषत: अँडीचं काम करणारा टिम रॉबिन्स आणि रेडचं काम करणारा मॉर्गन फ्रीमन यांनी त्यांच्या कारकीर्दीतला सर्वोत्कृष्ट अभिनय केला आहे. ब्रूक्सची भूमिका करणारा कलाकारही मनाला चटका लावून जातो.

अनेक चित्रपट येतात आणि जातात.  शेळी लेंड्या टाकते त्याप्रमाणे एकामागे एक चित्रपट तयार करणार्‍या लोकांची जगात कमतरता नाही. मार्केटिंगचं तंत्र माहिती असलं की असे चित्रपट धंदाही उत्तम करतात. त्यांना पुरस्कारही मिळतात. मात्र पाण्यावर मारलेल्या काठीप्रमाणे त्यांचा प्रभाव थिएटरमधून बाहेर येईपर्यंतही टिकत नाही.

याउलट काही चित्रपट पुस्तकात जपून ठेवलेल्या पिंपळाच्या पानाप्रमाणे मनात कायमचे जपून राहतात...  एक कायमची ओळख ठेवून जातात. शेवटपर्यंत त्यांची आठवण पहाटेच्या प्रसन्न हवेप्रमाणे  ताजीतवानी राहते. असाच अखंड ताजातवाना राहणारा... कधीही शिळा न होणारा हा चित्रपट आहे.

कधी निराश झालो, अंधारात चाचपडत आहोत अशी भावना निर्माण झाली की मी हा चित्रपट पाहतो आणि वाटतं आपली परिस्थिती इतकी काही अवघड नाही. कुठेतरी आशा असेलच.

हा लेख येथेही उपलब्ध आहे.
सर्व चित्रे विकीपीडियावरुन घेतली आहेत.